धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

जून महिना उजाडला की, शात्र कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलीकडे पालकामध्ये विशेषतः शहरामधील पालकांमध्ये वाढलेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिक्षणाबरोबर संस्कार हेही महत्त्वाचे असून हे संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळामध्ये उतरू शकतात.

धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलीकडे मुलामुलीचा धर्माशी संबंध येत नाही.  या पलीकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरूपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही. रामायण-महाभारतातील एखादी गोष्ट पुस्तकात ठेवली की तेवढ्याने संस्कार उतरत नसतात. इंग्रजी शाळांमध्ये तर तोही प्रश्न नाही. एकीकडे भौतिकवाद, भ्रष्टाचार आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व एकीकडे धर्म व धार्मिक शिक्षणाची आवळ यामुळेच मुलांमध्ये शिस्त व जबाबदारीची जाणीव कमी कमी होत चालली आहे, सगळे लोक या परिस्थितीत सुधारणा करण्याची भाषा बोलतात  पण प्रत्यक्षांत काहीही केले जात नाही.

खरं तर शिक्षण क्षेत्रात धार्मिक शिक्षणाचा पाया घालणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणांतून संस्कार चांगले घडत असतील तर त्याला 'जातीयवाद' म्हणण्याचे काहीच कारण नाही. किंवा त्यामुळे आपल्या निधर्मीवादाला वाव येईल अशीही भीती बाळगण्याचे कारण नाही अलीकडे घरांघरांतून सुद्धा धर्म आणि धार्मिक शिक्षण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांमधून धर्माबद्दल शिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे.

माझ्या शाळेत आमच्या बालपणी रोज पहिला पाठ असाच धर्म शिक्षणाचा असे. गीता, तुकारामाची गाथा, रामदासाचे श्लोक शिकवले जात, त्याचे पाठांतर होई, अर्थ समजवून सांगितले जात, ते पाठांतर आजही मुखोद्गत व त्याचे संस्कार मनावर कायम आहेत.

या शिक्षणाचे स्वास्थ कसे असावे हा तपशिलाचा प्रश्न आहे. तो ज्या त्या शिक्षण संस्थेने सोडविले तरी चालेल. पूर्वी संस्कृत विषय होता तेव्हा त्या द्वारे थोडा तरी धर्माशी व पाठांतराशी संबंध येई. आता संस्कृत भूतकाळात जमा झाले आहे. मुले यात माणसे न बनता यंत्र बनू लागली आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाबाळांना घडवायचे असेल, नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ती, मातृभक्ती यावे चाड असणारे नागरिक निर्माण करायचे असतील तर शिक्षण संस्थांमधून धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. काही शाळांनी प्रयोगादाखलही हा उपक्रम हाती घेऊन पाहावा. मुलांना या शिक्षणांत गोडीही लागेल आणि त्याचे चांगले परिणामही दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........