एमेसीबीचे दिवे परत आले...

मंद मेणबत्तीच्या गूढगर्भ फिकुटलेल्या प्रकाशात,
चाचपडत उजव्या कोनाड्यातील तळातून तिसरी वही काढली...
आणि कुरकुरत झरणीचा घर्षणजन्य ध्वनी खोलीभर सांडला..
अन् तेवढ्यात,
एमेसीबीचे दिवे परत आले...

सन्नाटा कापीत जाणारी चिरक्या कातर आवाजाची रेल्वेची 'इंजिन'कुई
कानातील भरघोस वाढलेल्या अस्वली केसांनी शोषत ऱ्हासवली...
अन् त्याने शीतकाअभावी घर्मबिंदूंनी ओथंबलेला ललाटप्रदेश खसाखस पुसला
अन् तेवढ्यात,
एमेसीबीचे दिवे परत आले...

मनात भौतिक आणि आधिभौतिकाचे तुंबळ रण माजले असताना...
दिवसभरात थकलेला मंडूक त्याच्या कूपात निद्राराधन करताना...
निशाचर बागुरड्याच्या भयपिशाचाला न घाबरता ती झोपलेली असताना...
भीमसरटांच्या सद्यपिढीतील कन्यका अभक्ष्यभक्षण करताना...
अचानक कोणाच्यातरी श्लेष्मल ध्वनिलहरींच्या गगनभेदी निनादाने मी भयकंपित झालो...
अन् तेवढ्यात,
एमेसीबीचे दिवे परत आले...

                                                                      - चैत्रेचैत अन् हर्षल खगोल

बागुरडा = झुरळ