व्हेज मांचुरिअन

  • भज्यांसाठी- १ वाटी किसलेला कोबी,१ वाटी किसलेली गाजरे,
  • १ टे स्पून आलं मिरची लसूण पेस्ट,१ टीस्पून सोया सॉस,
  • प्रत्येकी १.५ ते २ टे स्पून मैदा व कॉर्नफ्लोअर,मीठ,अजिनोमोटो चवीनुसार,१/२ वाटी भात(शिळा असल्यास उत्तम)
  • तळणीसाठी तेल
  • ग्रेव्हीसाठी - ७/८ लसूण पाकळ्या,बोटभर आलं, ४/ ५ हिरव्या मिरच्या:सर्व बारीक चिरून
  • १टी स्पून मिरपूड ,१टेस्पून साखर, १ ते १.५ टे स्पून सोया सॉस, २ टे स्पून कॉर्न फ्लोअर
  • २कांदापाती बारीक चिरून, १कप पाणी,मीठ,अजिनोमोटो चवीनुसार
  • १ लहान कांदा,१ लहान सिमला मिरची लाल किवा हिरवी
१ तास
२,३ जणांसाठी

कोबी,गाजर एकत्र करणे.मैदा+कॉर्नफ्लोअर त्यात घालणे.आलं,लसूण मिरची पेस्ट घालणे,सोयासॉस घालणे,मीठ आणि अजिनोमोटो चवीनुसार घालणे.सोया सॉस मध्ये मीठ असते आणि अजिनोमोटोही खारट त्यामुळे मीठ घालताना ते लक्षात ठेवणे.
सगळे एकत्र करणे,भात घालणे आणि मळणे.गोळे करणे आणि सोनेरी रंगावर तळून काढणे.एक भजे तळून पाहणे,जर भजे तुटते आहे असे वाटले तर अजून थोडा भात मिश्रणात घालणे व परत मळणे,ह्याने भजी तुटणार नाहीत.

कांदा आणि सिमला मिरची बारीक चौकोनी चिरणे.तेल गरम करून त्यावर कांदा,सि.मिरची परतून घेणे.आलं,लसूण,हिरव्या मिरच्या यांचे तुकडे त्यावर घालणे,परतणे.साखर,मीठ,मिरपूड,अजिनोमोटो,सोयासॉस घालून परतणे.कॉर्न फ्लोअरची अगदी थोड्या पाण्यात पेस्ट करून घेणे ती त्यात घालणे.कपभर पाणी घालून सारखे करणे.४ ते ५ मिनिटे शिजवणे.कांदापात बारीक चिरून घालणे.
सर्व्ह करायच्या आधी १०,१५ मिनिटे ग्रेव्हीत भजी घालणे व सर्व भजी ग्रेव्हीत नीट घोळवणे.
फ्राईड राईस बरोबर गरम गरम सर्व्ह करणे.

फ्लॉवर मांचुरिअन साठी- ग्रेव्ही वरील प्रमाणेच
फ्लॉवरचे तुरे हलके वाफवून घेणे.मैदा,कॉर्नफ्लोअर,सोया सॉस,मीठ,अजिनोमोटो,आले लसूण मिरची पेस्ट एकत्र करणे.पाणी घालून भज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवणे.फ्लॉवरचे तुरे त्यात घोळवून त्यांची भजी तळणे. व ती वरील ग्रेव्हीत घालणे.
चिकन मांचुरिअन- ग्रेव्ही वरीलप्रमाणेच.
फ्लॉवर मांचुरिअन च्या भज्यांप्रमाणे पीठ तयार करणे.चिकन ब्रेस्ट पीसेस त्यात थोडे मुरवणे व भजी तळणे.

मांचुरियनला जरी आपण चायनीज म्हणत असलो तरी ती चिनी आवरणातली भारतीय सुंदरी आहे.

चायनिज गाड्यांवरची आचारी मंडळी