(नेहमीच धडकी भरते...! )

.................................
नेहमीच धडकी भरते...!
.................................

भरदार तुझ्या दिसण्याने
नेहमीच धडकी भरते... !
झाडु घेउनी उभा ज़री
बिन् दिक्कत ही अवतरते... !

तो तुझाच - खोलीमधला
कुरतडला गाउन, सदरा... !
अन् तुझ्याच हाय कृपेने
भार्येचा चढतो पारा... !

या मंत्रभारल्या वेळी
मी इथे एकटा नाही... !
ते तुझेच - उंदिर,झुरळे
मावश्या नि बोके काही... !

ही शांत, सुभगशी संध्या
पण किंचित उदासवाणी... !
ओट्यावर, ज़मिनीवर ना
सांडले दूध वा पाणी... ?

झटक्यात उगवशी केव्हा 
मी वडे,भजी तळताना... !
मोरीत उगवशी माझ्या
कांतीला उजळवताना... !

तू नसूनसुद्धा असशी
अडगळीत, माळ्यावरती... !
खुडबूड सततची चाले
फडताळी, अवतीभवती... !

- चक्रपाणि चिटणीस

.................................
रचनाकाल ः २१ मे २००८
.................................

प्रेरणाः प्राणाची तुळस बहरते