असतेस घरी तू जेव्हा

असतेस घरी तू जेव्हा स्वर बसका बसका येतो
वाढते पोकही माझे, मी बुटका बुटका होतो

असतेस घरी तू जेव्हा बोलतेस भारंभार
ऐकलेच जर मी सगळे होईनच बहिरा ठार

असतेस घरी तू जेव्हा बाथरूम मध्ये बहुदा
ठोठावुन थकतो दार अन ट्रेनही चुकते कितिदा

असतेस घरी तू जेव्हा नोकर मी तुझा फुकटचा
उघडतो दार कुणि येता विझवतोच गॅस कुकरचा

असतेस घरी तू जेव्हा दवडते वाफ तोंडाची
इतक्या उर्जेवर अख्खी धावेल ट्रेन इंजिनची

असतेस घरी तू जेव्हा रेसिपी नवी करतेस
मी गिनीपीग हक्काचा पोटाचा छळ करतेस

असतेस घरी तू जेव्हा मी घरात थांबत नाही
यामुळे आपले भांडण केव्हाही लांबत नाही