स्वप्नामधली पडछाया तू...!

...............................................
स्वप्नामधली पडछाया तू...!

...............................................

तुझी वेदना गहिरी होते
आठवणींच्या उदास प्रहरी
आणि मनाच्या डोहांमधुनी
लहरींमागे उठती लहरी !

कधीच नव्हते पेलणार जे
असे कशाला स्वप्न पाहिले...?
स्वप्न शेवटी स्वप्नच होते...
स्वप्न शेवटी स्वप्न राहिले !

भासलीस तू अशी...तशीही...
कधी शुभ्र पुनवेची माया
खरा चेहरा तुझा कोणता ?
कधी सावळी झिळमिळ छाया !

स्वप्नामधल्या त्या छायेचा...
हात कशाला मीही धरला ?
स्वप्न संपले, पुनव लोपली...
काळोखाचा रस्ता उरला...!

पुन्हा चांदणे पडेलसुद्धा
अजूनही का असे वाटते ?
मावळते ती धूसर आशा
अन् अवसेची रात्र दाटते !

* * *

एकाकीपण हे रात्रीचे
आता अगदी नकोनकोसे
रात्र भोगते माझी दुःखे
मी रात्रीला निमूट सोसे....!

गतस्मरणांच्या मागे मागे
धावधावुनी येई थकवा...
हाती उरते शून्यच केवळ...
...शून्यच केवळ ! आणिक चकवा !!

कधी आस तर कधी निराशा
खेळ खेळती दोन सावल्या
कठपुतळीसम मज नाचवती...
या छोट्याशा, क्षुद्र भावल्या !

* * *

डोहामधले हिरवट पाणी
डोळ्यांमधुनी कधी तरळते...
`बघ पुनवेचे स्वप्नच आता...`
ही अवसेची रात्र बरळते... !

जन्म वाहण्यासाठी नव्हता
अंधारातच जिणे साचले...
सुरुवातीला दोन-चार पण
किरण उगाचच इथे नाचले...!

* * *

खुळाच मी... मज वाटत राही...
त्या किरणांचा खुळा भरवसा
अजूनही मी शोधत बसतो
काठावरती एक कवडसा !

खेळ व्यर्थ हा... तरी कळेना -
- असे कसे अन् का करतो मी ?
स्वप्नामधली पडछाया तू...
तुझी अपेक्षा का धरतो मी ?

प्रदीप कुलकर्णी

...............................................
रचनाकाल ः २० फेब्रुवारी १९९८
...............................................