सहवास

सहवास
अंगणाला लागून असलेली खोली साफ करतांना
नजर सहज खिडकीबाहेर गेली.
एक चिमुकला लव बर्ड खिडकीला लागून असलेल्या वेलासमोर उडतांना दिसला.
गर्द निळ्या पिवळ्या रंगाचे मऊशार स्वेटर घातलेला.
इतका चिमुकला कि तळहातावर बसवून चारी बोटांनी हळूवार लपेटता यावा.
त्याची आपली काहीतरी लगीनघाई सुरू होती.
मधूनच सुर् कन उडून जायचा.
परत येतांना चिमण्या चोचीत एखादेच लहानसे पीस किंवा काडी घेऊन यायचा.
तो जरा दूर गेल्यावर खिडकीच्या काचेजवळ जाऊन पहिले.
वाटले होते त्याप्रमाणे हा सारा उद्योग घरटे बांधण्याचाच होता.

वेलीवर फांद्यांच्या बेचक्यात नुकतेच सुरू केलेले बांधकाम दिसत होते.
बांधकाम कसले! नुसत्याच चार काड्या जमेल तशा खोचलेल्या वाटत होत्या.
कसा काय हा चिमणा घरटे पूर्ण करणार कोण जाणे!
त्याच्या पेक्षा जास्त मलाच त्या घरट्यात येणार्‍या बाळांची काळजी वाटू लागली.

त्यानंतर रोज मला एक चाळाच लागून गेला.
सकाळी व दुपारी स्वारीचे बांधकाम सुरू असायचे.
ते काचेच्या आतून टक लावून पहायचे.
अर्थात पडदा हळूच बाजूला सारून,
आपल्यावर कोणाची पाळत आहे ह्याचा त्याला पत्ता लागू नाही, अशा हळुवारपणे.

सकाळ व दुपार मधले चार पाच तास कुठे गायब असायचा कोण जाणे!
काम देखील अगदी हळुहळूच सुरू होते.
म्हणावा तसा आकारही येत नव्हता.
त्यालाही ते कळत असावे.
कारण दोनदा त्याने रचलेले सारे उचकटून पुन्हा नव्याने सुरवात केली.
रोज पाच दहा मिनीटे काचेआडून का होईना, पण मिळणारा त्याचा सहवास मला खूप आवडू लागला.
कधी वाटायचे, ह्याचे घरटे पूर्ण होऊच नये व रोज मला त्याची ती धांदल बघायला मिळावी.
पण खरतर मलाही ते घरटे पूर्ण होऊन माझ्या अंगणात लव बर्डच्या पूर्ण कुटुंबाचा सहवास मिळावा अशी घाई होतीच.

एक दिवस मात्र काळजी घेऊनही न व्हावे ते झालेच.
लव बर्डचे जवळून दर्शन घडावे म्हणून
मी काचेच्या अगदी जवळ डोके नेले.
आणि हलकासा स्पर्श काचेला झालाच.
काचेचे तेवढेही स्पंदन लव बर्डला जाणवले.
त्याने एक घाबरी नजर आत टाकली.
माझा सर्रकन आत जाणारा चेहरा त्याने पुसटसा पाहीला असावा.
आणि तो भुर्रकन पसारच झाला.
पुन्हा कधीही तिकडे फिरकलाच नाही.
कुठे दुसरीकडे जागा घेतली कोण जाणे!

मला त्याचा सहवास हवाहवासा वाटला तरी, त्याला मात्र माझा सहवास पटला नव्हता.
माणसे पक्षांना सहवासासाठी कोंडून ठेवतात,
हे बहुदा त्या लहानग्या जीवाला माहीत असावे!
....................