६५ टक्के वीज वाचवणारे सीएफएल दिवे

आज जागतिक पर्यावरण दिन. ग्लोबल वॉर्मिंग , पाण्याचे अशुद्धिकरण अशा अनेक समस्यांवर मोठमोठी भाषणे होतील. पण कृतीचे काय ? साध्या बल्बपेक्षा ६५ टक्के वीज वाचवणारे सीएफएल दिवे लावून आपण ग्लोबल वॉर्मिंग रोखू शकतो. तेव्हा एक तरी सीएफएल लाइट लावूया...!

जागतिक तापमानवाढ हा आता नेहमीचा शब्दप्रयोग झाला आहे. ज्या देशाचं ‘ कार्बन क्रेडिट ' जास्त तो अधिक पर्यावरणस्नेही असे मानले जाते. मात्र अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून , घराघरांतून प्रत्येकाने प्रयत्न केले तर कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून भारत जगात आघाडी घेऊ शकेल. यासाठी सर्वप्रथम घरातील साधे बल्ब काढून टाकावे लागणार आहेत. त्याजागी कॉम्पॅक्‍ट फ्लोरोसंट बल्ब वापरले तर वीजबचत तर होतेच , पण प्रकाशनिर्मिती करताना उष्णतेची निर्मितीही कमी होते.

हे बल्ब पूर्वीच्याच होल्डरमध्ये बसवता येतात. या बल्बची मूळ किंमत जरी जास्त असली , तरी ते साध्या बल्बपेक्षा ६५ टक्के वीज बचत करू शकतात. तसेच त्यांचा प्रकाशही डोळ्यांना आल्हाददायक वाटतो. एक सीएफएल दिवा सामान्यतः पाच वर्षे टिकू शकतो.
भारतासारख्या देशात प्रत्येक कुटुंबाने जरी एक साध्या बल्बच्या जागी सीएफएल दिवा लावला तर , रस्त्यावरून लाखो कारनी केलेल्या प्रदूषणाची भरपाई करता येण्यासारखी आहे.

एका पाहणीनुसार प्रत्येक घरामध्ये किमान एक साधा बल्ब वापरला जात आहे. त्या जागी सीएफएल बल्ब बसवला , तर वर्षाला १६ मेगावॉट वीज बचत करता येणे शक्‍य आहे. भारतातील प्रत्येक घरातील किमान एक साधा बल्ब बदलून तिथे सीएफएल बल्ब वापरला गेला तर १५ लाख अतिरिक्त घरांना प्रकाश देता येईल. या एका बल्बमुळे वीजबचतीत महिन्याकाठी किमान १७ रुपये बचत होणे शक्‍य होईल.

या पाहणीनुसार भारतातील घरांमध्ये सीएफएल बल्ब वापरण्याची सक्ती केली आणि ते बल्ब वापरले गेले तर कार्बनचे वार्षिक उत्सर्जन ५५ दशलक्ष टन कमी होईल. त्यामुळे २०१० पर्यंत साध्या बल्बवर बंदी आणण्याची त्यांची मागणी आहे. साधा बल्ब जी ऊर्जा तयार करतो , त्यातील ९५ टक्के ऊर्जा उष्णतेत रूपांतरित होते. तर केवळ ५ टक्केच ऊर्जा प्रकाशात रूपांतरित होते. सध्या हा बल्ब बाजारात १२० ते १५० रुपयांमध्ये मिळतो. फक्‍त सीएफएलचा एक मोठा धोका म्हणजे यामध्ये ५ एमजी पारा असतो. हा बल्ब फुटल्यास त्यापासून धोका होऊ शकतो. त्यामुळे गेलेला बल्ब योग्यरीत्या लहान मुलांपासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी

- ऑर्गनिक भाजीपाला , धान्यच खरेदी करा. रासायनिक खतांमुळे जमिनीचे आणि पर्यावरणाचे प्रदूषण होते. सेंद्रिय भाजीपाल्याची मागणी वाढल्यास पर्यावरणासही लाभ होईल.

- वाहनातील चाकात योग्य हवा राखा. कमी हवा ठेवल्यास इंधन अधिक खर्च होते. परिणामी प्रदूषण वाढते.

- झाडे हवेतील मुक्त कार्बन बंदिस्त करून ठेवतात. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दारासाठी , खिडक्‍यांसाठी लाकडी चौकटी वापरल्या गेल्या तर मुक्त कार्बनचे प्रमाण कमी राखण्यास मदत होईल.