पेरुचा

उन्हाळ्याची सुट्टी संपत आली होती. जवळजवळ महिनाभर घराबाहेर हुंदडल्यावर शेवटच्या २-४ दिवसात घरातच राहणे पसंत केले ह्या तिघींनी, विशेषतः दुपारच्या वेळी.

वैशाली, योगिता व प्राची एकमेकींशी भांडुनही पकल्या होत्या. आता काय करायचे हे एक मोठे प्रश्नचिन्हचं होते. आईच्या मागे टकळी लावुनही काही उपयोग नव्हता. एवढ्यात बेल वाजली.

"येस"! तिघी किंचाळल्याच आणि चपळाईने दार उघडले गेले. पाहतात तर काय, चक्क बापुमामा उभा!!!

"वा, ये ना मामा. या सुट्टीत तू आत्ता उगवतोयस, काही वाटते का? ". तिघींचा नाराजीचा सूर उमटला.

मामांच्या चाणाक्ष नजरेतून मुलींची एकमेकींना झालेली नेत्रपल्लवी अर्थात सुटली नाही...

आईने गूळ-पाणी दिले व चहाच्या आधणाची तयारी सुरू झाली.

मुलींनी त्यांची टेप चालू करायच्या आधीच, मामा म्हणाले, "जा प्राची, पटकन ३ पेन, ३ रुमाल व ३ चाव्या घेऊन ये".

'त वरून ताकभात' ओळखण्याची सवय तिघींना चांगलीच झाली होती.

मामांनी त्या वस्तुंच्या साहाय्याने एक छान कोडे तयार केले व तिघी साधारणपणे तासभर एका जागी न भांडता गोंद लावल्याप्रमाणे खिळून राहिल्या. कोडे सुटले आणि मामाचीही सुटका झाली.

अरेच्या, मी नुसती गोष्टच सांगत बसलो. ते कोडे काय आहे, याची उत्सुकता आहे ना?

व्य. नि. द्वारे कोड्याचे उत्तर नक्कीच पाठवा.

कोडे

३ पेन, ३ रुमाल, ३ चाव्या या वस्तुंची मांडणी अशी आहे :

           पे रु चा पे रु चा पे रु चा

आता ही मांडणी बदलून अशी दिसायला पाहिजे :

          चा चा चा रु रु रु पे पे पे

प्रश्न :

१. कमीतकमी किती प्रयत्नात ही मांडणी बदलता येईल?

२. कशी बदलली तेही दाखवा?

मात्र हे करताना खाली दिलेल्या नियमांचा वापर अत्यावश्यक आहे :

नियम १ : एकावेळेस एक जोडी हालविता येईल. जोडी बनविताना एका वस्तुच्या डावी अथवा उजवीकडीलच वस्तु वापरली जावी आणि ती विरुद्ध प्रकारची असावी. म्हणजे, "पे रु" ही जोडी वैध तर "पे पे" ही जोडी अवैध.

नियम २ : एक जोडी हालविल्यानंतर त्याच्या डावी अथवा उजवीकडे दुसरी वस्तू असणे आवश्यक आहे. मोकळी जागा असली तर अवैध. म्हणजे, मांडणी "पे रु    चा पे रु पे चा रु चा" अवैध, तर "पे रु चा पे रु पे चा रु चा" वैध.

नियम ३ : जोडी हालविताना त्याचा क्रम बदलला तर अवैध. म्हणजे जोडी "पे रु" अशी असेल आणि हालविल्यावर तीच जोडी "रू पे" अशी दिसेल तर अवैध, "पे रु" अशी दिसल्यास वैध.