रामायण...

इथे कोणीच नाही राम किंवा रावण
तरी चालूच आहे आजही रामायण...

सुरू झालेत मोर्चे, घोषणा अन भाषणे
खरे नाहीच काही आखलेले धोरण...

जरी श्रीमंत झाले आणखी श्रीमंत हे
तरी होतेच आहे पीडितांचे शोषण...

किती झाले बरे मी एकटा आहे इथे!
मला दुनिये, तुझी तर होत होती अडचण...

कसा येईल वारा बाग ही फुलवायला?
जरा हटवा शिवाराभोवतीचे कुंपण...

दिसेनासाच झाला चेहरा माझा मला
किती बेभरवशी झाला असे हा दर्पण...

मजा चाखून घे तू जीवनाची या क्षणी
कधी सांगून येतो का अखेरीचा क्षण?...

नको पाहू 'अजब' तू स्वप्न मोठे व्हायचे
तुला सोसेल का हे बेगडी मोठेपण?...