फोनची रिंग वाजू लागली आणि तो कोणाचा असेल याची जवळ जवळ खात्रीच असल्यामुळे आम्ही दोघेही तो घेण्यासाठी धावलो. आमच्या अंदाजाप्रमाणे तो सुजितचा म्हणजे आमच्या अमेरिकेतील मुलाचा होता. "काय चाललेय" त्याने नेहमीप्रमाणे विचारले पण त्यानंतर त्याने विचारलेल्या प्रश्नाने आम्ही एकदम चकितच झालो. कारण तो प्रश्न होता " काय भूमकरांकडे चोरी झाली म्हणे" "अरे ही काय इंटरनॅशनल न्यूज आहे की काय? म्हणजे भूमकर औरंगाबादला, आम्ही पुण्याला आणि त्यांच्याकडे चोरी झाल्याची बातमी आम्हाला कळण्याअगोदर अमेरिकेत तुला कशी काय कळली? " मी आश्चर्याने विचारले. या विचारण्यामागे आमच्याअगोदर ही बातमी अमेरिकेतल्या माझ्या मुलाला कळावी या आश्चर्यापेक्षाही भूमकरांकडे चोरी व्हावी याचेच जास्त आश्चर्य होते.
भूमकरांकडे चोरी होणे म्हणजे एकाद्या अभेद्य किल्ल्याला खिंडार पडणे असा माझाच काय पण आमच्या सगळ्यांचा आणि त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्याही सर्वांचा समज होता. आणि त्यात तथ्यही होते. आम्ही औरंगाबाद सोडण्याचा निर्णय केल्यावर त्यानी माझ्याकडून घर विकत घेतले. त्यावेळी आमच्या घरात यापूर्वी चोरीचे बरेच प्रयत्न झाले ( आणि त्यात चोराला काहीही मिळाले नाही हेही) ऐकून घेतल्यावर पहिले काम त्यानी काय केले असेल तर आमच्या ( म्हणजे आता त्यांच्या) घराच्या खिडक्यांना प्रथम लोखंडी जाळी असूनही त्यावर त्याहून आणखी मजबूत जाळी बसवून घेतली. जिन्यातून घरात प्रवेश करता येत होता म्हणून तो त्यांनी सरळ भिंत घालून बंद केला. व्हरांड्याला जाळी होती तीही त्यानी बंद करून टाकली. गेटची जागा बदलून टाकली ज्यामुळे ते हॉलच्या दारासमोर आल्यामुळे त्यावर सर्वांचे लक्ष राहू लागले. याशिवाय घराच्या ज्या खोल्या बाहेरच्या अंगास होत्या त्यामधून मधल्या खोल्यात येणाऱ्या सर्व लाकडी दरवाजांना दुकानात बसवतात तशी रोलिंग शटर्स त्यांनी बसवून घेतली. शिवकाळात ते असते तर किल्ल्याचा बंदोबस्त कसा करावा याचे प्रशिक्षण त्यानी मावळ्यांना नक्की देऊ केले असते.
आम्ही पुन्हा काही दिवसांनी औरंगाबादला त्यांच्याकडे गेलो तेव्हां त्यानी मोठ्या अभिमानाने आमच्या ( अजूनही ते आमच्याशी बोलताना तुमचा बंगला असाच उल्लेख करायचे) बंगल्यास कशी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करून घेतली आहे हे प्रत्येक शटर वरखाली करून अभिमानाने दाखवले होते, आणि चोर आलेच तरी सगळे सुरक्षाकवच भेदून त्यांना घरात शिरायला किती वेळ लागेल याचे वर्णन करून तेवढ्या वेळात पोलिसांचे पथक घराला वेढा देऊ शकेल असा आशावादही व्यक्त केला आणि त्यांच्या कमिशनरपर्यंत ओळखी असल्यामुळे त्यांच्याकडे चोरी झाली तर पोलिसपथक नसले तरी एकादा पोलिस तरी फिरकेल अशी शक्यता असल्यामुळे मीही तो मान्य केला. सुदैवाने त्यांच्याकडे स्टॉपवॉच नव्हते नाहीतर त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक करताना वेळ किती लागतो याचेही प्रात्यक्षिक करून दाखवले असते. त्यामुळे एक वेळ राष्ट्रपतीभवनात किंवा अमेरिकन अध्यक्षांच्या घरी चोरी होईल पण भूमकरांकडे होणार नाही अशी आमची खात्री होती, अशा परिस्थितीत ती व्हावी आणि वर ही बातमी अगोदर आमच्या अमेरिकेतल्या मुलाला अगोदर कळावी ही आश्चर्याचीच गोष्ट नव्हती का?
त्यामुळे औरंगाबादला गेल्यावर प्रथम त्यांच्याकडे जाऊन त्यांचे सांत्वन करणे आवश्यक होते. उडत उडत कळलेल्या बातम्यांवरून त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले एक लाख रुपये चोरीस गेले होते असे माहीत झाले होते. एक लाख ही काही आजकालच्या काळात फार मोठी रक्कम नाही तरी अगदीच दुर्लक्षित करण्यासारखी तरी निश्चितच नव्हती. आम्हाला पाहताच भूमकरांनी पूर्वीच्याच उत्साहाने आमचे स्वागत केले. त्यामुळे त्यांच्याकडे चोरी झाल्याबद्दल दुःख व्यक्त करण्याऐवजी त्यांचे अभिनंदन करावे अशी त्यांची अपेक्षा होती की काय अशी शंका मनात डोकावून गेली. पण त्याचवेळी त्यांच्या नातवाने आय. आय टीला प्रवेश मिळबण्याचा पराक्रम केल्यामुळे ते त्या आनंदात होते त्यामुळे आम्हालाही खरोखरीच त्यांचे अभिनंदन करण्याची चांगली संधी मिळाली.
शेवटी आम्हाला चोरीविषयी विचारणा करायला लागण्यापूर्वी त्यांनी्च तो विषय काढला आणि मग मला छळणारा प्रश्न मी त्यांना विचारला, " येवढी कडक सुरक्षाव्यवस्था करूनही अशी चोरी कशी झाली? " " काय सांगू साहेब, " ते सांगू लागले; "घर अगदी सुरक्षित राहूनच चोरी झाली" आणि माझा प्रश्नांकित चेहरा पाहून ते पुढे म्हणाले. " अहो, संध्याकाळची वेळ होती. आम्ही दोघे एका कार्यक्रमासाठी बाहेर गेलो होतो घरात आमच्या मातोश्री झोपल्या होत्या समोर आमचा नेहमीचा विश्वासू सहाय्यक झाडांना पाणी घालत होता. आणि घरी परत येऊन पाहतो तो ही चोरी झालेली" हे ऐकल्यावर हा भुताटकीचा प्रकार तर नव्हे ना असे आम्हाला वाटले पण आमच्या कल्पनाशक्तीला अधिक ताण द्यायला न लावता त्यानी आम्हाला, " चला चोरी कशी झाली तेच तुम्हाला दाखवतो" हे ऐकल्यावर त्यांच्या घरच्या चोरीचे व्हिडिओशूटिंग झी टी. व्ही. ने घेऊन त्याची सीडी त्यांना दिली की काय अशी शंका मला आली.
पण त्या ऐवजी त्यानी आम्हाला बाहेर अंगणात नेले आणि तेथील झाडांकडे बोट दाखवून त्यांनी आम्हाला सांगितले, " या झाडांना आमचा सहाय्यक पाणी घालत होता" त्यावेळीही तो पाणीच घालत होता. हा बंगल्याचा समोरचा भाग होता. नंतर घरात नेऊन त्यांनी त्यांच्या मातोश्री ज्या खोलीत विश्रांती घेत होत्या ती खोली दाखवली आणि त्या खोलीशेजारची खोली दाखवून ते म्हणाले, " या समोरच्या खोलीत लोखंडी कपाटात सेफमध्ये मी एक लाख रुपये ठेवले होते" त्यावेळी त्या खोलीला कुलूप होते आणि कुलूप असताना चोरी करणे शक्य नाही असा माझा समज असल्यामुळे, " मग त्यावेळी खोलीला कुलूप नव्हते की काय? " असे मी विचारताच " छे छे त्यावेळीही खोलीला आम्ही कुलूप लावूनच बाहेर गेलो होतो " असे त्यांनी सांगितल्यावर " मग चोर आत गेले कसे? " असे मी विचारल्यावर" अहो ते आत गेलेच नाहीत" असे त्यानी उत्तर दिल्यावर अगदी बिरबल आणि अकबर यांच्या गोष्टीतील चतुर चोरच हा असावा असे मला वाटू लागले आणि त्यामुळे. " मग चोरी झाली तरी कशी? " असा प्रश्न माझ्या तोंडून बाहेर पडला कारण त्यावेळपर्यंत ही चोरी झाली की नाही किंवा स्वतः भूमकरांनीच प्रसिद्धीचा स्टंट म्हणून ती चोरी केली की काय असे मला वाटू लागले होते, पण भूमकरानी मला लगेचच " चला तेच तर तुम्हाला दाखवायचे आहे" असे म्हणत जवळजवळ माझ्या हाताला धरून ओढतच पुम्हा घराबाहेर नेले.
त्यांचा विश्वासू सहाय्यक अजूनही पाणी घालत होताच. त्याच्यासमोरूनच आम्ही बंगल्याच्या मागच्या बाजूस गेलो आणि ज्या खोलीत ते कपाट ठेवलेले होते त्या खोलीच्या मागच्या बाजूस आम्ही आलो. तेथील खिडकी ज्या खोलीत चोरी झाली त्या खोलीत उघडत होती. यावरून ही खिडकी तोडून चोर आत शिरले असावेत असा मी तर्क केला. पण त्या खिडकीसही आम्ही लावलेल्या लोखंडी जाळीवर आणखी एक भक्कम लोखंडी जाळी भूमकरानी बसवलेली होती आणि ती अगदी जशीच्यातशी होती, यावरून चोरीनंतर ताबडतोबीने त्यांनी त्या जाळीची दुरुस्ती करून घेतली असावी असा मी अंदाज बांधला. पण तो चुकीचा होता हे पुढे कळले.
"हा बांबू पेरू काढण्यासाठी आम्ही पेरूच्या झाडाखालीच ठेवतो तो त्यादिवशीही इथेच होता" भूमकरांनी त्या खिडकीखाली पडलेला बांबू उचलत आपली रनिंग कोमेंट्री सुरू केली. त्या बाबूला पुढे लोखंडी आकडा लावलेला होता. आता ते काय करतात हे आम्ही उत्सुकतेने पाहत राहिलो. खिडकीची दारे बंद करून घेण्यासाठी जाळीला ठेवलेल्या चौकोनी छिद्रातून तो बांबू आत ढकलून त्या खिडकीशेजारी ठेवलेल्या कपाटाच्या खालच्या भागात आकडा खुपसून त्यांनी थोडा जोर लावून तो बाहेर ओढल्यावर कपाट अगदी हळुवारपणे सरकून खिडकीसमोर आले. बांबू कपाटाखालून सोडवून बाजूला टाकून त्याच भोकातून त्यानी हात आत घातला आणि कपाटाची दारे उघडत " आम्ही त्यादिवशी खोलीचे दार बंद केले पण कपाटाला मात्र कुलूप लावायचे विसरलो" अशी कबुली देत तशीच कपाटातील तिजोरी उघडून त्यातील पर्स काढून त्यानी "त्यादिवशी आमच्या पाक्षिकासाठी कागद घ्यायचा होता म्हणून काढलेले एक लाख रुपये या पर्समध्ये ठेवले होते. चोरांनी अशी पर्स काढून पैसे काढून येथेच ती टाकून दिली"असे सांगून पर्स जवळ ठेवत पुन्हा परत घरात शिरण्याच्या तयारीने ते वळले. आता इतके प्रात्यक्षिक झाल्यावर चोरी कसी झाली याविषयी आमच्या मनात काही शंका उरली नसली तरीही माझ्या मनात एक किडा वळवळत होताच त्यामुळे "पण इतके सगळे घडत असताना समोर तो तुमचा विश्वासू माणूस पाणी घालत होता त्याचे मुळीच लक्ष गेले नाही? शिवाय हे एकाद्या माहीतगार व्यक्तीचेच काम असणार " मी शंका व्यक्त केली.
यावर काय बोलावे याविषयी त्यांच्या मनात असलेला संदेह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेला दिसला. पण थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, " चला आत जाऊ आणि मग बोलू" पाणी घालणाऱ्या त्यांच्या विश्वासू सहाय्यकाला पार करून आम्ही घरात शिरलो आणि ते परत बोलू लागले, " अहो प्रत्येक जण मला हाच प्रश्न विचारतोय. इतकेच काय पोलिस कमिशनर माझ्या परिचयाचे आहेत तेही म्हणाले की थोडा वेळ या माणसाला आमच्या ताब्यात द्या बघा त्याला लगेच बोलते करू. तुमचे पैसे परत मिळतील. पण आमची परिस्थिती कशी आहे हे तुम्ही पाहताच. आम्ही दोघांनी आता सत्तरी पार केली आहे. आमच्या ८५ वर्षाच्या वृद्ध मातोश्रीं जवळ जवळ झोपूनच असतात त्यांना हा आणि त्याची पत्नी दोघे व्यवस्थित संभाळतात. त्याच्यावर आम्ही पूर्णपणे विसंबून आहोत. नुसत्या चौकशीसाठी त्याला घेऊन गेले तर लगेच आमचे हातपाय मोडल्यासारखे होईल. इतकी वर्षे त्याने घरच्या आणि पेपरच्या कामात मला बहुमोल मदत केली आहे. चोरी प्रत्यक्ष त्याने केलेली नाही हे उघडच आहे. एक शक्यता आहे की त्याच्याकडून माहिती फुटली असेल की त्या कपाटात एक लाख रुपये आहेत. शिवाय त्या खोलीला कुलूप लावून कपाटाला मात्र कुलूप न लावण्याचा मूर्खपणा आमच्याच हातून घडला नसता तर ही चोरी झालीच नसती. आता ते पैसे तर गेलेच वर आता ही माणसेही गमावण्याची माझी इच्छा नाही. "
" बरोबर आहे आपण म्हणता ते, या माणसांची किंमत तुमच्या दृष्टीने त्या एक लाखापेक्षा कितीतरी जास्त आहे"
मी मनात म्हणालो.