एकच वाक्य

राजा चक्रमादित्याला तो स्वतः महंमद तुघलकाचा जत्रेत हरवलेला भाऊ असल्याची खात्री होती. आणि तीच खात्री इतरांनाही व्हावी याबाबत तो हरप्रकारे यत्न करीत असे. मग त्यापायी कायद्याचा चोळामोळा झाला तरीही त्याची हरकत नसे.

एकदा राजकोषागारातील संपत्ती चोरून देशाबाहेर नेणाऱ्या खजिनदाराला कर्तव्यकठोर न्यायाधीशांनी देहांत प्रायश्चित्त सुनावले. अशा प्रकारचे धाडस कुणीही परत करू नये म्हणून ते गरजेचे होते असे न्यायाधीशांचे मत होते. पण चक्रमादित्याला मध्येच त्याचे (अंमळ फताडे) नाक खुपसण्याची लहर आली.

त्याने त्या खजिनदाराला आपल्यापुढे पेश करण्याचा हुकूम केला. आणि आपले प्राण वाचू शकतील की काय या आशेने त्याच्याकडे पाहणाऱ्या त्या खजिनदाराला त्याने सांगितले, "तुला जीव वाचवण्याची एक संधी द्यावी असे मनात आले आहे. तुला एक वाक्य बोलावे आणि बोलावेच लागेल. ते जर खरे असले, तर तुला हत्तीच्या पायी देण्यात येईल. आणि जर खोटे असले, तर तोफेच्या तोंडी देण्यात येईल. ज्याची सत्यासत्यता पडताळून पाहता येणार नाही असे वाक्य, उदा. "माझ्या स्वप्नात काल रात्री वाघ आला होता" बोलल्यास यातील कुठलीही एक शिक्षा चिठ्ठी काढून देण्यात येईल. बोल तुझे वाक्य."

देशाबाहेर संपत्ती नेणारा तो खजिनदार लोभी असला तरी मूर्ख नव्हता. सुटका एका वाक्यावर असल्याने त्याचे डोके अधिकच झपाट्याने चालू लागले. आणि काही क्षणांतच त्याने त्याचे वाक्य उच्चारले.

त्याला जिवंत सोडण्यावाचून चक्रमादित्याला दुसरा पर्याय उरला नाही.

काय होते ते वाक्य?