ह्यासोबत
बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!!
हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले. ढगाळ वातावरण असूनसुद्धा जवळच कुठेतरी पायी चक्कर मारायला निघण्याचा मनसुबा मनात डोके वर काढत होताच, पण आपण बाहेर निघा अन् लगेच वीजूताईने वाकुल्या दाखवत परत या हे होऊ द्यायची माझी अजिबात ईच्छा नव्हती! पण काही-काही वेळाच अशा असतात की त्या आपला पुरेपूर अंत पाहतात!! आता जगात डास हा प्राणी(?) कशाला अस्तित्वात आला असावा हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्याचे मला पुन्हा मनापासून स्मरण व्हायलाच हवे, असे त्यास नेमके तेव्हाच का वाटावे?? शेवटी मुकाट उठलो जागचा, बाहेर चक्कर मारण्यासाठी!!
ढगाळ वातावरण अन् १०-१०.३० ची रात्रीची वेळ यामुळे तशी रस्त्यावर बऱ्यापैकी सामसूम होती. बेटे रस्त्यावरचे दिवे मात्र चांगले उजेड पाडत होतेत अन् तिकडे आमच्या कॉलोनीत अंधाराचे साम्राज्य! (लगेहाथ इलेक्ट्रीसिटी बोर्डावरही वैताग काढून झाला!) नाही म्हणायला रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून लोक अभ्यास कसा करत असतील, असा आगंतुक प्रश्नही मनात डोकावून गेला. पण मी त्या रस्त्यावरच्या दिव्याखाली बसलोय अन् पुस्तक वाचतोय, असे काहिसे न पचणारे वाचनप्रिय(!) विचार मनात आल्याबरोबर मूळ विचार एकदम रद्द करून टाकला! मुख्य रस्त्यावर एव्हाना कुत्र्यांची वर्दळ चालू झालेली दिसू लागली! बाकी आपल्यासारख्या वैतागणाऱ्या माणसांच्या रात्रीच्या झोपेचे खोबरे करण्यासाठीच ही भटकी कुत्री निर्माण केल्या गेलेली आहेत, अशी शंका गेले काही दिवस मला येऊ लागलेली.
रस्त्याच्या कडेने जात असताना दिसले, एका दिव्याच्या खाली थोड्या बाजुला एक म्हातारी भिकारीण तिच्या रात्रीच्या बिछान्याची तयारी करत होती. एक मरतुकडे कुत्रे तिच्या आसपास रेंगाळत उभे होते. त्या दिव्याच्या भोवती किड्यांनी कोंडाळे केल्यामुळे त्याचा प्रकाशही अंधुकसा होत होता. ठिगळं लावलेल्या दोन फाटक्या पिशव्या हीच तिची काय ती संपत्ती असावी. अंगावरल्या चादरीने(?) फुटपाथवरची थोडी जागा साफसूफ करण्याच्या प्रयत्नात ती होती. तेवढ्यात परत वीज जोराने कडाडली. त्याचबरोबर ते जागजागी फाटलेले तिचे कपडे अन् चादर बघून वास्तवातील प्रखरतेच्या त्या क्षणमात्र जाणिवेने मात्र, माझा वैताग धाडकन जमिनीवर येऊन आदळला. रात्री केव्हाही पाऊस पडेल असे वातावरण होते. त्यापरिस्थितीत पाऊस पडल्यावर ती काय करणार अन् कसा स्वतःचा बचाव करणार या विचाराने मन गलबलून आले. तिला वैताग होत नसेल का? तिची चिडचिड होत नसेल का? असे एक ना दोन अनेक प्रश्नांचं काहूर मनात दाटून आलं. म्हटलं ४ दिवस माझा वैताग होतोय तर माझी चिडचिड मला स्वतःला जाणवण्याइतपत वाढलेलीये.. अन् इथे तिला तर वैताग म्हणजे दररोजचा साथ-संगत करणारा मित्र होता.
सुन्न मनस्थितीत माझी पावले केव्हा घराच्या दिशेने वळलीत हे देखिल मला कळले नाही. घरी पोचलो तर वीज अपेक्षेप्रमाणे आली होती. पण आता ती वाकुल्या दाखवत नव्हती! निदान आजतरी पुस्तक वाचण्याची गरज राहिली नव्हती. क्षणमात्र का होईना, पण एक जिवंत बाड मी अनुभवून आलेलो होतो.
मुमुक्षू