जगलेले अनुभव - २

        पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून जागा झालो... घड्याळात बघितले तर जेमतेम पाच वाजत होते. तसा मी उठण्याच्या बाबतीत आळशी, पण त्या दिवशी झोप नाही लागली परत. बिछान्यात पडल्या पडल्या, तो किलबिलाट लक्ष देऊन ऐकू लागलो. कितीतरी पाखरे चिव-चिव करत होती. त्यातले कोण कुणाला काय काय म्हणत असेल, अन् ते ज्याचे त्याला कसे अचूक समाजात असेल असा प्रश्ना मला पडला. मग म्हटले, आपलेही असेच होत नाही काय? सतत इतके आवाज ऐकू येत असतात पण आपण आपले काम अचूक करू शकतो ना.. मग पाखरांचेही तसेच व्हायला काय हरकत आहे!!
        पाखरांचा विचार करता करता आठवलं, आमच्या घरी बाबांनी मोठ्या हौसेने एक राघू आणला होता. लहानपणी त्याच्याशी तासन् तास गप्पा मारणे हा माझा आवडता छंद! शाळेतून आल्याबरोबर आधी त्याची वास्त-पुस्त नि मग बाकीचे काम!! आजीने त्यावेळेस रामायण वाचण्याचा नेम केलेला होता. तेव्हा त्याचा पिंजरा जवळ घेऊन ती आतल्या खोलीत वाचत बसायची. रात्री मग रामायणातल्या गोष्टी तिच्याकडून ऐकण्यासाठी अभ्यास झटपट उरकून, मग आजीजवळ जाऊन बसायचे, तिच्याजवळ गोष्ट सांग म्हणून भुणभुण-भुणभुण लावायची!! "झोपताना सांगेन" हे तिचे ठरलेले उत्तर असल्यामुळे आपली लवकर झोपण्याचीही तयारी असायची . तिच्यामुळे रामायण नि नंतर महाभारतातल्या सगळ्या गोष्टी मला लहानपणीच माहीत झालेल्या.
        बाकी आजीचा गोष्टी रंगवून सांगण्यात अगदी हातखंडा होता. जास्त शिकलेली नसूनसुद्धा कितीतरी गोष्टी तिला माहीत होत्या. श्रावणबाळाची गोष्ट, पुंडलिकाची गोष्ट.. या गोष्टी ऐकतांना मी कितीदातरी हमसून-हमसून रडलोय! जात्यावरच्या ओव्या अन् बरेच अभंग तिला माहीत होते. बऱ्याचदा ती ते अभंग म्हणायची. मस्त वाटायचे एकदम. तिची देवपूजा म्हणजे अगदी बघण्यासारखी असायची. इतक्या प्रेमाने पूजा करताना मी क्वचितच कुणाला पहिले आहे. आज मी प्रयत्न करतो तसा पण ती सर येत नाही. प्रेम रुजावे लागते म्हणतात ना... ते हेच!
        प्रेमासाठी प्रत्येक प्राणी किती तळमळत असतो याची मी कित्येक उदाहरणे बघितलीत. माझ्या एका मित्राकडे एक कुत्रा आहे, छोटू. घराजवळच, अत्यंत जखमी अवस्थेत, हा छोटू त्यांना सापडला. मित्राच्या वडिलांनी, 5-6 दिवस सुट्टी काढून घरी बसून, त्याची खूप सुश्रुषा केली; ज्यामुळे तो जगला. तेव्हापासून त्याला त्यांचा एवढा लळा आहे की त्यांच्या शिवाय तो जेवतही नाही. त्यामुळे ते 1-2 दिवसाहून जास्त दिवस कुठे बाहेरगावीही जाऊ शकत नाहीत, कारण हा घरी भुकेला असतो!! काय नाते असते पहा!!
        ...
        ...
        अचानक 6 वाजताचा घड्याळाचा ठोका पडला अन् भानावर आलो. कुठून विचार सुरू झाला अन् कुठे येऊन थांबलो मी!! स्वतःच्या नकळत, त्या एका तासात मी अख्खे जग फिरून आलोय, माझे अनुभव सगळे परत जगून आलोय, असे वाटायला लागले. खूप प्रसन्न वाटत होतं तेव्हा! बाकी मनाचे विभ्रम फार मजेदार असतात. त्रयस्थपणे बघत बसावे, दुसऱ्या विरंगुळ्याची गरजही पडणार नाही कदाचित. कुठेतरी वाचलेल्या एका चारोळीत त्याचे सुरेख वर्णन सापडते-

        भावना अन् वस्तुस्थितीत,
        एक छोटी गफलत असते!
        मनाच्या प्रांगणात,
        भावनाच वस्तुस्थिती असते!!

मुमुक्षू