गुलमोहोर - २

मी ज्योत्स्नाताईला टिपू आणि मोटवानी आजोबा यांचा किस्सा रंगवून सांगायच्या बेतात होतो, तोच आईने "ज्योत्स्ना, तू तरी अभ्यास घे बाई ह्याचा. दिवसभर नुसता उंडारत असतो वांडपणा करत" असे भलतेच बोलणे काढले. सुट्टीला वेळेवर कोंकणात न गेल्याने तिलाही फारच अस्वस्थ वाटू लागले होते बहुतेक. तिलाही सायकल शिकवावी का, असा एक विचार केला, पण आमच्याकडे लेडीज सायकल नव्हती.

पण ज्योत्स्नाताईने त्याला वेगळीच कलाटणी दिली. "अहो आशाकाकू, मी काय शिकवणार त्याला? आता चांगला आठवीत जाईल तो, तोच शिकवेल मला. हो की नाही सर? " मी आणि सर? मला तर हसू आवरेना.

तेवढ्यात मला एक गणिती कोडे आठवले. ते मी तत्परतेने तिला घातले "मकरंद मिलिंदला म्हणाला, की मी जेव्हा तुझ्याएवढा होतो, तेव्हा तुझे जे वय होते त्या वयाच्या दुप्पट आत्ता माझे वय आहे, आणि या वर्षापासून मला एस्टीत हाफ तिकिटाऐवजी फुल तिकीट काढायला लागते आहे. तर माझे वय काय? " ज्योत्स्नाताईचा गणित हा विषय कच्चा होता बहुतेक. तिने सपशेल माघार घेतली. "जाऊ दे ना रे. आता परीक्षा दिल्यावरही कशाला नसती कोडी घालतोस? ".

आई तत्परतेने तिच्या मदतीला आली. "काही वागायबोलायचा पाचपोच असेल तर ना..... नको तिथे आचरटपणा करत असतो नुसता. आव तर असा आणतोय की गणितात भारीच गती आहे स्वतःला. वर्गात पहिला आला म्हणून काय झालं? म्हणतात ना, 'गावंढ्या गावात गाढवी सवाशीण' तशातली गत". आईला सायकल शिकवायलाच हवी होती. नाहीतर कोंकणात पोचेस्तोवर तिने फारच वात आणला असता. तात्या मधून मधून तिच्याबरोबर भांडतात ते अगदी अगदी बरोब्बर आहे असे त्यांच्या पुढच्या भांडणाच्या वेळेला सांगून टाकायचे असे मी ठरवले.

पण ज्योत्स्नाताईने त्या अडचणीतून माझी सुटका केली. "जाऊ द्या नं कौस्तुभभाऊ, कायाला उगाच चिंता करून राहिले? " तिचे गाव मूळ इकडचेच कुठलेतरी पाचोरा की पारोळा की कायसे. तिचा जन्म आणि आतापर्यंतचे शिक्षण पुण्यात झालेले होते आणि एक वर्षापूर्वीच ते इकडे बदली होऊन  आलेले होते. पण मधूनच आपले मूळ पाणी दाखवायची तिला हुक्की येई. "तर सांगून टाका नं पटापट.... ट्वेंटी एलेफंटस हॅव ट्वेंटी फोर हेडस.... हाऊ इज इट पॉसिबल? " मी बराच विचार केला. दोन डोक्यांचे हत्ती? नाही..... काहीतरी चुकत होते. त्यातला एक गणपती आहे असे म्हटले, तरी गणपतीला कुठे ब्रह्मदेवासारखी तीन तीन डोकी असतात? आणि जर दोन डोक्यांचे हत्ती असतीलच, तर ते चारच का? गडबड होती काहीतरी हे निश्चित. शेवटी मी ठसक्यात सांगून टाकले, "त्यांना डोकी वीसच आहेत, पण तुझे गणित कच्चे आहे". हसहसून तिचा अंबाडा सुटायला आला.

ज्योत्स्नाताई तशी दिसायला चंट होती. सावळा रंग, सडसडीत बांधा, तपकिरी रंगाचे डोळे, आणि हसताना गालाला पडणाऱ्या खळ्या. माझे सगळे नातेवाईक झाडून गोरे लख्ख आणि घारुटले असल्याने मला सावळ्या रंगाचे आपरूक होते. नाही म्हणायला तात्यांचा गोरा रंग उन्हात हिंडल्याने (त्यांना कुणी म्हणणार नाही 'उंडारताहेत' म्हणून.... आम्हाला मात्र..... ) रापला होता, पण सावळ्या ऐवजी तो गव्हासारखा लाल झाला होता.

ज्योत्स्नाताई आली होती टिंड्यांच्या भाजीची कृती विचारायला. मोठ्ठ्या आवळ्यासारखी दिसणारी ही फळभाजी आईने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीही माहीत नसताना ठामपणे बोलण्याच्या कलेत तीही वाकबगार होतीच. "अगं, जिऱ्या-मोहरीची फोडणी, दोन चिमट्या गोडा मसाला, आणि मूठभर खवलेले खोबरे. आवडत असल्यास इवलासा गुळाचा खडा. "

ही पाककृती वापरून गवताचीही भाजी करता येईल यावर आईचा ठाम विश्वास होता. मी मनचे सांगत नाही. कोतळूकला विनूमामाच्या मुलीला, राधाताईला, 'दाखवण्याचे' कार्यक्रम सुरू झाले होते. सुमतीमामीला काही म्हणजे काही येत नाही हे आईचे मत तिने अनेक वेळेला बोलबोलून माझेही पाठ झाले होते. त्यामुळे "भावाच्या मुलीला उजवायास मलाच काहीतरी खटपट करायास हवी हो" असे म्हणत आई तिला वेळीअवेळी घरकामाचे आणि स्वैपाकाचे पाठ देत असे. त्यात हे ऐकले मी एकदा. राधाताई जात्याच सोशिक म्हणून ऐकून घेई सगळे.

भाजी कशी करायची हे कळल्याच्या आनंदात ज्योत्स्नाताई पळाली, आणि मी समीरदादाला भेटण्याची काय तयारी करावी याचा विचार करू लागलो. तेवढ्यात मला एक शंका आली, आणि मी पळत जाऊन आईला विचारले, "पण आई, जर समीरदादा उतरलाच नाही आपल्या स्टेशनावर तर गं? तू तर म्हणतेस की मी बाहेरच उभा राहायचं आहे म्हणून. मग सरळ जाईल की तो पुढे दिल्ली की वाराणशीला. तेव्हा काय करू मी? " आई काहीतरी जप करीत बसली होती तांदूळ निवडताना. आणि बहुधा तिचा जप चुकला. कारण तिचा चेहऱ्यावरचे भाव ज्या रीतीने बदलले ते पाहता मी दुप्पट वेगाने परत धूम ठोकली आणि मांडी ठोकून गीता परत उघडली. हे कसले भलभलते अध्याय पाठ करून आईचे रट्टे चुकवण्याखेरीज काय फायदा होणार होता हे तो कृष्णच जाणे. त्या कृष्णालाही बहुधा यशोदेने रट्टे घालूनच पाठ करायला लावली असेल गीता. नाहीतर एवढ्या गर्दीसमोर एवढे जाडजूड पुस्तक म्हणून दाखवायचे, तेसुद्धा संस्कृतमध्ये, म्हणजे काय खायचे काम नव्हे. मी वर्गासमोर पहिल्यांदा उभा राहिलो होतो वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला तर माझी कसली फेफे उडाली होती. नंतर सवयीने जमायला लागले ते वेगळे.

समीरदादा उतरलाच नाही तर काय करायचे हा प्रश्न तात्यांनाच विचारावा हे मी ठरवून टाकले. हापिसातून घरी आल्यावर बूट काढतानाच बोलणे लावायला हवे होते. त्यांची बॅंक कुणी 'जोग' नावाच्या माणसानेच स्थापन केली होती, आणि त्याबद्दल विचारले की तात्यांची कळी चांगली खुलते हे मला माहीत होते. "अरे बिट्या, अख्ख्या भारतात त्यांना 'बँकमहर्षी' म्हणून ओळखतात, माहित्ये? आम्ही जोग म्हणजे वाटलो काय? दिसायला असू साधेसुधे, पण एकदा कामाला लागलो ना, की ऐकत नाही कुणाचं. 'माझ्या म्हशीला पडसं झालं म्हणून माझी परीक्षा उतरायची राहिली' असं म्हणत मॅट्रिकच्या वाऱ्या करणारे नव्हेत आम्ही. ही ओकांची कामं. " हा टोला विनूमामाला असे. पाचसहा वेळेला प्रयत्न करूनही त्याची मॅट्रिक काही सुटली नव्हती. मग आतून आईची धुसफूस सुरू होई, "एकदाचे हे रडतराऊत घोड्यावर चढले आणि ग्रॅज्वेट का काय ते झाले. पण ब्यांकेत नोकरी मिळवायला ओकच कामी आले ना? तिथे नाही उपटले तुमचे 'महर्षी' की कोण ते. ते कशाला येतील म्हणा. जोगांनी जोगांना मदत केल्याचं उदाहरण जगात असेल तर ना? नुसते एका कमावणाऱ्याच्या मागे फरड लावून ही भुतावळ हिंडेल. म्याट्रीक होऊन कुणाच्या तरी मागे फिरत भिक्षांदेहीच करायचं तर हवंय कशाला ते म्याट्रीक नि फ्याट्रीक? ". तात्यांना नोकरीकरता माझ्या अण्णाआजोबांनी मदत केली होती. आणि आबाकाका, जे पहिल्याच फटक्यात मॅट्रिक झाले होते, ते नुसते निरनिराळी निमित्त्ये सांगून तात्यांकडून पैसे काढीत नांदिवड्याला बसून असतात हे आईचे लाडके मत होते. मग वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे ही झकाझकी चालू राही. माझी मात्र दोन्हीकडून चंगळ होई. कारण एकमेकांना टोमणे मारण्यात दोघेही इतके गर्क होत, की मी मागेन ते विनासायास मिळे.

पण त्या रात्री तात्यांना यायला खूपच उशीर झाला. त्यांच्या बँकेचे इन्स्पेक्शन चालू झाले होते म्हणे. वर्षातून एकदा असे इन्स्पेक्शन असे, आणि तात्यांना यायला बराच उशीर होई हे मला ठाऊक होते. इथे तर तात्याच बँक एजंट असल्याने रात्री किती उशीर होईल याची खात्री नव्हती. या इन्स्पेक्शनची एक मजा होती. त्यांचे इन्स्पेक्टर जे येत ते कुणीही इन्स्पेक्टरसारखे दिसत नसत. पोट सुटलेले, टक्कल पडलेले, खाकी कपडे न घालणारे, आणि म्हणे इन्स्पेक्टर.

पण ही इन्स्पेक्शनची आपदा मागे लागल्याने समीरदादा उतरला नाहीच तर काय हा प्रश्न विचारायचा राहून गेला. शेवटी मी तसेच काही झाले तर करंकाळ काकांना सांगायचे ठरवले. ते पार्सलक्लार्क असल्याने मोठमोठ्या मालगाड्यासुद्धा थांबवून ठेवत. मग एवढीशी वाराणसी एक्सप्रेस तर नक्की थांबवली असती त्यांनी. मी खुषावलो आणि समीरदादाच्या येण्याची तयारी सुरू केली.

शेजारच्या पालव्यांच्या राजूशी माझे नुकतेच भांडण झाले होते. त्याचे म्हणणे की किंगकाँग हा दारासिंगचा बाप. तर माझे म्हणणे की हे दोघे भाऊ भाऊ, फक्त किंगकाँग थोरला भाऊ. त्यावरून मी त्याला माझा कत्र्या करून टाकले होते. पण अख्ख्या गावात त्यांच्याच आवारात विलायती चिंचांचे झाड होते. आणि त्यांच्या गच्चीवरून त्या आकडीने काढता येत. सगळ्या स्टेशनरोड भागातल्या आम्हा मुलांना पुरूनही उरतील एवढ्या चिंचा होत्या त्या झाडाला. खरंतर दारासिंग-किंगकाँग वरून आमचे केव्हाच वाजायचे, हा विलायती चिंचांचा हंगाम होता म्हणून मी गप्प बसलो होतो एवढेच. पण नुकतेच त्या चिंचा खाऊन गारेगार पाणी प्यायल्याने माझ्या पोटात दुखू लागले. वाणी डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी आधी इंजेक्शन मारले (त्यांचा हात चांगला दगडासारखा जड आहे), आणि कडूझार औषध देऊन ते आईला म्हणाले, "आता चिंचा खाणं बंद करा, नाहीतर तीन इंजेक्शनं घ्यावी लागतील एकावेळेला". आता हे तिला सांगायची काय गरज होती?

तर एकंदरीत चिंचा खायला बंदी आलीच आहे म्हणून मी माझे भांडण काढून घेतले. पण आता समीरदादा येणार, त्याला हे विलायती चिंचांचे आपरूक दाखवायला नको? मी करंकाळ काकांच्या संजाला मध्ये घातले आणि राजूला कत्र्याचा मित्र करून टाकले. आता राजूला सायकल चालवायला देणे आले, पण चालायचेच.