"अरे हो आत्ते, अमृतकोकम आणलेय हो घरचे, तेच करीनास? " आता हे आईला उद्देशून जर होते, तर ज्योत्स्नाताईकडे कशाला बघायला हवे होते डोळे टरके करून? पण आईच्या ते काही लक्षात आले नाही. ती आपल्याच नादात म्हणाली, "अरे जेवायची वेळ झाली, आता नि अमृतकोकम कशास? ". शेवटी मीच पुढे होऊन म्हणालो, "अगं, ज्योत्स्नाताईला तरी दे ना" तेव्हा कुठे तिच्या ध्यानात आले की ज्योत्स्नाताईसुद्धा तिथे आहे म्हणून. "थांब हो, देत्ये तुला अमृतकोकम. जरा जिरे वाटून लावते म्हणजे बरे वाटेल या रखरखाटात".
पण ज्योत्स्नाताईने विषय संपवला "राहू द्या काकू, मलापण आता जेवायलाच जायला हवे. आई वाट पाहत असेल. आणि मी काय परत येईनच की". आता हे बोलताना समीरदादाकडे कशाला बघायला हवे होते? काय चालले होते दोघांचे कळत नव्हते.
अखेर आईने "ये हो. जरा निवांतपणे ये, आणि येताना छायाताईंनाही घेऊन ये" असा आशीर्वाद देऊन तिला मार्गस्थ केले, आणि पाने मांडायला घेतली.
जेवताना समीरदादाने रत्नागिरी आणि कोतळूक इथली हालहवाल त्याच्या आत्तेला पोचवली. कोतळूकला कांबळेवाड्यातली धुरपदामावशी तोंडाच्या कॅन्सरने गेली कळल्यावर आईला फारच हळहळ वाटली. "तंबाकू! विषवल्लीहो ही. कशाला लोकं खातात देव जाणे". इथे समीरदादाने माझ्याकडे बघितले. तो तंबाकू मळतो हे मला ठाऊक होते, आणि ते कुणालाही (म्हणजे आईला) न सांगण्याबद्दल त्याने मला एकदा अळूची फळे मिळवून खाऊ घातली होती. मी आपला खाली मान घालून शेवग्याची शेंग चोखत राहिलो.
दुपार तशी आळसावण्यातच गेली. संध्याकाळी मी समीरदादाला घेऊन धुळे रोडला फिरायला गेलो. समीरदादाचा नेम खूप चांगला होता. त्यामुळे येताना आम्ही रस्त्याकडेच्या चिंचांच्या झाडांवरून ओंजळी वतेस्तोवर चिंचा गोळा केल्या. आता त्या न्यायच्या कशा? समीरदादाने सरळ शर्ट काढला, बनियनही काढली, मग शर्ट घातला, आणि बनियनमध्ये चिंचांची मोठ्ठी पुरचुंडी करून बांधली. त्याला म्हणून सुचे असले!
आम्ही जाईस्तोवर तात्या परत आले होते. त्यांचे इन्स्पेक्टर म्हणे आजारी पडले होते त्यामुळे लौकर सुटी मिळाली होती. त्यांचे आणि समीरदादाचे बरे जमे. बरे म्हणजे, त्यांचे आणि विनूमामाचे जमे त्याहून बरे. मग त्यांनी समीरदादाची जरा सखोल चौकशी केली. "मार्क बऱ्यापैकी उत्तम मिळतील, त्यामुळे इंजिनियरिंग नाहीतर आर्किटेक्चरला जाईन म्हणतो" हे त्याचे उत्तर त्यांना आवडले.
मला आम्हीच बोलत असलेल्या भाषेची ही गंमत कळत नसे. एखाद्या गोष्टीला झडझडून 'उत्तम', 'झकास', 'उत्कृष्ट' असे कधीच कोणी म्हणत नसे. ठरलेली प्रतिक्रिया म्हणजे "वाईट नाही". त्याहून वरची, आणि तीच सगळ्यात वरची, म्हणजे "बरे आहे". त्यामानाने समीरदादाने आज 'बऱ्यापैकी उत्तम' म्हणून कमालच केली होती. एरवी मला हे जाणवले नसते. पण ज्योत्स्नाताईच्या तोंडून "अरे व्वा! ", "सर्वोत्तम!! ", "तोड नाही!!! " (हे शेवटचे काय होते कोण जाणे) असले शेरे ऐकल्यावर मला हे जाणवू लागले होते. तसेच ती "आई शॉट" असे उत्स्फूर्तपणे दबक्या आवाजात किंचाळे तेव्हा तर फारच गंमत वाटे.
आम्ही आणलेल्या चिंचांचे आईने मनसोक्त कौतुक केले. "बरेच दिवस म्हणीत होत्ये की चटणी वाटीन एकदा चिंचांची. ते अखेर तुझ्यामुळे तडीस जाईल हो मधूराया. नाहीतर इथे कोण मला आणून देणारे चिंचा एवढ्या? " हा शेवटचा टोमणा तात्यांना होता. मला एकदम तात्या हापिसाचा पोषाख घालून चिंचेच्या झाडावर दगड मारीत उभे आहेत असे दृश्य नजरेसमोर तरळले आणि खिक्कन हसूच आले.
यात हसायला काय झाले म्हणून चमकून आईने डोळे वटारून पाहिले. मी घाईघाईत समीरदादाला माझा पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह दाखवायला पळालो.
रात्री गच्चीत झोपण्याचा माझा कित्येक दिवसांचा बेत एकदाचा तडीस गेला. तात्यांना वर उघड्यावर झोपायची कल्पना विशेष आवडत नसे. म्हणजे ते थेट 'नाही' म्हणत नसत. पण तसे ते थेट 'नाही' कशालाच म्हणत नसत. 'बघू', 'विचार करू', 'नंतर बघू' ही आणि असली फोलपटे उधळीत बसत. आईसुद्धा वैतागे याबद्दल. आणि ते उगाच नाही.
आणि मला एकट्याला गच्चीत झोपू द्यायला आई मुळीसुद्धा तयार नसे. त्यामुळे समीरदादा आल्यावर मी हुरुपाने तयारीला लागलो. गाद्यांच्या गुंडाळ्या खांद्यावरून नेताना मला उगीचच हर्क्युलस झाल्यासारखे वाटत होते. अरेरे, आमची सायकल हर्क्युलस का नव्हती? रॅलीची सायकल चांगली होती, पण हर्क्युलस हे नाव मला जास्त आवडे. नाहीतर हंबर.
रात्री आकाशातल्या चांदण्या मोजताना मजा आली. समीरदादाने मला सप्तर्षी दाखवले, व्याधाचा बाण दाखवला, आणखीन काय काय दाखवत होता, पण मला अगदी झोप दाटून आली. वरती गारवाही चादर अंगावर घेण्याइतपत जाणवत होता. हं हं करत मी गुरगुटून झोपलो.
सकाळी समीरदादाला बाजारपेठेत हिंडवून आणायचा माझा बेत होता. त्या निमित्ताने माझे तरी तिकडे जाणे झाले असते. तात्यांची बँक जरी तिथे असली तरी ते मला कधी तिकडे घेऊन जात नसत. आणि बाजारपेठ तशी लांब असल्याने आई एकट्याला जाऊन देत नसे. अर्थात जवळ असती तरी जाऊ दिले असते याची खात्री नव्हतीच म्हणा. स्टेशन एवढे जवळ होते, पण "शंटिंग बघायला जाऊ का? " असे विचारले तर "ह्या हिते समोर तर स्टेशन. त्यात काय बघायला जायचे आहे? " असे संतापजनक उत्तर मिळे.
आज मात्र लाडके भाचरू आले होते त्यामुळे परवानगी मिळाली. मग कोपऱ्यावर प्रकाशच्या दुकानात जाऊन समीरदादासाठी एक सायकल भाड्याने घ्यायला निघालो. वाटेत ज्योत्स्नाताईचे घर लागे. ती त्यांच्या गॅलरीत केस विंचरत उभी होती. एकदा विचार केला की त्यांच्या घरी जाऊन समीरदादाची ओळख करून द्यावी. मग म्हटले नको. छायाकाकू तशा गप्पिष्ट होत्या. त्यांनी बातामारी करायला घेतली असती तर माझी बाजारपेठ हुकली असती. पण ज्योत्स्नाताईने मला बघितलेच. अशा वेळेस काय करायचे असते ते मी तात्यांकडून शिकलो होतो. मी हात हालवून तिला ओरडून म्हटले, "गडबडीत आहे जरा, नंतर येतो" आणि सरळ प्रकाशचे दुकान गाठले.
समीरदादाला बाजारपेठ काय विशेष भावली नाही. फक्त जाताना गिरणेवरचा पूल पाहून त्याला हसू आवरेना. भल्याथोरल्या पात्रात जेमतेम दोन हात रुंदीची पाण्याची पट्टी वाहत होती.
परत येईस्तोवर ऊन चटचटू लागले होते. घरी पोचून जरा शांत बसलो आणि मग बुद्धिबळाचा डाव मांडला. तोच ज्योत्स्नाताई आली. नेहमी ती आईकडे थेट पळे. पण आज सरळ माझ्याकडे तिचा मोर्चा वळला. "काय कौस्तुभराव, शेवेची भाजी खाल्ली आहे का कधी? " मी संशयाने तिच्याकडे पाहिले. ती नेहमी जरी आब राखून बोलत असे, तरी आज एकदम "कौस्तुभराव? ". आणि शेवेची भाजी न खायला मी काय इथे पहिल्यांदा आलो होतो का? खाली करंकाळ काकांकडे तर उठल्यासुटल्या ती भाजी करतात. पण समीरदादाला आश्चर्याचा झटका बसला. "च्यायझों.... शेवेची भाजी? उद्या पापडाची चटणी कराल.... " "मग करतोच की. मस्त लागते. उद्या देईन आणून". ज्योत्स्नाताईच्या उजव्या गालावर खळी पडते हे मला माहीत होते. पण हे उत्तर देताना हसून खळी पाडायची काय गरज होती? आणि समीरदादाने तरी कशाला पहायला हवे होते तिच्याकडे एवढे रोखून? काय चालले होते देव जाणे! आम्ही जेवायला बसेपर्यंत ज्योत्स्नाताई आमचा खेळ बघत बसली. मागे एकदा तिला मी बुद्धिबळ शिकवायचा प्रयत्न केला होता, तर जेमतेम पाच मिनिटे तिचे अवसान टिकले होते.
संध्याकाळी समीरदादाला शेजारी पालव्यांच्या गच्चीवर नेले. विलायती चिंचा त्याने कधीच पाहिल्या नव्हत्या. आणि आम्हाला आकडीने चिंचा पाडायचा जो खटाटोप करायला लागे तोही त्याच्यामुळे वाचला. तो ताडमाड उंच होता हे तर झालेच. पण गच्चीवरून त्याने सरळ हुप्प करून त्या झाडाची फांदीच गाठली. मग काय? चिंचांचा सडाच पडला. सुदैवाने इथे घर शेजारीच असल्याने चिंचा नेण्यासाठी बनियन वापरावी लागली नाही. चिंचा गोळा करायला परकर खोचून राजूची उज्जूताईही आली. चारचौघात वावरतानाही परकर एवढा वर खोचतात हे माहीत नव्हते.