गुलमोहोर - ३

दुसऱ्या दिवशी दुपारी जेवल्यावर मी अडावदकरकाकांच्या घरामागच्या पडक्या गॅरेजमध्ये कोर्ट कोर्ट खेळत होतो. समीरदादा एका दिवसात येणार म्हणून मी फारच खूष झालो होतो. त्या नादात मी जज्ज म्हणून काम करताना दोनतीन वेळेला फिर्यादीचा वकील बनलेल्या संदीप जोशीच्या विरुद्ध सटासट निर्णय दिले आणि तो भडकला. तो भडकायचे आणिक एक कारण म्हणजे त्याचे वडील वकील होते, आणि या खेळाची मूळ कल्पना त्याचीच होती. त्यामुळे तो रागारागाने निघून गेला. गेला तर जाऊ देत. ढोल्या कुठचा!

मी उरलेल्यांना, म्हणजे संजा आणि राजूला, समीरदादाचे वर्णन करायला सुरुवात केली. त्याने रत्नागिरीला एकदा चार फुटी लांब दिवड मारला होता हे ऐकल्यावर दोघांचे डोळे मोठ्ठे झाले. 'दिवड विषारी की बिनविषारी' असे विचारून राजूने थोडेसे नाक खुपसायचा प्रयत्न केला, त्याला संजाने परस्पर झाडले. "आता दिवड म्हनले तर विषारीच राहते नं...... बिनविषारी साप नसतेतच कोकणात कुठंबी..... " मग राजू गप्प बसला. त्यात मी समीरदादा कशा बारावीला बसला आहे, आणि त्यानंतर तो थेट आयटीआयला (की आय आय टी? समीरदादाला आल्यावर विचारले पाहिजे) कसा जाणार आहे इंजिनेर व्हायला याचे वर्णन करून पारच चूप करून टाकले. राजूची उज्वलाताई उर्फ उज्जूताई गेली दोन वर्षं बारावी करीत होती म्हणे. त्यामुळे तर त्याचे नाक फारच खाली झाले. असा समीरदादा त्यांच्या झाडाच्या चिंचा खायला येणार हा त्यांचा किती बहुमान आहे हे मी परतून ठसवले.

त्या रात्री मी जेमतेम झोपू शकलो. पहाटे पहाटे कधीतरी थोडासा गारवा आला त्यात डुलकी लागली. आणि दचकून जागा झाल्यावर मला वाटले की समीरदादाची गाडी येऊन गेली! मी धावतच आईला विचारायला गेलो. जेवणाच्या टेबलावर आरसा मांडून तात्या दाढी करत बसले होते एवढी समीरदादाची गाडी येऊन गेली आणि हे दाढी करताहेत!   धावपळीत माझा त्यांना चांगलाच धक्का लागला आणि त्यांच्या गालावर सणसणीत लाल रेघ उमटली. "अरे बिट्या, किती धडपडतोस? " ते कळवळून ओरडले. काहीही झाले तरी मला मारायला त्यांचा हात काही उठत नसे. अर्थात ती कसर आई भरून काढी म्हणा.

आणि तिने ती भरून काढलीच. हुळहुळणारे बूड चोळत मी "त्याची गाडी अजून मुंबैहून सुटायच्ये, आणि इथे ह्याचा हैदोस बघून घ्यावा" हे ऐकून घेतले. हात्तिच्या... अजून झोपलो असतो तरी चालले असते. हे शाळेचे दिवस असते तर आईने नक्कीच एव्हाना दूध प्यायला बसवले असते पाटावर. सुटी असल्याने मी स्वतःहून उठेस्तोवर ती मला उठवत नसे. पण एकदा उठल्यावर झोपूनही देत नसे.

मी मग आवरायला घेतले. आवरून अभयदादाला समीरदादा येणार असल्याची बातमी (ते दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते, पण त्यांचे बरे जमले असते असे मला वाटून गेले) द्यायला गेलो, तर तो त्याच्या आत्याकडे भुसावळला गेल्याचे कळले. आणि महिनाभर येणार नव्हता म्हणे. थोडक्यात, त्या दोघांची भेट होणार नव्हती. परत आलो.

लाडका भाचा येणार म्हणून आईने जोश्यांच्या प्रकाश डेअरीतून श्रीखंड सांगून ठेवले होते. त्यांचा नोकर ते पातेले घेऊन आला होता. वरती जायफळ किसून घातलेला तो केशरी रंगाचा स्निग्ध प्रकार माझ्या तोंडाला लगेच पाणी आणे. पण या ना त्या कारणाने आई मला त्याचा मासला कधीच चाखून देत नसे. कधी देवाला नैवेद्य दाखवायचाय, तर कधी जेवायला घरी लोक येणारेत. नसती कारणं काढायला या आयांना कोण शिकवत असेल बरे?

काहीतरी काम काढायचे म्हणून खाली जाऊन सायकलला तेलपाणी करत बसलो. माझ्या लक्षात आले, की माझी सायकल मी जरी अगदी झकपक ठेवत असे, तरी तिच्या चाकांच्या रिम मात्र कळकट दिसत. मग मी रॉकेल-खोबरेल मिश्रणाने (अभयदादाने हे मला दिले होते) त्या साफ पुसून काढल्या. आणि वरून खोबरेल लावून चांगल्या चकचकीत केल्या.

वर जाऊन आईला विचारले, तर ती पुऱ्यांची कणीक मळत घामाघूम बसली होती. समीरदादाची गाडी आत्ताशी निम्म्या वाटेवर, म्हणजे नाशिकला पोचली असेल असे तिने घाम निपटत सांगितले. "म्हणजे अजून किती वेळ? " या प्रश्नाला तिने "तीन तास" असे उत्तर दिल्यावर मी निर्धास्तपणे सायकल फिरवायला बाहेर पडलो.

आज टिप्या आणि मोटवानी आजोबा दोघेही नव्हते. पण होणारा अनर्थ टळला नाहीच. "होणारे न चुके आला जरी ब्रह्मा तया आडवा" असे काहीसे तात्या कायम म्हणत ते आठवले. सढळ हाताने चोळलेल्या खोबरेल तेलाने सायकलच्या रिम गुळगुळीत होतात, आणि त्यावर ब्रेक लागत नाही, हे कळेस्तोवर दोन जाडजूड गलबते आणि मी जमिनीवर आलो होतो.

आईचा ओरडा ऐकून घेतला. मग चरचरणारे आयोडीन फुटलेल्या कोपरावर लावून घेतले. ते चरचरणे थांबेस्तोवर स्टेशनला जाण्याची वेळ आलीच. निघालो, आणि अचानक मला काय वाटले कोण जाणे, मी वाट वाकडी करून ज्योत्स्नाताईला "येतेस का" म्हणून विचारायला गेलो. तीही लगेच तयार झाली. "फक्त पटकन पावडर लावून घेते" हा तिचा बेत मी हाणून पाडला. तो गोडसर भपकारा मला मुळीसुद्धा आवडत नसे. "आणि एवढे मोठ्ठे केस आहेत तर अंबाडा बांध नीटसा. उगाच शा़ळकरी मुलीसारख्या वेण्या घालून नकोस" असे मी म्हटल्यावर ज्योत्स्नाताई आणि छायाकाकू एवढ्या हसत का सुटल्या देव जाणे.

जाताना मी तिला अजून दोन कोडी घातली, आणि दोन्हींची उत्तरे तिला आली नाहीत. ती दहावीची परीक्षा पास होईल की नाही याची मला आता काळजीच वाटू लागली. आणि झालीच पास तर पुढे जाऊन काय करणार होती देव जाणे. लग्नच ना? अरेच्या, तिचे लग्न म्हणजे आधी तिलाही राधाताईसारखे दाखवून घ्यायला लागेल का? का कोण जाणे, मला ती कल्पना अजिबात म्हणजे अजिबातच आवडली नाही. मग मी एक बटाट्याच्या आकाराचा दगड घेतला आणि एकदा डाव्या पायाने आणि एकदा उजव्या पायाने लाथाडत तो स्टेशनापर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मध्येच तो एका रिक्षाच्या खाली गेला, आणि मी तो काढायला काहीतर हुडकत होतो तोच "अरे, आली वाटतं गाडी" असा ज्योत्स्नाताईने हाकारा केला. बरेचसे लोक बाहेर पडत होते खरे स्टेशनातून. मी पळत पार्सल ऑफिसला जाऊन गाडी आली का हे विचारावे म्हणून निघालो, पण मग लक्षात आले की ज्योत्स्नाताई कुठे समीरदादाला ओळखते? आणि तिला पार्सल ऑफिसात पाठवावे, तर ती कुठे करंकाळ काकांना ओळखते? या बायका ना, कायम घोळ घालून ठेवतात असे तात्या बऱ्याच वेळेला आईच्या पाठीवर म्हणतात ते किती खरे आहे! शेवटी तिला समीरदादाचे वर्णन करून सांगितले, आणि मी पार्सल ऑफिसात पळालो. वर्णन म्हणजे गोरा आहे, घारा आहे, चांगला उंच आहे एवढेच. पार्सल ऑफिसात करंकाळ काका दिसले नाहीत म्हणून हुडकत पार्सल ऑफिसच्या दुसऱ्या दारातून पार फलाटावरच पोचलो, तर एक गाडी उभी होती खरी. तिच्यावर बंबई-वाराणसी लिहिले होते. पण ही मुंबईला जाणारी की तिकडून येणारी? कारण दोन्ही दिशांच्या वाराणसी गाड्या एकाच वेळेला या स्टेशनात येतात हे मला माहीत होते. एकदा चुकीची वाराणसी एक्सप्रेस घेऊन तात्या मनमाड ऐवजी जळगावला पोचले होते.

डोक्यावर चप्प तेल घातलेल्या एका लाल बंडीवाल्याला मी विचारायला गेलो, आणि मला आठवले की वाराणसी उत्तर प्रदेशात आहे. राजधानी नसावी बहुधा, कारणा पाठ केलेल्या राजधान्यांमध्ये हे नाव आठवत नव्हते. पण म्हणजे तिथली माणसं हिंदी बोलणार. हिंदीत मला जरी बरे मार्क मिळत असले तरी ते लिहिलेले कळण्यापुरतेच उपयोगी पडे. प्रत्यक्षात बोलायची वेळ कधी आली नव्हती. आता आली का पंचाईत? मी जरा धीर गोळा करून "ये गाडी किधरको जाती" असे त्या बंडीवाल्यासमोर जाऊन विचारले. पण आवाज फारसा फुटला नाही. "का कहत हो छोटवा? " हा त्याचा प्रश्न मला फारसा कळला नाही. तेवढ्यात गाडी हललीच. बरे झाले. परत पार्सल ऑफिसात आलो.

एव्हाना करंकाळ काका परत त्यांच्या टेबलापाशी आले होते. त्यांना विचारले तर ते म्हणाले की हाच तो मुंबईहून निघालेला वाराणसी. ही इथल्या भाषेची आणखीन एक खोड. रेल्वेच्या गाड्यांना सर्व जण सर्रास पुल्लिंग वापरत. 'वाराणसी आला, महाराष्ट्र आला, पॅसेंजर आला' इ.

बाहेर काय झाले असेल, ज्योत्स्नाताईने धांदरटपणा करून समीरदादाला ओळखले नसेल तर? आता ती तशी धांदरट नव्हती म्हणा, पण आबाकाका नेहमी म्हणत, "म्हैस कधी पो घालेल आणि बायका कधी धांदरटपणा करतील ते काही सांगता येत नाही" त्याची आठवण झाली. मी गडबडीने बाहेर पळालो.

ज्योत्स्नाताई आणि समीरदादा शेजारी शेजारी अवघडून उभे होते. कोणीच एकमेकांशी बोलत नव्हते. काय बरे झाले असेल? मी धावतच त्यांना गाठले. नंतर कळले, की ज्योत्स्नाताईने समीरदादाला बरोबर ओळखले खरे, पण माझ्याकडून त्याचे आडनाव विचारून घ्यायला ती विसरली होती. तिने धडकावून "समीर कुलकर्णी का" असे विचारल्यावर समीरदादा बावचळला. पहिल्यांदा म्हणजे संतापला. देशस्थांबद्दल त्याची मते जरा जास्तच तिखट होती. पण लगेच ही सावळी मुलगी कोण हा प्रश्न त्याला पडला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावळी असो वा गोरी, मुलींशी कसे बोलतात हे कुठे त्याला माहीत होते? त्यामानाने पुण्यात शिकलेली असल्याने ज्योत्स्नाताई तयारीत होती. पण तिची तयारी प्रश्न विचारण्यापुरतीच होती. आपण प्रश्न विचारला आणि उत्तरच आले नाही तर काय करायचे हे तिला माहीत नव्हते.

तर असे हे दोघे मुखस्तंभासारखे (आईचा आवडता शब्द) एकमेकांसमोर उभे होते. मी जाऊन सूत्रे हातात घेतली, ओळखी करून दिल्या, आणि आमची त्रयी घरी परत निघाली. तेवढ्यात मला आठवले आणि मी खाली वाकून एक सुपारीएवढा दगड उचलला. जरी आधीच झकापकी झालेली असली, तरी त्यात अजून तीन तिघाडा काम बिघाडा नको.

समीरदादा जरा रापल्यासारखा वाटला. म्हणजे गोरा होताच, पण जरा तांबूस झाक वाटली. ओठांवर काळसर पट्टा उमटू लागल्याचे जाणवले. आणि आवाजही जरा घोगरा झाला होता.

कोपऱ्यावरून ज्योत्स्नाताईच्या घराकडे वळायला रस्ता फाकला, तिथे ती सरळ तिच्या घराकडे निघाली. मला वाटले ती आमच्याबरोबर घरापर्यंत येईल, म्हणून तिला तसे विचारले. समीरदादाही बोलला, "साटं आणल्येत घरची, चला तोंडात दोन तुकडे टाकायला" का कुणास ठाऊक, मला "चला" ऐवजी "चल" ऐकू आल्यासारखे वाटले.

"चलाम चळलेक चहीना" ज्योत्स्नाताई माझ्या कानात कुजबुजली. तिला "साटं" म्हणजे काय हे कुठे ठाऊक होते? या समीरदादाला मुलींशी नीट बोलायला शिकवायला लागणार होते बहुधा. "चटंसा चणजेम्ह चंब्याचाआ चळ्यापो". तिनं मान डोलावली. आता समीरदादा प्रश्नार्थक बघू लागला. त्याला 'च'ची भाषा येत नव्हती.

"अडमैरे तिडमैला साडमैटं म्हडमैणजे काडमैय तेडमै कडमैळले नाडमैही" समीरदादाने मान हालवली खरी, पण साटं या शब्दात न कळण्यासारखं काय होतं हे त्याला न कळल्याचे स्पष्ट दिसत होते.

इकडे ज्योत्स्नाताईने परत ओठांचा चंबू केला. तिला "डमै"ची भाषा माहीत नव्हती. "चते चयका चहेआ चहे चमी चलातू चंतरन चंगेनसा" अशी तिची समजूत काढावी लागली.   अरे देवा! या मोठ्या माणसांना कायकाय शिकवण्यातच माझी सुटी जाणार की काय?

घरी आई लाडक्या भाचराची वाटच पाहत होती. "ये हो मधूबाळा, कसा झाला प्रवास? " आता समीर नाव असलेल्या माणसाला लाडाचे नाव मधू का? तर आईची इच्छा. तिला भाचराचे नाव मधुकर ठेवायचा तिचा बेत सुमतीमामीने सफल होऊ दिला नव्हता. मात्र आईने हार मानली नाही. सदैव ती त्याला मधू, मधुराया, मधूबाळ याच नावांनी हाक मारे. आणि समीरदादाही हे लाड विनातक्रार करून घेई.

पण आज का कोण जाणे, त्याला हे 'मधूबाळ' रुचलेले दिसले नाही. "अगो आत्ते, जरा हातापायावर पाणी तरी घेऊ देस. खरेतर आंघोळच करायला हवी हो. मुंबईसून निघालो तो घामाच्या चिकचिकीतून. आणि हिते आलो तो थेट भट्टीतच. तुमच्या खानदेशात उन्हाळा कडक दिसतोय हो भारी. मार्चातच एवढे, तर मेत कसे होत असेल? "

"पण तुमच्या कोंकणातसुद्धा उकडतेच की खूप. आम्ही गेलो होतो एकदा आंजर्ल्याला एकांच्या घरी दोन दिवस, तर मला बाई घामाने नको नको झाले" इति खानदेशकन्या ज्योत्स्नाताई. ती एकदा काय ती आंजर्ल्याला गेली होती, आणि त्या आधारावर ती सतत कोंकणाबद्दलची तिची मते मांडत असे. आणि मला ते मुळीच आवडत नसे. असे एकदा, दोन दिवसांसाठी, जाऊन काय कोंकण कळते काय? त्यासाठी दर वर्षी महिना महिना पडाव टाकायला हवा.

"आता कोंकण म्हटल्यावर घाम यायचाच" असे पुटपुटत समीरदादाने माघार घेतली. मला जरा आश्चर्यच वाटले. समीरदादा तसा बोलण्यात हार जात नसे कुणाला. मला वाटले होते की तो चांगलाच सरळ करील हिला.