पाऊस की कैदी?

हा पाऊस असा कसा झालाय हल्ली?
कधीकधी हा जातो महिना-महिना नजरेआड
कारावासाची सजा झालेल्या कैद्यासारखा अदृश्य
कुठेतरी गजाआड?
..
तर कधी
येतो फक्त सायंकाळी
दबकत दबकत, ओशाळवाणा
पॅरोलवर सुटलेला पण रोज
पोलीसठाण्यावर हजेरी द्यायला जावे लागावे तसा
नाईलाजाने नियमित?
..
अन कधी
त्याचा वावर असतो
तुरुंगातून पळालेल्या कैद्यासारखा
फक्त रात्री अंधारात..
जाणवतात त्या चोरपावली हालचाली
कुणाला तरी अंधारात एकटं गाठून
लुटण्यासाठी असाव्या तशा?
..
त्या जुन्या खट्याळ, सदवर्तनी, दिवसा उजेडी, उघड उघड येणाऱ्या पावसाचे
आता काय झाले?

(जयन्ता५२)