अपशकुनाची घार!

..................................................
अपशकुनाची घार!
..................................................

एकच आहे घर तेथे
अन् बंद घराचे दार
अंगणातल्या झाडावरती
अपशकुनाची घार!

आठवणींचा अबोल वावर
उंबरठ्याच्या आत
उदासवाणी धून कधीची
बसले कोणी गात!

मध्येच उडते कधीतरी
अन् गिरकी घेते एक
तडफड होते तिची सारखी
मग होतो उद्रेक!

भकास अंगण होते सारे
आक्रोशातच चूर
आणिक जातो विरून त्यातच
उदासवाणा सूर!

टपून असते बसलेली ती
कधी उघडते दार
अंगणातल्या झाडावरती
अपशकुनाची घार!!

- प्रदीप कुलकर्णी

..................................................
 रचनाकाल ः ४ डिसेंबर १९९७
..................................................