अधांतरी

"संदू ऊठ रे, ऊठ नां, सहल ले जाणं नही का? " ऊठ आते.

"उममम".

"ऊठ रे.. बट्ठा पोरे चालना जातीन.. सहलले.. आणि तूच राही जाशी घर. "

मोबाईलच्या गजराने, मला झोपेतून उठवलं, आणि माझ्या स्म्रुतिपटलावर चाललेला, जुन्या आठवणींचा चित्रपट थांबला.

 मी त्या दिवशी संध्याकाळी, माझ्या मित्राबरोबर, लॉवेल-बोस्टनला 'फिरायला' जाणार होतो, म्हणून साखरझोपेत मला, माझ्या शालेय जीवनातल्या 'सहली' आठवत होत्या. ही आठवलेली सहल होती, पैठण-जायकवाडी धरण-महाबळेश्वर-पुणे... फी होती २२५/- रु. फक्त. आणि आज मी चाललो होतो एडिसन पासून २५० मैल लांब, म्हणजे लॉवेलला.

सहलीला जाताना काहीच करावं लागायचं नाही, फक्त घरच्यांनी जे-जे दिलं आहे, ते-ते घ्यायचं आणि निघायचं. आणि जेवायला काय तर 'दशम्या-चटणी', ३ दिवस म्हणजे ६ वेळा 'दशम्या-चटणी'. इथे कुणीच नाही दशम्या द्यायला. चला इथे आता, आपणच आपले 'बाप' आणि आपणच आपली 'आई'. ऑफिसच्या बॅगेत १ ड्रेस कोंबला आणि निघालो ऑफिसला.

ठरल्याप्रमाणे, अभिषेक येणार होता मला घ्यायला नेवार्क स्टेशनवर. आता अभिषेक ह्या प्राण्याबद्दल सांगायचं झालं तर.. हा माझा कॉग्निझंट कंपनी-मित्र, इकडे लॉवेलला उच्च-शिक्षणासाठी(एम-एस साठी) आलेला. तो त्याच्या बऱ्याच मैत्रिणींपैकी 'एक', मैत्रिणीला भेटायला आलेला. न्यू जर्सीला.

मी ऑफिसमधलं काम आटोपून तसा लवकर निघालो. नेवार्क स्टेशनवर पोहचलो तेव्हा, नेहमीसारखी गर्दी नव्हती, कारण मी कधीच ८ वाजेनंतर नेवार्क स्टेशनवर थांबलो नव्हतो.   बरेच विचित्र-विचित्र लोकं फिरत होते प्लॅटफॉर्मवर. आपल्याकडचे बेवडे परवडले बाबा, पण इथले नको. अभिषेक मैत्रीण-भेटीत रमलेला.

मी स्टेशनावरच उभा होतो. ३-४ मुली तिथेच जवळ असलेल्या सिमेंटच्या भिंतीवर चढल्या होत्या. त्या एकमेकांचे फोटो काढत होत्या. अचानक आवाज आला,

"हे.. य एक्स्क्युज मी जंटलमन, कॅन यू टेक आवर पिक्चर..??? "

मी मागे पाहिलं तर, त्या सगळ्या त्या भिंतीवर चढल्या होत्या आणि त्यांतली एक माझ्याकडे बघून असलं काहीतरी बरडत होती.

'शुअर व्हाय नॉट'. मी तिच्या हातातून कॅमेरा घेतला आणि कॅमेऱ्याची दोरी माझ्या मनगटात अडकवतच होतो तोच मघाशी मला भेटलेला 'बेवडा' आला आणि माझ्या हातातला कॅमेरा घेण्याचा प्रयत्न करू लागला.

"हे आय विल टेक हर पिक्चर.. ̱ गिव मी. "

'डोंट गिव्ह हीम कॅमेरा... प्लीज.. " मगासची मुलगी ओरडली.

"व्हाय नॉट मी, व्हाय नॉट मी??? व्हाय ही..... " बेवडा.

"ही, इज विथ अस.. ही इज विथ अस... " मुलगी.

.. तो जाता जाता एक शिवी हासडून गेला....!! "यू ****** ब्लॅक".

तो गेल्यानंतर मग त्या मुलींचा मी फोटो काढला. तो तिथे जवळच उभा होता. तो त्या मुलींशी विचित्र वागू लागला, त्यांच्या तोंडाजवळ जाऊन शिव्या देऊ लागला. लगेच ट्रेन आली. त्या मुली धावत ट्रेन मध्ये चढल्या. तो बेवडा स्टेशनावरच होता. गाडी निघण्यात होती, तेव्हा ती मुलगी आली आणि माझा हात दाबून म्हटली थँक्स, आणि जाता- जात तिने मला डोळा मारला.

त्या बेवड्याला असं वाटावं की खरंच मी त्यांच्यासोबत होतो आणि मी त्यांना सोडायला वगैरे आलो आहे, म्हणून तिने हे सगळं 'डोळा-पुराण' केलं. ट्रेन गेल्यानंतर मी तिथून निघून गेलो खाली दुकानं होती तिथे वाट बघत बसलो, अभिषेकच्या फोनची. राहून राहून कानांत एकच वाक्य घुमत होतं... यू ब्लॅक....!

तेव्हा मित्राने सांगितलेली एक कविता आठवली..... "मी राहिलो ना काळा, मी राहिलो ना गोरा... मी राहिलो अधांतरी. "

अभिषेक आला आणि सांगू लागला की अरे आपल्याला अजून एका ट्रेनने जावं लागेल. मग आम्ही निघालो, 'लाईटरेल-ट्रेन शोधायला. तो ही पहिल्यांदाच जाणार होता, लाईटरेलने. आम्ही तिकीट मशीन शोधत शोधत लाईटरेलच्या प्लॅटफॉर्मवर आलो. आम्ही मशीन शोधत असताना लाईटरेल आली, त्यातून एक 'कृष्णवर्णीय'.. तिकीट चेकर बाहेर आला. त्याने आम्हाला विचारलं,

"व्हॉट आर यू डुईंग? "

"वी आर सर्चिंग फॉर टिकीट व्हेंडिंग मशीन. "

"कम ईन, आय विल गिव्ह यू टिकीट. " माझ्या अनुभवानुसार मला फक्त माहीत होतं की तिकीट नसलं की, सांगता येतं की मी घाईत होतो, मला आता तिकीट द्या, तिकिटाची रक्कम आणि ५ डॉलर फाईन एवढ्यावर होतं. पण ह्या माणसाने आम्हाला युएसए चा आय-डी विचारला, माझ्याकडे नव्हता. मुळात म्हणजे आम्ही प्लॅटफॉर्मवर उभे असताना ह्याने आम्हाला आत का बोलावले? आणि स्टेशनावर कुठेही तिकिट मशीन आम्हाला दिसले नाही, आम्ही शोधत होतो. मग त्याने सुरू केलं, त्याचं लिखाण. कोर्ट ऑर्डर... ७५ डॉलर फाईन. मला घाम फुटायला लागला. ट्रीप ला जाऊन आलो असं समजून गुपचुप घरी जाऊया असं वाटायला लागलं. माझ्याकडे मी ज्या कंपनीसाठी काम करतो, त्या कंपनीचं ओळखपत्र होतं, त्याच्या मागेच मी माझ्या नेहमीच्या ट्रेनचा महिन्याचा पास लावलेला होता. एक भारतीय स्त्री हे सगळं बघत होती. तिचं लक्ष माझ्या ओळखपत्राकडे गेलं, ती म्हटली, "यू हॅव टिकीट. " मग मी माझा पास त्या चेकरला दाखवला, तेव्हा त्याने चिरखडलेला पिवळा कागद फाडला.

मी वाचलो. अभिषेक ची वाट लागली. उंची, वजन, डोळ्यांचा रंग, लॉवेलचा पत्ता हे सगळं, चिरखडल्यानंतर त्याने जो कागद दिला, त्यावर लिहिलं होतं, "कोर्ट ऑफ न्यू जर्सी". आयला, आम्ही उडालोच. काय करायचं ह्याचं.. काहीच सुचेना. आणी ह्या लिखाण-पुराणात आमचं ईप्सित स्टेशन केव्हाच निघून गेलं होतं. त्याने आम्हाला कुठल्यातरी विचित्र स्टेशनवर उतरवलं. त्या स्टेशनावर कुणीच नव्हतं, रात्रीचे १० वाजलेले. वेळापत्रक पाहिलं तर आमच्या ईप्सित स्टेशनावर जाण्यासाठी ११ वाजता गाडी होती. नोटिस आम्ही परत- परत वाचली. बऱ्याच लोकांना फोन केला. मग समजलं की आम्ही हा फाईन ऑनलाईन भरू शकतो, कोर्टात हजर राहण्याची गरज नाही.

आजवर 'कोर्ट' ही संज्ञा मला फक्त, पुस्तकं, नाटकं व सिनेमे ह्या माध्यमांमधून ज्ञात होती. आणि अमेरिकेत आल्यावर १ महिना होत नाही तोवर, 'कोर्टाची पायरी', बापरे रडायचाच राहिलो होतो. आभ्याने मैत्रिणीला फोन केला, आणि विचारलं की ह्या स्टेशनापासून 'रटगर्स' युनिव्हर्सिटी किती लांब आहे? मग ठरलं की चालत जायचं.

चालताना ही, मार्ग 'काट्या-काट्यांचा' होता, पुलंचे 'काटे' नाही.. तर माझ्याच विश्वबंधुंचे 'काटे'. रस्त्यात मध्येच कुणी काही तरी ओढताना दिसायचं, कुणी असं एकटं उभं असलेलं दिसायचं, मध्येच आभ्या.... मुद्दाम फोनवर बोलण्याचं नाटक करायचा. मी फक्त त्याच्या मागे-मागे चालत होतो. एकदाचा गाडीजवळ पोहचलो.. आणि सोडला नि:श्वास.. 'वाचलो'.

मग काय..   सुरू झाली... ट्रीप... ८५ मैल दर तासाला... असल्या तुफान वेगाने. न्यूयॉर्क ते लॉवेल आम्ही फक्त १ 'थांबा' घेतला. २५० मैल अंतर ४ तासात गाठलं. रात्री १. ३० वाजता पोहचलो. दुसऱ्या दिवशी, सकाळी आभ्याच्या इतर मित्रांसोबत निघालो, 'हॅंम्प्टन' बीच वर.

हॅंम्प्टन बीच, आणखीन ६० मैल लांब होतं. तासाभरात पोहचलो, अटलांटिक समुद्राचा आनंद घेतला. पाणी अक्षरशः: बर्फाइतकं थंड होतं.

'मधू' म्हणजे 'मधातली ऊ' आणि आदित्य म्हणजे 'आ - दैत्य'... आधीपासूनचं जो दैत्य आहे असा तो, असले भन्नाट शोध लावत-लावत परत लॉवेलला आलो आणि मी माझ्या न्यूयॉर्कच्या परतीच्या वाटेला निघालो. बसमध्ये निवांत झोपलो होतो तेव्हा, परत आठवण झाली, मला भेटलेल्या २ 'कृष्णवर्णीयांची. ' एक बेवडा आणि दुसरा विनाकारण मला त्रास देणारा चेकर.

धन्यवाद.

संदिप विनायक पाटिल.