ती येत आहे

हो! हो!! ती येत आहे. अरे हो, पण ती कोण? असे वैतागू नका!! ती म्हणजे कोणी तारका नाही हो. पण एखाद्या नव तारकेच्या आगमना इतकीच अनेक तरुण तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर, ती आहे...... यामाहा एफ - १६. यामाहा इंडिया लिमिटेडचे नवीन उत्पादन, नवीन मोटर सायकल, नवी यामाहा एफ झेड - १६.



एफ झेड- १६

गेल्या काही दशकांपासून यामाहाने जगभराप्रमाणेच भारतात सुद्धा शक्तिशाली मोटरसायकलच्या बाजारपेठेवर अनभिषिक्त राज्य केले आहे. आपल्या मोटर सायकलींचे चाहते निर्माण केले आहेत. एस्कॉर्टस इंडिया सोबत सामंजस्य करार करून यामाहाने राजदूत यामाहा आरडी ३५० ही मोटर सायकल भारतीय दुचाकी बाजारात आणली आणि पाहता पाहता दुचाकीच्या बाजाराचे रूपच पालटून टाकले. यामाहाने आरडी ३५०, राजदूत आणि सर्वात लोकप्रिय अशा आर एक्स १०० या गाड्या भारतीय बाजारपेठेसाठी तयार केल्या आणि यशस्विरीत्या बाजारपेठ काबीज केली. स्पर्धेत कावासाकी, होंडा, सुझुकी यासारखे त्यांच्याच मायदेशातले स्पर्धक असून सुद्धा स्वतःची वेगळीच ओळख ठेवली होती. पण ९० च्या दशकात प्रदूषण प्रमाणीकरणाच्या लाटेत जवळपास सर्वच टू-स्ट्रोक मोटर सायकलींचा अस्त झाला. त्यामध्ये सुद्धा जाता जाता यामाहाने आर एक्स जी आणि आर एक्स १३५ हि दोन उत्पादने बाजारात आणली आणि ती सुद्धा लोकप्रिय सुद्धा झाली. पण त्यानंतर मात्र खास करून पुर्ण पणे भारतीय व्यवस्थापनाच्या एस्कॉर्ट यामाहाने हाय खाल्ली. तेव्हा पासून आजवर बाजारात आलेली यामाहाची सर्व फोर स्ट्रोक वाहने बाजाराने नाकारली. एस्कॉर्ट यामाहाने कंपनीची उतरती कळाच सुरू झाली म्हणा ना!! तो पर्यंत फोर स्ट्रोक मोटरसायकलच्या बाजारात हिरो होंडा आणि बजाज यांनी धुमाकूळ घातला होता. आलिकडच्या काळात तर पल्सरने मोटरसायकल चालकांवर अशी काही जादू केली की मोटरसायकल म्हणजे पल्सर असे समीकरणच बनून गेले. पण यामाहाने हार नाही खाल्ली. शेवटी कोणतीही कंपनी धंदा करते ती फायदा मिळवण्यासाठीच. या दरम्यान एस्कॉर्ट यामाहाचे यामाहा इंडिया झाले अन यामाहाच्या भारतीय बाजारपेठेत एक नवा अध्याय सुरू झाला.

यामाहा इंडियाने नव्या दमाने कामाला सुरुवात केली. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या आपल्या काही वाहनांचा आणि भारतीय बाजारपेठेचा अभ्यास केला. नवे चांगले उत्पादन तर हवेच पण त्या सोबत वितरकांचे आणि सेवादात्यांचे विणलेले मोठे जाळे सुद्धा गरजेचे आहे हे यामाहा ने जाणले. यामाहाच्या लोकप्रिय मोटरसायकलींचा वंश भारतात वाढवायचा ठरवला. तो ही भारतीय बाजारपेठेला मान्य होईल असा.. अन मग आली, ० ते ६० की. मी प्रती तास वेग फक्त ३. २ सेकंदात गाठणारी यामाहा आर १५ ही नवी मोटर सायकल. यामाहा आर-१ ची हि भारतीय पिढी आहे. महागडी आहे. आता महाग आणि कमी इंधन क्षमता म्हटले मग आम्ही मोर्चा परत बजाजकडे :) पण आमचा मोर्चा तिकडे वळता वळता अचानक थांबला. का? अहो आम्ही तिची झलक पाहिली. अन आम्ही थबकलोच. तीच रूप-रंग आम्हाला तरी खूप आवडले. आर - १५ आमच्यासाठी नाही पण हि येणारी एफ - १६ मात्र आमच्यासाठीच आहे याची खात्री पटली.

एफ झेड - १६ हि मोटरसायकल बजाज पल्सर, होंडा युनिकॉर्न आणि सीबीझी एक्सट्रीम यांना टक्कर द्यायला येत आहे. खालच्या चित्रात या गाडीचे काही ठळक मुद्दे आहेत.

एफ झेड - १६ ची तांत्रिक माहिती खालील प्रमाणे :

  • इंजीन: एकच सिलिंडर, २ व्हॉल्व असलेले, १५३. ७ सी सी, फोर स्ट्रोक, एअर कुल्ड
  • शक्ती : १५ पीएस@ ८४०० आरपीएम
  • गिअरबॉक : ५ स्पीड
  • इंधन नियामक २६ एमएम सीव्ही कार्ब
  • चाके (पुढे/मागे): १७ इंच, ५ आऱ्या (स्पोक) असलेली आणि धातू मिश्रीत-डायकास्ट
  • टायर - १००/६०-आर१७ (पुढचे), १४०-६०- आर१७ (मागचे)
  • ब्रेक पुढे - डिस्क ब्रेक (267मिमी सिंगल क्रॉसड्रिल्ड व्हेंटिलेटेड रोटर वुइथ 2 पॉट कॅलिपर्स), मागे १३० मीमी ड्रम
  • सस्पेन्शन:— फ्रंट ४१मिमी टेलेस्कोपिक फोर्क्स, रिअर: मोटरसायकल टाइप
  • हेडलाइट: १२व्होल्ट २५ वॉट हॅलोजन वुइथ मल्टिफोकल रिफ्लेक्टर
  • एक्झ्हॉस्ट मिड शिप टाइप, साइड माउंटेड
  • इंधन टाकीची क्षमता : १३ लीटर

या गाडीचे एकूणच सगळे काही प्रभावी आहे. गाडीचे एकूण वजन १४० की. ग्रॅ असेल आणि सर्वोच्च वेग ताशी १४० की. मी असेल. गाडीचा डॅश बोर्ड डिजीटल असेल.

यामाहा एफ झेड - १६ ची काही चित्रे:

मोटर सायकलच्या वेगवेगळ्या रंगसंगतीः

मी तरी गाडीची आतुरतेने वाट पाहतो आहे. यामाहाचे उत्पादन नेहमीच उठावदार असते. आता बघूयात येत्या शनिवारी. गोव्याच्या रस्त्यावर ती येत आहे. मी पुण्याच्या शोरूम मध्ये जाऊन येईनच. तुम्ही हि पाहा.

अवांतरः माहितीचा स्त्रोत - महाजाल. वर लिहिलेली माहिती तंतोतंत खरी आहे असा लेखकाचा दावा नाही. तसेच लेखकाचा यामाहा इंडिया कंपनी सोबत कोणताही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध नाही.