जीवनसाथींच्या नजरेतून साहित्यिकांचे अंतरंग (अंधारातील अक्षरे... भाग-१ )

(सुप्रसिद्ध पुस्तकांव्यतिरिक्त आणखीही पुस्तके प्रकाशित असतात पण ती प्रकाशात आलेली नसतात. त्यांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न... अंधारातील अक्षरे)

साहित्यिकांची नावे, त्यांचं जीवन, कारकीर्दीची माहिती, जीवनातील काही किस्से साहित्यावर लक्ष ठेवून असणा-या रसिकाला माहीत असतात. लेखनाची शैली, विचाराचा परिचय असतो. साहित्यिक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच डोळ्यांसमोर येतो. त्याच्या कुटुंबाचा विचार कदापिही मनात येत नाही. वस्तुतः, त्याच्या अर्ध्याअधिक साहित्यिक कारकीर्दीला त्याच्या कुटुंबाने व विशेषतः जीवनसाथीने जवळून पाहिलेले असते. वाचकाच्या हे लक्षातही येत नाही.

आपल्या साहित्यिक जोडीदाराला साथ देताना त्याचा स्वभाव व लेखनामुळे आलेले वेगवेगळे प्रसंग कसे न्याहाळले गेले व एकूण जीवनाचा हा अनुभव कसा होता, हे साहित्यिकांच्या जीवनसाथींनी सांगितले आहे 'जीवनसाथींच्या नजरेतून साहित्यिकांचे अंतरंग' या पुस्तकात. लेखिका आहेत रत्नप्रभा जोशी.

जोशी यांनी घेतलेल्या एकतीस साहित्यिकांच्या मुलाखतींनी हे पुस्तक बनलेले आहे. यात लेखक व लेखिका दोन्ही आहेत. वानगीदाखल श्री. ना. पेंडसे, वसंत कानेटकर, गिरीजा कीर, रमेश मंत्री, रत्नाकर मतकरी, सुभाष भेंडे ही काही नावे.
'बलुतं' प्रकाशित झाल्यानंतरच दया पवार यांच्या समाजाबद्दल अनेकांना समजलं. दया यांच्या पत्नी हिराबाई यांना चांगल्या कामाबद्दल बढती मिळाली तरीही 'त्या विशिष्ट समाजातील आहेत म्हणूनच बढती मिळाली', असे टोमणे ऐकून घ्यावे लागले. शैलजा राजे पूर्वी टीकेने व्यथित होत असत पण नंतर स्थितप्रज्ञ झाल्या, असे त्यांचे पती प्र. द. राजे यांनी सांगितले आहे. सुभाष भेंडे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असले तरी चोरीच्या एका प्रसंगात ते कसे स्थितप्रज्ञपणे वागले, हे त्यांच्या पत्नी पुष्पताई यांनी सांगितले आहे. 'शिरीष कणेकरांच्या लेखनात फार खाडाखोड नसते. जे लिहायचं ते एकदाच' ही माहिती पत्ना भारती देतात. विजय तेंडूलकर व त्यांची पत्नी एके काळी रात्री नाटकाची तालीम संपवून दहा पैशांचं सरबत पिऊन व भेळ खाऊन घरी परतायचे, ही माहिती कळते.

अशी वैविध्यपूर्ण, रोचक माहिती तब्बल एकतीस साहित्यिकांबाबत या पुस्तकात मिळते. पुस्तकातील मजकूर लेख स्वरूपात नसून मुलाखत स्वरूपातच आहे. त्यामुळे संवाद जसाच्या तसा उतरला आहे. जोशी यांचे प्रश्न त्यांच्या जिज्ञासावृत्तीचे दर्शन घडवितात. व्यक्तिगत जीवनाविषयी उत्सुकता असणा-यांसाठी हे पुस्तक म्हणजे मेजवानीच ठरावी. साहित्यकाची पत्नी वा साहित्यिकेचा पती होणे, हे दुधारी जीवन आहे. एकीकडे सुखद तर दुसरीकडे वेदनादायक बाब आहे, याचा प्रत्यय सतत वाचकाला येत राहतो.

प्रश्नांमध्ये काही प्रमाणात अपरिहार्य तोच तो पणा आहे. 'रोहन प्रकाशन' च्या या कृतीचा दर्जा उत्तम आहे. जीवनसाथींना विचारलेले प्रश्न 'इटॅलिक' केले आहेत त्यामुळे ते झटकन कळून येतात. ही तांत्रिक बाब उल्लेखनीय आहे.

'रोहन प्रकाशन' चा पुणे येथील क्रमांक (०२०)२४४८०६८६
मुंबई येथील क्रमांक(०२२)२३८९२३७८