वांगी बटाटा रस्सा

  • वांगी पाव किलो
  • बटाटे पाव किलो
  • कांदे अर्धा किलो
  • सुके खोबरे १०० ग्रॅम (२०० ग्रॅमपर्यंत चालेल)
  • लसूण एक मोठी गड्डी (दोन गड्ड्या चालतील)
  • तेल, फोडणीचे साहित्य, मीठ
१ तास
तीन/चार जणांना पोटभर

वांगी व बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावेत.

वांग्यांचे मध्यम काप (अर्ध्या पेराच्या आकाराचे) करून पाणी भरलेल्या पातेल्यात टाकावेत.

बटाट्यांचे (सालीसकट) मध्यम काप करून पाणी भरलेल्या पातेल्यात टाकावेत.

कांदा बारीक चिरून घ्यावा.

सुके खोबरे जाड किसणीने किसून घ्यावे.

लसूण सोलून व ठेचून घ्यावी/घ्यावा (उगाच वाद नको!)

कढईत तेल (तीन मोठे डाव) तापवावे. ते धुरावल्यावर मोहरी घालावी. ती तडतडल्यावर ज्योत बारीक करून हळद, चिमूटभर मेथीदाणे घालावेत. मग ठेचलेली/ला लसूण घालून परतावे. लसूण नीट (लालसर) तळल्यावर कापलेला कांदा घालून ज्योत मोठी करावी. वरून झेपेल तेवढे लाल तिखट घालावे (रंग पाहिजे पण तिखटपणा नको असे असल्यास कश्मिरी मिरच्यांचे तिखट वापरावे). चटाचट हालवत राहावे. दोन मिनिटांनंतर त्यात किसलेले सुके खोबरे घालावे आणि ज्योत बारीक करावी. सर्व मिश्रण मंद आचेवर नीट परतून घ्यावे.

पाच मिनिटांनंतर त्यात कापलेल्या बटाट्याचा फोडी घालाव्यात आणि ज्योत मोठी करून मिश्रण हालवावे. खोबऱ्याचे तेल सुटू लागले की वांगीकाप घालावेत. हालवत राहावे. ज्योत एका मिनिटानंतर बारीक करावी.

झाकण ठेवून आठदहा मिनिटे शिजवावे. मध्येच एकदोनदा उलथण्याने हालवून घ्यावे. एव्हाना वांगी-बटाटे अर्ध्याहून जास्त शिजले असतील. वेगळ्या पातेलीत अर्धा लिटर पाणी उकळावे आणि भाजीत घालावे. भाजी रटारटा शिजवून घ्यावी.

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.

(१) सोबत फडफडीत भात नि भाजलेला पोह्याचा पापड असल्यास उत्तम.

(२) कॅलरीज आणि कोलेस्टरॉल या शत्रूंशी लढणाऱ्या वीरांनी इकडे लक्ष देऊ नये.