यशाची "फूंक'र

भुताखेतांवरील चित्रपटांविषयी आपल्याला किती कुतूहल असतं ना! असा चित्रपट प्रदर्शित झाला की एकदाचा पाहून टाकावा, असं आपसूकच प्रत्येकाला वाटतं. कथानक, निर्मितिमूल्यं याचा फारसा विचारही केला जात नाही. पूर्वी भुताटकीचे चित्रपट म्हणजे रामसे बंधू, असं समीकरण होतं. कुरूप, किळसवाणी भुतं त्यांच्या चित्रपटात दाखविली जायची. आता भयपटांच्या निर्मितीत रामगोपाल वर्मा आघाडीवर आहे. या चित्रपटांसाठी पुढारलेल्या तंत्रज्ञानाचा फार सुरेख वापर त्यानं करून घेतलाय. लाऊड संगीत, कॅमेऱ्याचे विविध अँगल्स, धक्कातंत्र याचा सर्वाधिक आणि प्रभावी वापर रामूच्या भयपटांत असतो. "भूत', "कौन', "डरना मना है' यांसारखे त्याचे चित्रपट खरोखरीच हादरवून टाकणारे होते.
अन्य भयपटांपेक्षा यात नावीन्य असल्यानं रामू म्हणजे वेगळं काहीतरी असणार, असा समज पुढं रूढ झाला. त्याच्या प्रत्येक चित्रपटालाच खच्चून गर्दी होऊ लागली. पण अलीकडच्या काळातील चित्रपट पाहता, रामू केवळ स्वतःचं नाव "कॅश' करून घेतोय, असं वाटू लागलंय. म्हणजे नाव चालतंय ना, मग खपवा काहीही! नुकताच त्यांचा "फूंक' प्रदर्शित झालाय. तत्पूर्वी या सिनेमाचे प्रोमोज पाहून काहीतरी वेगळं असेल, असं वाटलं होत; पण अपेक्षाभंग... काही वर्षांपूर्वी रामूनं "रात' चित्रपटाची निर्मिती केली होती. "फूंक' आणि "रात'ची कथा सारखीच आहे. फक्त पात्र, कलाकार आणि तंत्र बदलून त्यानं "फूंक' अक्षरशः प्रेक्षकांच्या माथी मारलाय. मात्र इथंही रामूचं नावच सरस ठरलं. माध्यमांनी "सामान्य' म्हटलं असतानाही सिनेमा हिट झाला. "फूंक'च्या निर्मितीसाठी सहा कोटी रुपये लागले. खर्चापेक्षा दुप्पट पैसा या सिनेमानं वसूल केलाय.
"फूंक'च्या यशाचं चित्रपटसृष्टी आणि टीकाकार या सर्वांनाच आश्चर्य वाटतंय; पण या यशाचं श्रेय मार्केटिंगलाच द्यायला हवं. लोकांना काय, कधी आणि कसं द्यावं म्हणजे लोक ते विकत घेतील, याचं तंत्रही रामूकडे आहे. त्यानं "फूंक'साठी त्याचा सफाईनं वापर केला. प्रदर्शनापूर्वी प्रत्येक वाहिनीवर या सिनेमाच्या प्रोमोजचा मारा होत होता. या जाहिरातीही अशा प्रकारे तयार करण्यात आल्या होत्या, की त्या पाहिल्यानंतर प्रेक्षक बुचकळ्यात पडेल आणि सिनेमा पाहण्यास प्रवृत्त होईल. यात रामू यशस्वी झाला आहे. "सरकार'च्या सिक्वलला रामूनं "सरकारराज' नाव दिलं. सरकार हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित होता. दुसऱ्या वेळी सरकारला त्यानं राज जोडला. त्यामुळे राज ठाकरेंचा संघर्ष यात आहे की काय, अशा अटकळी लोकांनी बांधल्या होत्या. प्रत्यक्षात सरकारराज म्हणजे गॉडफादरची कॉपी होती.
"फूंक'विषयी आणखी एक घोषणा करून रामूनं सिनेमाविषयी उत्कंठा वाढवून ठेवली. ""हा चित्रपट एकट्यानं पाहा आणि पाच लाख रुपये मिळवा, '' असं आव्हान त्यानं दिलं. (यामुळे "एव्हिल डेड' आणि "एक्झॉर्सिस्ट' या हॉलिवूडपटांची आठवण झाली. हे चित्रपटही एकट्यानं पाहणाऱ्यास बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. ) म्हणतात ना, बोलेल त्याची माती विकेल. पण सदा सर्वकाळ असं चालत नाही. मर्यादा आणि बनवेगिरी उघड झाली की तिकीट खिडकीवर सडकून मार खावा लागतो. रामूची वाटचाल त्याच दिशेनं सुरू आहे. "रामगोपाल वर्मा के शोले', "कॉंट्रॅक्ट' ही त्याची ताजी उदाहरणं आहेत. रामूच्या अपयशाचा सिलसिला पुढंही असाच सुरू राहतो की त्यावर यशाची "फूंक'रही मारली जाते "राम' जाणे!