साबूदाण्याची खीर

  • २ वाट्या दूध
  • १/२ वाटी भिजलेला साबूदाणा
  • पाव चमचा वेलदोड्याची पूड
  • ३ चमचे साखर
२० मिनिटे
२ वाट्या.

दूध गरम करायला ठेवावे. गरम झाले की, वेलदोड्याची पूड घालावी व ढवळावे. साय येऊ देऊ नये.  दूध उकळायच्या आधीच साबूदाणा घालावा. ४-५ मि. मध्येच तो पारदर्शक होईल. मग साखर घालून, ती विरघळली की, खीर गॅसवरून खाली उतरवावी. साखर घातल्यावर फारवेळ गॅसवर ठेवू नाही. त्यामुळे साबूदाणा थोडासा चिवट होतो.

सजावटीच्या नावाखाली बाकी माल-मसाला घातला तरी छान लागेल खीर. पण मूळची पद्धत हीच.

साबूदाणा भिजवताना:

साबूदाणा शक्यतो ७ ते ८ तास भिजू द्यावा. म्हणजे छान भिजतो आणि आतून कच्चट राहत नाही.

साबूदाणा पाण्यातून एकदा धुवून घ्यावा. साबूदाणा पाण्यात पूर्ण बुडेल एवढे पाणी घालून ठेवावा.

भारतात असाल तर सुपर-फाईन आणि अमेरिकेत असाल तर दीप चा साबूदाणा चांगला हा माझा अनुभव.

काहीजण साबूदाणा भिजवताना थोडंसं दूध पण घालतात. त्यामुळे साबूदाणा मऊसूत छान भिजतो.

शेवटी साबूदाण्याच्या प्रतीप्रमाणे पाण्याच्या प्रमाणाचा थोडा-बहुत प्रयोग करून जम बसवावा लागतो.

तरीही काही गोंधळ झालाच तर:

साबूदाणा पूर्ण भिजला, पण पाणी जास्त झाले, तर तो कागदावर/सुती फडक्यावर पसरवून ठेवावा.

साबूदाणा कच्चटच राहिला, तर अजून थोडे पाणी घालण्यावाचून पर्याय नाही.

खिरीसाठी साबूदाणा भिजवताना, पाणी थोडे जास्त झाले तरी चालू शकेल. साबूदाणा ओलसर राहिला तरी दुधात घालायचा असल्याकारणाने फरक पडणार नाही.