फ्रीकॉनॉमिक्स - पुस्तक परीक्षण

फ्रीकॉनॉमिक्स- प्रत्येक गोष्टीमागील गूढ अर्थ
   वारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या भागातच कै.पु.ल.देशपांडे यांना दिसलेला अमेरिका देश आणि मला दिसत असलेला यातील गुन्हेगारीच्या प्रमाणावर मला आढळलेल्या फरकाची मी नोंद घेतली होती आणि रस्त्यावरून जाणाऱ्या अपरिचित माणसाने पत्ता विचारल्यावर थरथर कापणारी म्हातारी मला कोठे दिसली नाही असा माझा अनुभवही नोंदवला होता.मात्र आम्हा दोघांचेही निरीक्षण चुकीचे नव्हते कारण १९६० पासून १९९० या काळात अमेरिकेतील खून, मारामाऱ्या,बलात्कार,चोऱ्या.यांचे प्रमाण खरोखरच इतके वाढले होते की गुन्हेगारीविषयक तज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,पोलिस अधिकारी ,राजकारणी या सर्वांनी पुढील काळात  रस्त्यावरून रक्ताचे पाट वहातील असे भयानक भाकीत केले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घडले मात्र याच्या अगदी उलटे म्हणजे १९९० मध्ये एकदम गुन्हेगारीत अचानक घट आणि तीही जवळजवळ ४०% झाल्याचे आढळून आले आणि त्यानंतरच्या वर्षातही हाच कल राहिला आणि गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटतच राहिले.
    आता मात्र या बदलत्या परिस्थितीचे श्रेय घेण्यास सगळे सरसावले. राजकारणी सुधारलेल्या अर्थव्यवस्थेचा हा परिणाम म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेऊ लागले तर पोलिस दल आपल्या कार्यक्षम कारभाराचाच हा परिणाम म्हणून ते श्रेय स्वत:कडे घेऊ लागले.निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांनी सुचवलेली वेगवेगळी कारणे अशी होती.
१)पोलिस यंत्रणेने वापरलेल्या नव्या क्लुप्त्या
२)तुरुंगांचा कार्यक्षम वापर
३)अमली पदार्थांच्या किंमतीतील घट
४)लोकांचे वाढते वय
५)पिस्तुल व बंदुकांच्या वापरावरील सक्त नियंत्रण
६)सुधारलेली अर्थव्यवस्था
७)पोलिसांची वाढती संख्या
८)देहांताच्या शिक्षेचे वाढते प्रमाण
पण या सर्व कारणांपेक्षा अगदी वेगळे आणि सर्वांनी दुर्लक्षिलेले कारण एका अर्थशास्त्रज्ञाने शोधून काढले ते कारण ऐकून सगळ्यानी त्याची वेड्यातच गणना केली पण त्याने मात्र उपलब्ध सर्व सांख्यिकी माहितीच्या आधाराने वरील सर्व अंदाज कसे चुकीचे आहेत हे सिद्ध केले.त्या अर्थशास्त्रज्ञाचे नाव होते स्टीव्हन लेविट.त्याला चाळिशीच्या आतील सर्वोत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञाला दोन वर्षातून एकदा दिले जाणारे जॉन बेट्स क्लार्क मेडल मिळाले होते. त्याच्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स मॅगेझिनमध्ये " स्टीव्हनला गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या दिसतात " असा उल्लेख आहे म्हणजे त्याची विचार करण्याची पद्धत इतर अर्थशास्त्रज्ञांपेक्षा वेगळी असल्यामुळे तो रूढ मार्गाने विचार करत नाही.
    याच कारणामुळे त्याने या गुन्हेगारीच्या प्रश्नाचा अगदी वेगळा अर्थ लावला आणि टेक्सासमधील एक गरीब अशिक्षित,दारुड्या २१ वर्षाच्या नॉर्मा मकॉवेरी नावाच्या स्त्रीमुळे ही सर्व गुन्हेगारी घटली आहे असा निष्कर्ष काढला हा निष्कर्ष म्हणजे  जगाच्या एका कोपऱ्यातील खंडात फुलपाखराने पंख मिटले आणि त्यामुळे दुसऱ्या खंडात वादळ झाले असा निष्कर्ष काढण्यातलाच प्रकार होता.पण त्यामागील  तर्कशास्त्र त्याने उलगडून सांगितल्यावर मात्र सर्वांना ते मान्य करावे लागले.
     नॉर्माला आत्तापर्यंत दोन मुले झाली होती आणि १९७० मध्ये ती पुन्हा तिला दिवस गेले होते.यावेळी गर्भपात करून या अपत्याची जबाबदारी टाळावी अशी तिची इच्छा होती पण टेक्सासमध्ये तेव्हा गर्भपाताला कायदेशीर मान्यता नव्हती.त्यासाठी कायदेशीर मान्यता घेण्यासाठी तिने कोर्टात जावे यासाठी काही सेवाभावी संस्थानी तिला पुढे करून या विषयाची तड लावण्याचे ठरवले.खटला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन शेवटी तीन वर्षानंतर म्हणजे २२ जानेवारी १९७३ मध्ये निकाल नॉर्माच्या बाजूने लागला,तोपर्यंत ती प्रसूत होऊन तिला झालेले मूल तिने दत्तकही दिले होते.पण त्याचा परिणाम असा झाला की गर्भपाताला संपूर्ण देशात कायदेशीर करण्यात आले.              
     पण तरीही या खटल्याच्या या निकालाचा १९९० नंतर कमी झालेल्या गुन्हेगारीशी संबंध कसा पोचतो?
  यावर स्टीव्हनने दिलेले स्फष्टीकरण असे की गुन्हेगारीचा विचार केल्यास असे आढळते की प्रतिकूल परिस्थितीत किंवा मातापित्यास नको असताना जन्माला येणारी मुले गुन्हेगारीकडे वळण्याची जास्त शक्यता असते.अमली पदार्थाच्या व्यापारात गुंतलेल्यात अशा मुलांचे प्रमाण ८० ते ९०% असते हे त्याने दाखवून दिले..१९७३ नंतर अमेरिकेतील गर्भपाताचे प्रमाण एकदम वाढले आणि त्यात नॉर्मासारख्या स्त्रिया ज्यांना पूर्वी बेकायदेशीर गर्भपात करून घेणे परवडत नव्हते अशाच बहुसंख्य होत्या आणि अशाच स्त्रियांच्या मुलाची गुन्हेगारीकडे वळण्याची जास्त शक्यता असते. अशी सर्व मुले जन्मासच न आल्यामुळे १९९० मध्ये जी वयात येऊन चोरी.बलात्कार,खून असे मोठे गुन्हे करू लागली असती अशी लोकसंख्याच एकदम घटल्यामुळे गुन्हेगारीत इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली असे स्टीव्हनने आकडेवारी देऊन सिद्ध केले.
  अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या या अर्थतज्ञाने अमेरिकेतील एम्‍.आय. टी. या संस्थेत डॉक्टरेट केली आहे आणि अनेक पुरस्कारांचा तो मानकरी आहे.त्याला पुस्तक लिहिण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सहजपणे नकार देत म्हटले,"मला इतक्या असंख्य गोष्टींतील गूढ उकलण्यात रस आहे की तेवढा वेळच मला नाही त्यामुळे पुस्तक लिहायचे नाव काढू नका पण--" आपला नकार जरा सौम्य करत   "जर स्टीफन दुबनर बरोबर लिहायचे असेल तर मात्र विचार करीन" असा प्रस्ताव त्याने मांडला.
    स्टीफन दुबनरवर न्यूयॉर्क टाइम मॅगेझिनने लेविटची मुलाखत घेण्याची कामगिरी सोपवली होती आणि त्यावेळी आलेल्या परिचयामुळे इतर अर्थशास्त्रज्ञांसारखा  दुबनर  अगदीच मामुली नाही  असा त्याचा  ग्रह  झाला होता.
  या दोघांनी मिळून लिहिलेल्या या पुस्तकाला फ्रीकॉनॉमिक्स म्हणजे प्रत्येक गोष्टीची दुर्लक्षित बाजू Freekonomics-The rogue economist explores the hidden side of everything असेच नाव देण्यात आले आहे आणि त्यात बनवाबनवी करणारे शिक्षक आणि सुमो कुस्तीगीर यात साम्य काय आहे?,किंवा कु क्लॅन क्लक्स ही कुख्यात संघटना कुठल्या क्षुल्लक कारणामुळे कमजोर झाली, सुयोग्य पालकत्व अशा गोष्टींविषयी अगदी वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे.त्यामुळे हे पुस्तक अर्थशास्त्रावर असून एकाद्या रहस्यमय
कादंबरीसारखे वाचनीय झाले आहे लेविटच्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी दुबनरने त्याच्यावरील लेखात म्हटले आहे,"लेविटच्या मते अर्थशास्त्र हे उत्तरे मिळवण्याचे एक सुयोग्य साधन आहे पण त्यासाठी विचारल्या जाणाऱ्या आवश्यक प्रश्नांचा मात्र तुटवडा आहे.लेवीटचे  वैशिष्ट्य हेच की तो असे असंख्य प्रश्न विचारू शकतो." आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडतील.
 
Freeconomiks by Steven B.Levitt and Stephen J.Dubner
Harper Collins Publishers Inc.