आनंदाने...

पुन्हा पुन्हा मी कविता रचतो, आनंदाने
एकटाच मी वाचत बसतो, आनंदाने...

दुनियेला तर सवडच नसते माझ्यासाठी
माझे मन मग मीच रिझवतो, आनंदाने...

आठवणींच्या घड्यात पाणी तुडुंब असते
पुन्हा पुन्हा मी तेच उपसतो, आनंदाने...

"माझ्यामागे लागून तुजला काय मिळाले? "
नियतीला मी प्रश्न टाकतो, आनंदाने...

पूर्वी दुःखे छोटी-मोठी जाणवायची;
आता त्यांना सुखात गणतो, आनंदाने...

प्रवास माझा आनंदातच चालू असतो
'अजब' मला तो सोबत करतो, आनंदाने...