काय सांगू राजेहो एकविसाव्या शतकाची कथा,
नाकतोंडांतून पाणी जाऊ लागलं आता.
एकविसाव्या शतकाचा फ़ार्स हाये सारा,
एक 'विसावा' ही न भेटावा गरिबायले साऱ्या.
ह्या शतकात संगीताचे पार झाले येले,
नवीन पिढी राजेहो पॉप अन रॅप वर झुले.
जुन्या संगीताचा पार वाजला बाजा,
मायकल अन रिकी झाले पोट्ट्यायचा राजा.
एकविसाव्या शतकात भारत खेयामंधी मांगच रायला,
घूस देण्यात जो तो म्हणे म्याच येतो पयला.
ह्या शतकात शेतकऱ्याचे लई हाय बुरे हाल,
त्यायच्या भल्यासाठी कुणी पुढं येत नाही माईचा लाल.
दररोजच्या मरणापायी थो एकदाच मरतो म्हंते,
त्याच्या मरणाचीबी हे लोक बातमी करते.
राजकारण्यांची हाय इथं चंगळ भारी,
मंत्री झाला का पैसे दाबाची मशीन येते घरी.
ह्या शतकात राजकारणासारखा धंदा नाही,
ज्याले याची ओढ नाही असा एक बी बंदा नाही.
ह्या शतकात शिक्षणाचा झाला खेळखंडोबा सारा,
पैसे फेकले का डिग्र्या येते तुमच्या दारा.
सरकारच्या कृपेनं गरीबाचं लेकरू शिकू शकत नाही,
फीचे पैसे काही कालेजात फेकू शकत नाही.
शिरीमंताच कुत्रं राजेहो इम्पोर्टेड बिस्किट खाते,
अन मेळघाटातल नंग पोट्ट मिठं भाकरीले तरसते.
जो तो म्हंतो पैसे फेकून जीवन बनवतो झकपक,
पण यासाठी सोडलं त्यायनी नितीअनितीच सोयरसुतक.
देवा! अरे किती हा इरोधाभास,
काही तरी करण्यासाठी तूच यावं खास..
म्हणून म्हंतो देवा एक काम कर आता,
सगळ्याले मिळू दे पायजे ते ते आता...
नायी त मंग यक दीस तुया बी फटू इन छापून,
लोग मतलबासाठी तुले बी टाकतील इकून...