येस `बॉस'!

मोकळ्या पटांगणाऐवजी एका बंद घरातल्या शाळेत त्या मुलांचा खेळ रंगला होता. खेळाचं नाव होतं - "महाराज म्हणतात... ' खेळाचं स्वरूप साधारणपणे असं असतं ः एकानं राज्य घ्यायचं. तो होणार महाराज. मग त्यानं एकेकाला ऑर्डर सोडायच्या - महाराज म्हणतात, पाणी प्या. महाराज म्हणतात, खाली बसा. महाराज म्हणतात अमकं करा अन् तमकं करा...! सगळ्यांनी त्या पाळायच्या जो पाळणार नाही, त्यानं बाहेर जायचं. इथे "महाराज'च्या ऐवजी त्याला "बॉस' म्हणत होते, एवढाच फरक...
ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी. ). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या. त्या पण लंडन-बिंडन कुठल्या कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या. मुलं आणि हे "बॉस', यांच्यात समन्वयाचं काम त्या करत होत्या.
या मुलांचं काम काय, तर एकतर त्या महाराजांनी दिलेल्या ऑर्डर पाळायच्या आणि उरलेला वेळ चकाट्या पिटत, एकमेकांची उणीदुणी काढत बसायचं. काही मुलं पार बिघडलेली होती. कुणी विड्या फुंकायचं, कुणी मन मानेल ते करायचं, कुणी शिवराळ भाषा वापरायचं, कुणी अंगावर धावून जायचं...
या सगळ्या गोतावळ्यात एका प्रसिद्ध दिवंगत राजकीय नेत्याचा मुलगाही होता. घरात, परिसरात, कॉलनीत, गल्लीत उच्छाद मांडणाऱ्या आणि नकोशा झालेल्या मुलांना शिक्षा म्हणून होस्टेलला पाठवतात ना, तसंच त्यालाही "तीन महिने कटकट नको' म्हणून या शाळेत पाठवलं होतं. पण झालं भलतंच. त्याच्या खोड्या कमी व्हायच्या ऐवजी इथे येऊन आणखी वाढल्या होत्या. आपल्याबरोबर त्यानं बाकीच्या मुला-मुलींनाही बिघडवायला सुरवात केली होती... त्यांचा हा खेळ बघणारे लोकही त्याच्या या थेरांमुळे हवालदिल झाले होते.
या अनोख्या शाळेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं, की तिथे "बॉस'च्या, अर्थात "महाराजां'च्या ऑर्डर पाळण्याशिवाय दुसरी कोणतीही शिस्त नव्हती. त्यामुळं कुणीही कुणाच्याही बाथरूममध्ये घुसणं, एखाद्याची टवाळी करणं, अंगचटीला जाणं, अंधारात कुणाचा गैरफायदा घेऊ पाहणं, याही कृत्यांना मोकळं रान होतं. किंबहुना, जास्तीत जास्त लोकांनी हा खेळ बघावा, म्हणून त्यासाठी प्रोत्साहनच होतं...
तो खोडकर मुलगा या सगळ्यात आघाडीवर होता. शाळेच्या सगळ्या मोकळ्या वातावरणाचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला होता. रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेली मुलगी असो, वा चित्रपटांत बरीवाईट कामं करणारी मुलगी, त्याच्यासाठी दोघीही सारख्याच होत्या. शाळेनंही त्याला प्रोत्साहन दिलं होतं... त्याच्या या खोड्या, कुरापतीच खेळाचं आकर्षण ठरल्या होत्या.
अचानक काय झालं माहित नाही, पण मुलांच्या खोड्या कमी झाल्या. मुलं थोडी सुधारल्यासारखी वाटू लागली. तो खोडकर मुलगा तर जरा अधिकच. शोध घेतल्यावर कळलं, की कुणीतरी वरून दट्ट्या आणला होता. हा खेळ आयोजित करणाऱ्यांनाच झापलं होतं. त्यांच्यावर कारवाईची ताकीद दिली होती. त्यामुळं मुलंही सुतासारखी सरळ आली...