मनोगत दिवाळी अंक २००८ प्रकाशन

प्रिय मनोगती जन,
सर्व प्रथम, आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. 

दीपावली म्हणजे दिव्याच्या रूपातून साजरा होणारा प्रकाशाचाच उत्सव! दीपावलीच्या शुभेच्छांसह हा 'मनोगत' चा  दुसरा दिवाळी अंक वाचकांच्या स्वाधीन करतांना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.
आमच्याकडे आलेल्या लेखनातून मनोगतींनी जपलेली 'मनोगत' या संकेतस्थळाची वैशिष्ट्ये  जशी आम्हाला अंकाची जडणघडण आणि निर्मिती करतांना जाणवली तशी ती रसिक वाचकांनाही जाणवतील याची खात्री आहे. हा अंक वाचकांना अभिरुचीपूर्ण आणि ताजातवाना वाटेल अशी आशा आहे. जगाच्या पाठीवर विखुरलेल्या मराठीप्रेमी सृजनशील मनांनी दिलेले योगदान हाच या अंकाचा आधारस्तंभ आहे. सहकार्याबद्दल आम्ही लेखकवर्गाचे  ऋणी आहोत. अंक वाचकांच्या पसंतीस उतरला तर ते सर्व श्रेय या सृजनशील आविष्काराला आहे.    

एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे ही अंकसमिती म्हणजे हजारांमध्ये सदस्य असणाऱ्या पूर्ण मनोगताचे प्रतिनिधित्व नव्हे. त्यामुळे आम्ही  निवडलेले हे सर्व मनोगतींना सर्वश्रेष्ठ वाटेल असे नाही.  आलेल्या लेखनामधून जास्तीत जास्त लेखन आम्ही या अंकात समाविष्ट केले आहे.  लिखाणाचे गुण आणि दर्जा हा बऱ्याचदा व्यक्तिसापेक्ष असतो. त्यामुळे ज्यांच्या लिखाणांची या अंकात निवड होऊ शकली नाही त्यांना ही विनंतिवजा आग्रह आहे की त्यांनी नाउमेद न होता लिहीत राहावे. साहित्यप्रेमी रसिकांकडून आणि लेखकर्गाकडून पुढील वर्षी सुद्धा आम्हाला असेच किंबहुना याहून अधिक सहकार्य मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते.

 व्यंगचित्रांकरता शिवाजी जवरे यांचे विशेष आभार मानायलाच हवेत.  मनोगताच्या सर्व साहित्याप्रमाणे दिवाळी अंकातील साहित्याला आपल्याला प्रतिसाद देता येतील अशी सोय मनोगताच्या प्रशासनाने केली आहे.  त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.   
वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे अंकसमिती शक्य तेवढ्या लवकर देण्याचा प्रयत्न करेल. (त्याकरता समितीला ४८ तासाचा अवधी द्यावा अशी वाचकांना नम्र विनंती)

अंकसमिती
मनोगत दिवाळी २००८