उत्तर आणि निर्णय

मायकेल क्रिक्टन हे नाव त्यांच्या जुरासिक पार्क या कादंबरीमुळे आणि त्यावरील चित्रपटामुळ सर्वांना सुपरिचित आहे. आधुनिक वैज्ञानिक संशोधनाच्या गैरवापराबद्दल टीकेचा सूर त्यांच्या लेखनात असतो. त्यांच्या अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या 'नेक्ष्ट' या कादंबरीत जैवसंशोधनाच्या दुरुपयोगाविषयी आणि अमेरिकेत त्याविषयी जो कायद्याचा कीस काढून बऱ्याच वेळी सर्वसामान्य माणसाचा बड्या संशोधनप्रकल्पात गिनिपिग सारखा कसा वापर करण्यात येतो यावर प्रकाश टाकला आहे. त्या कादंबरीवर बरीचउलटसुलट टीका झाली आहे. म्हणजे ही त्यांची सर्वात चांगली कादंबरी आहे असे काही वाचकांना वाटते तर काहींच्या मते ती वाचण्यात वेळ वाया घालवू नये. मला जरीकथानक गुंतागुंतीचे असले तरी ती शेवटपर्यंत हातातून खाली ठेवावी असे वाटले नाही

आज समीरच्या शाळेत जायचे आहे ध्यानात आहे ना? " चहाचा कप तोंडाला लावतानाचपरागने विचारलेल्या या प्रश्नाचा प्राचीला इतका राग आला की त्याच्या किंवा त्याच्यासमोर स्वत:च्या दोन फडाफडा तोंडात मारून घ्याव्यात असे तिला वाटून गेले कारण हा प्रश्न तो कालपासून चौथ्यांदा विचारत होता. पण ते क्षणभरच, कारण हे काम आपल्यालाच करावे लागणार आहे याचे भान तिला होते. बायका कितीही शिकल्या, कितीही महत्त्वाची कामे पार पाडू लागल्या तरी त्यांचीच अशी ठरलेली कामे त्यांना करावी लागतातच त्यापैकी आपल्या पाल्याच्या शाळेतील कर्तृत्वावर लक्ष ठेवणे आणि त्याच्या अगर तिच्या शाळेकडून मिळणाऱ्या अहवालावर योग्य ती कार्यवाही करणे हे एक महत्वाचे काम!

खरेतर मूल जन्माला घालण्याचे अवघड काम स्त्रीने पार पाडलेले असते. त्यासाठी तिने सोसलेल्या यातनांची पुरुषाला कल्पनाही येणे शक्य नसते असे असताना निदान त्यापुढील जबाबदारीतील महत्वाचा राहिला, निदान जमेल तेवढा वाटा पुरुषाने उचलायला काय हरकत आहे असे अनेक वेळा प्राचीला वाटे. पण जन्मानंतर काही काळ तरी आईवरच जास्त विसंबून राहिल्यामुळे त्या मुलाला अगर मुलीला आईवरच आपला हक्क असल्यासारखे वाटते आणि त्यामुळे पुरुषाची या जबाबदारीतून विनासायास सुटका होत असते आणि त्यात पुन्हा न अडकण्याची दक्षता घेणे एवढेच आपले काम हे बहुतेक पुरुष बरोबर जाणत असतात. आणि पराग तर पाणी प्यायचे असेल तर बायकोने ग्लास आणून द्यावा आणि तो परत तिनेच उचलून न्यावा असे समजणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आदर्श मानणारा पुरुष असल्यामुळे प्राचीच्या या मताची दखल घेणे त्याला मुळीच मान्य नव्हते. अगदी अमेरिकेत आल्यावरही त्याच्या या मनोवृत्तीत काही फरक पडला नव्हता.

त्याच्या मते तिने नोकरी करायचेच काही कारण नव्हते. तिने घर संभाळावे मी बाहेरचे पाहतो हा त्याचा दृष्टीकोन होता पण तिच्या बायोइंजिनियरिंगच्या अपूर्व यशामुळे त्याच्यापेक्षाही तिलाच अमेरिकेत जास्त मागणी असल्यामुळे खरे तर प्राची त्याच्याबरोबर आली म्हणण्यापेक्षा तोच प्राचीचा पदर पकडून आला म्हटले तरी चालले असते. मात्र एकदा अमेरिकेत येऊन सुस्थापित झाल्यावर त्याच्या जुन्या आग्रहाने पुन्हा उचल घ्यायला सुरवात केली होती आणि त्यामुळे त्याच्या मते जी कामे तिची होती त्याकडे ढुंकूनही पहायचे नाही या त्याचा बाण्यात त्याने अजिबात बदल होऊ दिला नव्हता.

तरीही आज एक प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे असा विचार करून आवाजात जरा जास्तच गोडवा आणण्याचा प्रयत्न करीत प्राचीने, " या वेळी तरी तुला जाता येणार नाही का पराग? आज अगदी महत्वाचे काम आहे रे "असे म्हणून पाहिले, पण त्यावर तिच्या अपेक्षेप्रमाणेच परागने

"ए उगीच मला अडकवू नकोस बरका नसत्या फंदात "म्हणून तिला धुडकावून लावले.

लग्नापूर्वी परागचा हा स्वभाव माहीत असता तर आपण त्याच्याशी लग्न करण्याचा विचार तरी केला असता का याविषयी प्राचीला शंकाच होती. पण नेहमीच्या पठडीत लग्न झाल्याने तिला फारसा विचार करायला वेळच मिळाला नव्हता. म्हणजे एका लग्नसमारंभात परागच्या आईला प्राची पाहताच आवडली होती आणि आपल्या मुलासाठी त्यानी तिला मागणीच घातली होती. प्राचीच्या आईवडिलांनाही अशी चालून आलेली मागणी तिने नाकारू नये असे वाटणे सहाजिकच होते. अर्थात त्यांनी त्याविषयी निर्णय प्राचीलाच घ्यायला सांगितले. परागला पाहून त्याच्यासारख्या उंच, रुबाबदार आणि देखण्या तरुणाला नकार द्यावा असे कोणत्याच मुलीला वाटायचे काही कारण नव्हते आणि मागणी आल्यामुळे प्राचीलाही थोडेफार बरे वाटलेच होते. त्यामुळे हा जुगार खेळून पहायला काही हरकत नाही असे तिला वाटले मग लग्न व्हायला काय उशीर?

लग्नानंतर थोड्याच दिवसात समीरचा जन्म झाला होता त्यावेळी पराग इंफोटेकमध्ये होता त्यामुळे त्याचे पुण्यात घर असूनही त्याना बंगळुरूला राहावे लागले आणि त्यामुळे प्राचीने काही दिवस तरी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसानी परागचे वडील सेवानिवृत्त झाल्यावर त्याचे आई वडील त्यांच्याकडे येऊन राहू लागले आणि मग आपण नोकरी करावी असे प्राचीला वाटू लागले आणि तिच्या उत्तम पदवीमुळे आणि मुलाखतीत दाखवलेल्या हुशारीमुळे ज्या बायोटेक कंपनीत तिची निवड झाली त्या कंपनीने तिला लगेच अमेरिकेतच पाठवण्याची तयारी दाखवली.

परागला ही गोष्ट पचनी पडण्यासारखी नव्हती पण त्याच्या आईने सुनेला "तू समीरची मुळीच काळजी करू नकोस" असे सांगून परागची तर त्याहूनही नको असेच जणू सुचवल्यामुळे त्याचा नाइलाज झाला. अर्थात प्राचीला आता माघार घेण्याचे कारण उरले नाही. पण सुरवातीला तिला एकटीलाच जावे लागणार होते आणि तिच्यासारख्या तल्लख मुलीला ते काही अवघड नव्हते.

प्राचीची बायोजेन प्रयोगशाळा अमेरिकेत न्यूयॉर्कलाच होती. पहिल्या दिवशी रिपोर्ट करायला तिच्या ग्रुपलीडरच्या केबिनमध्ये ती शिरली आणि दरवाजातच थबकली कारण समोर ग्रुपलीडर म्हणून बसलेली व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून तिचा शाळेतील दोस्त प्रदीपच होता. "हाय प्राची, प्राचीच ना तू? " त्यानेही तिला ओळखले होते. प्राचीला एकदम बरे वाटले, कितीही नाही म्हटले तरी एकटीच आल्याचे थोडेफार दडपण तिच्यावर होतेच पण प्रदीपला पाहून ते दूर झाले. "अरे प्रदीप, कमालच आहे किती दिवसांनी भेटतो आहेस "

"खर आहे पण तुझा पत्ता कोठे होता? मग कसा भेटणार तुला? " प्रदीपनेही तिला पाहून आनंद व्यक्त केला. खरे तर प्रदीप आणि प्राची लहानपणी अगदी शेजारी राहत आणि त्यांच्या कुटुंबांचा चांगलाच घरोबा. पण प्राची दहावीत असताना तिच्या वडिलांची बदली हैद्राबादला झाली आणि मग त्यांची गाठ आजच पडत होती.

प्रदीप भेटल्यामुळे प्राचीला काहीच अडचण उरली नाही हे तिने फोनवरून घरी कळवताच परागच्या आईला फारच बरे वाटले कारण आपण आग्रहाने सुनेला एकटी पाठवल्याने तिची काही गैरसोय झाली तर आपल्याला बोल लागायचा अशी टोचणी त्यांना होती ती दूर झाली. पण परागला मात्र ते ऐकून जरा मत्सर वाटला असावा. हे त्याच्या "आता काय जुना मित्र भेटला मग मजा आहे तुझी, मात्र त्याच्या नादात आम्हाला विसरू नका " या प्रतिसादावरून तिला वाटले त्यामुळे "असे काही बोलणार असशील तर फोन बंदच करेन "अशी धमकी तिने दिल्यावर तो जरा पडत्या सुरात बोलू लागला.

प्राची गेल्यावर परागनेही खटपट करून कंपनीतर्फे स्वत:ची पण अमेरिकेत जाणाऱ्या चमूत वर्णी लावली आणि थोड्याच दिवसात ते तिघेही न्यू जर्सीमधील एडिसन येथे राहू लागले. परागला प्रिन्स्टनला कामावर जावे लागे आणि प्राचीला न्यूयॉर्कला. दोघेही ट्रेननेच कामवर जात.

पराग आल्यानंतर त्याची आणि प्रदीपचीही चांगलीच दोस्ती झाली पण प्रदीप खरा जास्त दोस्त बनला तो समीरचा. त्या दोघांनाही एकमेकावाचून करमत नसे.

प्राचीच्या प्रयोगशाळेतील प्रयोगाचा एक भाग म्हणून काही मानवी गुणसूत्रे एका आफ्रिकन पोपटाच्या शरीरात अंतर्भूत करून त्याचा त्याच्या वाचाशक्तीवर काय परिणाम होतो हे पाहण्याचा प्रयोग चालू होता. खास पॅरिसचे बायोटेक संशोधक जेरी लोगन यांच्या संशोधनाबरहुकुम हा गुणसूत्र अंतर्भूत करण्याचा प्रयोग केला गेला होता. हा पोपट जराश्या करड्या रंगाचा असतो आणि त्याला उपजतच हुबेहूब माणसाच्या बोलण्याचा किंवा आणखीही बरेच आवाज काढण्याची क्षमता असते. त्यामुळे या गुणसूत्रामुळे त्यात आणखी काय सुधारणा होते हे पाहणे आणि काही लक्षणीय सुधारणा आढळली तर अशा प्रकारचे शास्त्र प्रगत करून त्याचे पेटंट घेणे हा प्राचीच्या बायोटेक कंपनीने प्राचीवर सोपवलेल्या प्रयोगाचा भाग होता. संभाषण हा या प्रयोगाचा महत्वाचा भाग असल्याने त्या पोपटाचे नाव स्वीटॉक असे ठेवण्यात आले होते. पण प्राची त्याला सुभाष म्हणे.

प्राचीवर तो पोपट घरीच ठेवून त्याच्यावर काय परिणाम होतात याचे जास्तीत जास्त काळ निरीक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याला विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ काही विशिष्ट रसायने यांची इंजेक्शने देणे हा तिच्या कामाचा भाग असल्यामुळे त्या पोपटाला घरी आणणे आवश्यक होते त्यापेक्षाही आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे या प्रकारच्या पोपटांना सोबत आवश्यक असते. त्यांना एकांतात ठेवले तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते.

प्राची सुभाषला घरी घेऊन आली आणि आता तो घरीच राहणार हे परागला सांगितल्यावर त्याने विशेष काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही फक्त, "त्याचा पिंजरा वगैरे मला साफ करायला लावू नकोस" असा जरा तक्रारवजा सूर मात्रे काढला पण त्यावर प्राचीने, "त्याची काळजी नको करूस त्यासाठी कंपनीकडून एक असिस्टंट मला मिळणार आहे"असे सांगून त्याच्या तक्रारीतील हवाच काढून घेतली.

त्या पोपटाच्या देखभालीसाठी कंपनीच्या प्रयोगशाळेतीलच एक अगदी नवीनच लागलेली प्रयोगशाळा सहाय्यक सॅली तिच्या मदतीला कंपनीने दिली होती. प्राची कंपनीत गेल्यावर ती या पोपटाकडे लक्ष देईल अशी अपेक्षा होती. सॅली मोठी गोड मुलगी होती आणि तिने पोपट आणि समीर या दोघांनाही संभाळण्याचे काम घेऊन प्राचीचा बराच भार हलका केला होता. कधी कधी प्राचीला कंपनीतून यायला उशीर झाला तर परागलाही ती चहा आणि त्यासोबत तिच्या पद्धतीने एकादा खाद्यपदार्थ करून द्यायची.

पण सॅलीऐवजी सुभाषची खरी देखरेख समीरच करणार असे दिसू लागले. एडिसनमध्ये रहायला लागल्यापासून बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरी मित्रपरिवाराची फारच उणीव त्याला जाणवायची. भारतात पुण्यात असताना घराबाहेर पडले की अनेक मित्रांचा ताफाच हजर असायचा शिवाय मधून मधून घरी येणारे तर कधी इतर काकाकाकू वा मामामामी रहायलाच आल्यावर त्यांची मुले म्हणजे समीरची चुलत वा मामे भावंडे यामुळे घर कसे सारखे भरलेले असे. इथे मात्र कुणी कोणाकडे जात नाही की येत नाही त्यामुळे त्याला अगदी एकटे पडल्यासारखे झाले होते. त्याला इतकी चांगली सोबत घरबसल्या पहिल्यांदाच मिळत होती, सुभाषला पहिल्यांदा तो जवळ घ्यायला घाबरला कारण बरेच पोपट एकदम टोच मारून बोटाचा किंवा नाकाचा तुकडा काढतात असे बऱ्याच पूर्वानुभवी मित्रांकडून त्याला कळले होते. पण आता सुभाष आल्यामुळे त्याला अगदी जवळचा मित्र आणि सारखा घरात राहणारा मिळाल्यावर काय विचारता! सुभाष त्याच्या खांद्यावरच असायचा तो घरात असताना. त्यामुळे सॅली घरातील इतर कामातच हातभार लावायची. तरी प्राचीने तिला बजावून सांगितले होते की तिला सुभाषसाठीच तेथे रहायचे आहे आणि सुभाष समीरकडे असताना तिने कंपनीची इतरही काही कामे केली तरी चालतील,

पहिले काही दिवस सुभाष फक्त नावाचाच सुभाष राहणार की काय अशी शंका प्राचीला येऊ लागली कारण त्याची मजल घरातील व्यक्तींची नावे घेण्याच्या पुढे काही जाईना. प्रत्येक व्यक्तीचे स्वागत मात्र तो अगदी झोकात करत असे. पण एक दिवस मात्र प्राची घरी आली तेव्हां घरी कोणीच नव्हते आणि तरीही कुलूप उघडून प्राचीने घरात प्रवेश केल्यावर एकदम " ममी, आज इतका का उशीर केलास? " असा समीरचा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती चमकलीच. तिने इकडे तिकडे पाहिले तर सुमेध घरात नव्हताच आणि एकदम कसलीशी शंका येऊन तिने सुभाषच्या पिंजऱ्याकडे पाहिले आणि परत तोच प्रश्न तिला ऐकू आला आणि हा सुभाषचाच पराक्रम हे तिच्या ध्यानात आले.

त्यानंतर मात्र सुभाषची प्रगती ज्या वेगाने झाली ती पाहता समीरला बोलायला शिकवायला आपल्याला किती त्रास झाला याची आठवण येऊन प्राचीला सुभाष म्हणजे टेप रेकॉर्डर आहे की काय असेच वाटू लागले. आश्चर्य म्हणजे तो नुसते शब्दच उच्चारत नव्हता तर ते उच्चारणाऱ्या व्यक्तीच्या आवाजात ते उच्चारत होता. याशिवाय मध्ये इतर काही आवाज म्हणजे दाराची बेल, बाहेरून जाणारे वाहन, या गोष्टीची पण हुबेहूब नक्कल तीही अस्सलपेक्षा सरसच तो करत असे. थोडक्यात रेडिओवर श्रुतिका सादर करण्याचे काम एकटा सुभाषच करू शकेल असे तिला वाटू लागले.

सुभाषच्या या प्रगतीत परागला काही रस नव्हता मात्र सॅली आल्यामुळे आपल्याला काही जादा काम पडत नाही उलट प्राचीच्या अनुपस्थितीत हक्काने राबवून घ्यायला आणखी एक माणूस मिळाल्यामुळे तो जरा जास्तच सुखावला होता मात्र कधीकधी तो सॅलीत जरा जास्तच रस घेतोय की काय अशी शंका प्राचीला येई.

असे असताना गेले काही दिवस पराग सुभाषचा उगीचच राग राग का करू लागला होता याचे प्राचीला जरा नवलच वाटले येऊन जाऊन तो बॅंकिंग क्षेत्रात असल्यामुळे आणि सध्या त्यात बरीच पडझड चालू असल्यामुळे त्याचा एकूण मूडच खराब असल्याचा हा परिणाम असावा अशी तिने समजूत करून घेतली. सॅलीही पराग घरात असताना सुभाषपेक्षा त्याच्याकडेच जास्त लक्ष देतेय की काय अशी शंका प्राचीला येऊ लागली. कधी कधी तर तिच्या रूपात आपण नसती बला घरात आणून ठेवतोय की काय असेही तिला वाटू लागले होते. पण अमेरिकन असल्यामुळे ती जरा अघळपघळ वागते असेही तिला वाटे.

समीरला या शाळेत जुळवून घ्यायला सुरवातीला जरा जड गेले कारण जरी पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असला तरी इथे सगळाच व्यवहार इंग्रजीत करावा लागल्याने तो थोडासा गोंधळून गेला पण थोड्याच दिवसात तो बरोबर रुळून गेला त्याचे ग्रेडसही आता बरे येऊ लागले होते त्यामुळे मध्येच शाळेतून बोलावणे यावे याचे प्राचीला आश्चर्य वाटले होते.

शाळेत प्रवेश करताच मिस केलीने तिचे स्वागत केले " सॉरी मिसेस प्राची तुला त्रास देत आहे पण समीरविषयी एक गोष्ट तुझ्या कानावर घालणे आवश्यक आहे असे मला वाटते. तो बाकी सर्व विषयात योग्य प्रगती करत आहे पण मॅथ्समध्ये मात्र तो जरा मागे पडत आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या होमवर्कमध्ये तू त्याला मदत करत जाऊ नकोस. लेट हिम डू इट" तिचे हे शेवटचे वाक्य ऐकून प्राचीला आश्चर्य वाटले कारण सुमेध कोणाचीच मदत न घेता आपले होमवर्क आपणच करत होता.

"पण त्याचे होमवर्क तर तोच करतो मिस केली " प्राचीने जरा जोरातच म्हटले आणि आपला सूर चढल्याचे तिच्या ध्यानात येऊन "सॉरी, बट इटस द फॅक्ट! आम्ही कोणीच त्याला मदत करत नाही"

"मी असे म्हणते याचे कारण त्याचे होमवर्क अगदी परिपूर्ण असते असे असताना तो परीक्षेत का मागे पडतो? असे व्हायला नको असे मला वाटते. यू जस्ट आस्क हिम इफ ही गेटस एनीबडीज हेल्प " केली म्हणाली.

त्यावर "ओके थॅंक्यू आय विल डेफिनेटली इंक्वायर" म्हणत प्राची उठली पण या प्रश्नाचा कसा छडा लावायचा तिला कळेना.

घरी जाताच तिचे स्वागत. "हॅलो स्वीटहार्ट" या परागच्या शब्दानी झाल्यामुळे तिला एकदम जरा बरे वाटले कारण त्याचा मूड बरा आहे आणि आता तो या प्रश्नाचा काहीतरी उलगडा करू शकेल, निदान आपल्या काळजीत सहभागी व्हायला कोणीतरी भागीदार आहे ही कल्पनाही आनंददायक होती त्यामुळे "अरे तू कसा आज माझ्या आधी घरी आलास? " असे म्हणून तिने पाहिले तर तेथे कोणीच नव्हते आणि एकदम सुभाषच्या पिंजऱ्याकडे लक्ष गेल्यावर परत "हॅलो स्वीटहार्ट हाउ आय मिस यू" हे पुन्हा परागच्याच आवाजातील शब्द तिच्या कानावर पडले आणि तिचा भ्रमनिरास झाला आणि हे या पाखराचेच काम हे ध्यानात येऊन ती "सुभाष प्लीज कीप क्वाएट" असा त्याला दटावण्याचा प्रयत्न केला की लगेच त्याने "ये मेरा दीवानापन है " गायला अगदी थेट मुकेशच्या आवाजात सुरवात केली. मुकेश हा परागचा आवडता गायक असल्यामुळे तो बऱ्याच वेळा त्याची गाणी ऐकत बसायचा तेव्हा या पठ्ठ्याने ऐकले असावे. त्याचे गाणे संपायच्या सुमारास एकदम टेलिफोनची रिंग आली म्हणून प्राची तडातापडीने उठली आणि रिसीव्हर कानाला लावल्यावर डायलटोनच वाजत होता हे तिच्या लक्षात आले तरी कुठूनसा आवाज मात्र आला

. "हेलो मॅडम, सॅली स्पीकिंग, हॅज समीर बीन होम? "

प्राचीला काही कळेचना हा काय प्रकार आहे ते, कारण आवाज फोनमधून येत नव्हता फोनपासून कान बाजूला केल्यावर सगळा प्रकार हा सुभाषचाच आगाऊपणा आहे हे तिच्या लक्षात आले. "चूप रे" असे त्याला म्हणत बेल वाजल्यामुळे ती दार उघडायला उठली

दारात समीरच उभा होता.

"या साहेब. तुमच्या टीचर काय म्हणत होत्या माहीत आहे? "

"आय डोंट नो" समीरचा आवाज आणि पाठोपाठ"नो इंग्लिश समीर स्पीक मराठी" प्राचीचा आवाज आला पण दोन्ही आवाज आले सुभाषच्या पिंजऱ्यातून आणि समीर आणि प्राची दोघेही हसू लागले.

" समीर तू मॅथ्समध्ये वर्गाच्या मागे आहेस असे टीचर म्हणत होती. आणि कायरे तुला गृहपाठ कोण करून देते? "

"मला कोण करून देणार? तू तर सांगितलेच आहेस की माझा गृहपाठ मलाच करावा लागेल म्हणून"

"ते काही खर नाही. खर काय ते मला कळायलाच हव. जर तू होमवर्क इतके व्यवस्थित करतोस तर मग परीक्षेत का मार खातोस? "

"ते मला काय माहीत? परीक्षेच्या वेळी मला काही सुचत नाही"

समीरच्या या सांगण्यावर प्राचीचा विश्वास बसणे शक्य नव्हते पण त्याला खोटे ठरवणेही शक्य नव्हते. तेवढ्यात सॅलीही तेथे आली. तिला विचारून बघावे म्हणून प्राचीने तिला प्रश्न केला " हॅव यू एनी आयडिया सॅली? ’

"नो " पटकन तिने उत्तर दिले

"कमालच झाली मी तुला अजून काही विचारले नाही आणि तू उत्तरही देऊन टाकलेस नाही म्हणून"

"मी कुठ काय बोलले प्राची उलट तुझ्या विचारण्याचीच वाट पाहतेय"

"मग आता नाही अस कोण म्हणाल ---"आणि एकदम सगळा प्रकार प्राचीच्या लक्षात आला कारण आवाज पिंजऱ्याकडून आला होता.

"बर मला सांग समीरला होमवर्क करायला तू मदत करतेस ना? "

"नो यू हॅव स्पेसिफिकली टोल्ड मी नोट टु डू सो त्यामुळे त्याने विचारले तरी मी दुर्लक्ष करते. "

"मग हा काय प्रकार आहे कारण त्याच्या टीचरच्या मते त्याला कोणी तरी मदत करत असले पाहिजे"

"मे बी पराग हेल्पिंग हिम? "परागविषयी सॅलीने संशय व्यक्त केला. पण त्यात काही तथ्य नव्हते हे दोघींनाही माहीत होते.

समीर सुभाषला खांद्यावर बसवून एव्हाना पसारही झाला होता. तेवढ्यात दाराच्या कुलुपाचा आवाज आला आणि पाठोपाठ परागही आत शिरला आणि "वा आज बरीच लवकर आलीस? " असे प्राचीकडे पाहून किंचित आश्चर्यानेच म्हणाला

. "हो आज समीरच्या शाळेत जायचे होते ना म्हणून जरा लवकर निघाले"

"मग काय म्हणत होती टीचर? "

"अरे समीरचे होमवर्क करायला कोणी मदत करते का? "

"अग पण मी तुला टीचर काय म्हणते ते विचारले आणि हे तू काय विचारतेस? आणि मी तर करत नाही हे तुला माहीतच आहे. ’

" हो म्हणून तर प्रश्न आहे. कारण टीचर म्हणते ज्या अर्थी तो मॅथ्समध्ये इतका वीक आहे त्याअर्थी त्याचे होमवर्क तो करत नसणार कारण तो होमवर्क स्वत: करत असेल तर टेस्टमध्ये त्याला इतके कमी मार्क्स पडणार नाहीत

. "सॅलीला विचारलेस का? "

"आता फक्त सकाळी पोळ्या लाटायला ज्या बाई येतात त्यानाच विचारायचे राहिलेय"त्राग्याने प्राची उद्गारली.

"डोंट गेट एक्सायटेड डियर, यातून काहीतरी मार्ग काढता येईल" परागने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.

" हो पण तो मलाच काढावा लागणार आहे. " असे फणकाऱ्याने म्हणून प्राचीने तिथून काढता पाय घेतला.

समीरचा गृहपाठ कोण करून देते याबरोबरच परागविषयी पण दुसरीच शंका तिला येऊ लागली होती कारण आज कधी नव्हे ती घरी लवकर आली त्याचे त्याला फारसे बरे वाटल्याचे दिसले नाही. अलीकडे सुभाषविषयी तो फारसे बोलत नसे पण काल त्याने एकदम तो नकोसा झाल्यासारखे दाखवले. मुख्यत: आपल्याकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टीतच काहीतरी बदल झाला आहे त्यात पूर्वीचे प्रेम जाणवत नाही असे तिला उगीचच वाटू लागले होते. हा कदाचित भासही असेल. कारण या रात्रंदिवस कामाच्या जमान्यात नवराबायकोस एकमेकांची विचारपूस करण्याइतकी फुरसत कुठे होती? ती स्वत: घरात असली तरी सुभाषच्या दिमतीतच असायची आणि पराग आला की लॅप्टॉप घेऊन बसलेला असायचा अगदी जेवण्या झोपण्यालाही कसाबसा वेळ काढावा लागे त्यामुळे कित्येक दिवसात कधी एकमेकाच्या कुशीत विसावून काही विचारपूस केली असे कधी झाल्याचे तिला आठवतही नव्हते मग त्यामुळे पराग कुठे दुसरीकडे तर गुंतला नसेल ना? कारण आजकाल त्याने कधी तरी बळजबरी करून का होईना त्याने तिला आपल्या कुशीत ओढल्याचेही तिला आठवत नव्हते. पैशाच्या मागे लागून मुलगा आणि नवरा दोघानाही आपण दुरावत तर नाही ना, या विचाराने प्राचीला अगदी अस्वस्थ केले.

आपली अस्वस्थता लपवण्याचा कितीही प्रयत्न प्राचीने केला तरी प्रदीपकडे कामाच्या निमित्ताने गेल्यावर प्रदीपने तिला विचारलेच.

"अलीकडे तुझे कामात लक्ष नसते प्राची. काय प्रॉब्लेम काय आहे? "

"कुठे काय काही नाही, आय ऍम ओके, तुला उगीचच वाटतेय पॅड सॉरी प्रदीप " प्राचीने प्रदीपला बऱ्याच दिवसानंतर लहानपणी ज्या प्रकारे ती त्याला बोलवावयाची तसे संबोधले आणि मग तिने स्वत:ला दुरुस्त केले.

"नो नो आय लाइक इट प्राची बऱ्याच दिवसाने तू पॅड म्हटल्यावर सगळ्या जुन्या आठवणी आल्या"

"ओ, प्रदीप, प्लीज फर्गेट इट"

"प्राची, तू विसरली असशील पण मी नाही विसरलो. बर ते जाऊदे, माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस. "

"नथिंग इन पार्टिक्युलर. नेहमीचेच प्रॉब्लेम्स. सध्या समीरच्या टीचरने मला कोड्यात टाकले आहे, तिच्या मते तो मॅथ्समध्ये कमी पडतो. "

"मग त्यावर उपाय काढता येईल, त्यात काय एवढे"

"ते ठीक आहे, पण त्याचे होमवर्क मात्र अगदी अचूक असते त्यामुळे मी त्याला मदत करते असे तिला वाटले आणि मी तसे करू नये असा तिने मला उपदेश केला"

"कमॉन एवढ्यासाठी मूड घालवण्याचे काय कारण? "

"प्रश्न तेवढाच नाही प्रदीप, पराग या बाबतीत काहीच लक्ष घालत नाही आणि समीरला कोण मदत करते याचा मला उलगडा होत नाही"

"मग तुला माझा संशय येत नाही ना? "

"एक वेळ तसे वाटले खरे पण ते तू मला सांगितल्याशिवाय राहिला नसतास. जाऊ दे तुझ्या डोक्याला उगीच माझ्या कटकटी कशाला? "

"प्राची, खरे सांगू का त्यात मला तर कटकट मुळीच वाटत नाही. मला वाटते आज आपण या गोष्टीचा सोक्षमोक्षच लावू या"

"म्हणजे? "

"म्हणजे काय ते तुलाही चांगले माहीत आहे, प्राचू. मला माहीत आहे परागच्या संसारात तू अगदी नाइलाज म्हणूनच राहत आहेस. "

"पण---"

"मध्ये बोलू नकोस, प्राचू माझ्या मनात काय आहे हे तुला चांगले माहीत आहे. तुझ्या वडिलांची बदली झाली नसती तर तू माझीच झाली असतीस पण दुर्दैवाने ते घडले नाही, मी आपली गाठ पडण्याची वाट पाहत राहिलो आणि तेवढ्यात नियतीने दावा साधला, आता तू तुझ्या संसारात सुखी असतीस तर मी मुकाट्याने एकट्याने पुढची वाटचाल केली असती. पण आताही मला वाटते अजून आपण एकत्र येऊ शकतो"

"नो प्रदीप नसत्याच भरीस मला पाडू नको"

"असे का म्हणतेस? पराग तुझ्याशी कसा वागतो हे मला दिसत नाही का? "

"स्टिल आय फील आय कॅनॉट चेंज ट्रॅक, आता फार उशीर झालाय"

"ओके, सध्या राहू दे पण यावर विचार तरी करशील? " यावर काहीच उत्तर न देता प्राची उठली.

तिच्या डोक्यात अनेक प्रश्नांचा गुंता झाला होता. त्यात प्रदीपच्या या अचानक हल्ल्याने ती आणखीच गोंधळून गेली. घरी येताना समीरच्या होमवर्कच्या प्रश्नाचा छडा लावायचा या निश्चयानेच तिने घरात प्रवेश केला. सर्व विचार केल्यावर समीरच्या मित्रापैकी कोणी तरी त्याला मदत करत असावा असा एक अंदाज तिने केला आणि त्या दृष्टीने विचार करता त्याचा अगदी जवळचा मित्र रिचर्ड होता त्याला विचारावे की काय असा विचार करून तिने त्याच्या घरी फोन करायचा विचार केला. आश्चर्य म्हणजे फोन लगेच लागला आणि तो रिचर्डनेच घेतला. "हाय रिचर्ड, काय चाललेय? "तिने विचारले, "नथिंग, आय ऍम ऒके, ओँटी तू कशासाठी फोन केलास? डु यू वॉंट टु टॉक टु मॉम? ""नो नो तुझ्याशीच बोलायचे आहे, रिचर्ड तुला मला विचारायचे आहे की समीर होमवर्क करताना तुझी मदत घेतो का? ""नो, व्हाय आर यू आस्किंग ऑंटी? येस नाउ आय रिमेंबर, ही सेज ही हॅज अ गुड फ्रेंड हू हेल्प्स हिम" आणि प्राचीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडल्यासारखे झाले. "थॅंक्स रिचर्ड, "म्हणून तिने फोन बंद केला. आणि सुभाषच्या पिंजऱ्याकडे तिने मोर्चा वळवला.

हातात समीरच्या होमवर्कचा कागद नाचवत तिने सुभाषला प्रश्न केला, "सुभाष हे काय आहे माहीत आहे? "

आणि आश्चर्य म्हणजे तिला प्रतिसाद अगदी अपेक्षितच आला,

"हे तर पूर्वीच केले आहे. "

"मग सांग बर याच उत्तर"

"हो पण ते तू मला विचारायला हवेस" सुभाष उत्तरला.

"ओ के. सतरा वजा आठ किती? "

सुभाष गप्प. त्याला वेगळ्या प्रकारे विचारायला हवे असे तिला वाटले आणि तिने पुन्हा विचारले,

"ओके, सतरातून आठ काढून टाकले किती उरले? "

"नऊ फारच सोपे आहे" सुभाषचे उत्तर ऐकून प्राची एकदम गारच झाली.

बर आता सांग एकोणतीसमधून बारा काढून टाकले किती उरले? "

"सतरा, हो पण आता मला अंघोळ घालायला पाहिजेस सॅली मला यावेळी घालते"

"ओके, आता एकच प्रश्न --"

नो, नो"आणि एकदम दाराच्या बेलचा टर्र्र्र्र्र्र्र्र्र असा आवाज ऐकू आला आणि तो सुभाषनेच काढला होता हे पिंजऱ्याजवळ असल्यामुळे प्राचीला कळले.

त्याच्या पाठोपाठ पावलांचा आवाज आणि दार उघडल्याचा. मागून जो आवाज प्राचीच्या कानावर आला त्याने तिला एकदम ४४० व्होल्टचा शॉक बसावे तसे झाले.

"हाय डार्लिंग, कमॉन आय ऍम अलोन "

तो आवाज होता परागचा.

"नो पराग नो प्लीज आय ऍम रियली स्केअर्ड" हा आवाज एका स्त्रीचा होता पण कोणाचा हे प्राची ओळखू शकली नाही.

पाठोपाठ परागचा आवाज

"ओ शिट व्हाय आर यू सो मच स्केअर्ड? माय वाइफ इज नॉट कमिंग टिल टेनथर्टी टुडे. समीर आल्सो हॅज गॉन टु हिज फ्रेंड. टिल देन देअर विल बी नोबडी एक्सेप्ट यू अंड मी. सो लेट अस एंजोय.

"नो सर, प्लीज. "

आता मात्र हा आवाज कोणाचा याविषयी शंका उरली नाही.

"कमालच आहे तुझी " असा परागचा आवाज आणि पाठोपाठ कारपेटवरून एकाद्या व्यक्तीला ओढावे तसा पाय ओढल्याचा आवाज आणि त्यामागोमाग "चुक्" असा आवाज ऐकून आपल्याला चक्कर येणार असे प्राचीला वाटू लागले. समीरच्या रहस्याचा भेद करता करता परागचीच भानगड समजेल असे स्वप्नातही तिला वाटले नव्हते.

"देवा देवा कसल्या संकटात टाकलेस मला. " कपाळावर हात मारत ती उद्गारली.

परागच्या सगळ्या वर्तनाचा उलगडा आता होत होता पण प्रकरण भलत्याच थराला गेलेल दिसतेय. पराग येताच त्याला विचारायला हवे.

पण पराग काही त्यादिवशी घरी आलाच नाही. त्याला ऑफिसातच कामासाठी बसावे लागणार होते. सुदैवाने तेवढ्यात सॅली आणि समीर आले आणि प्राची इतर गोष्टीत आपले मन गुंतवू शकली. पण आता सॅलीकडे पाहावेसुद्धा तिला वाटेना. अर्थात तिच्यापेक्षा यात परागच जास्त दोषी होता याबद्दल तिला खात्री होती तरीही!.

दुसऱ्या दिवशी तिची जाण्याची वेळ झाली तरी परागचा पत्ता नव्हता त्याचा फोनच आला "प्राची सॉरी आज एकदम संध्याकाळीच घरी येईन तुला माहीत आहेच लीमन ब्रदर्सची हालत आता आमच्या कंपनीने टेकओव्हर करायचा विचार केलाय त्यामुळे आम्हा सगळ्यांनाच बसावे लागतेय. "

"ओके, मात्र संध्याकाळी लवकर ये तुझ्याशी महत्वाचे बोलायचेय" आणि असे सांगून आपण मोठी चूक केली हे त्यादिवशी संध्याकाळी प्राची घरी आली तेव्हां तिच्या लक्षात आले कारण ती घरी आली तेव्हां पराग घरी होता आणि सुभाषचा पिंजरा रिकामा होता.

"हे काय सुभाष कोठे आहे? "

"मला काय माहीत मी तर आत्ताच आलो आणि सुभाषचा पिंजरा रिकामा आहे हे तू सांगितल्यावरच मला कळतेय. तुला माहीतच आहे मला तो किती आवडतो ते " पराग शांतपणे उत्तरला.

"पराग मला सगळे कळले आहे आणि त्याचा राग तू त्या गरीब पाखरावर काढलास हे बरे नाही केलेस"

"मग माझा राग काय मी प्रदीपवर काढू? " परागने एकदम पवित्रा बदलला.

"त्याचा इथे काय संबंध? "गोंधळून जात प्राचीने विचारले.

"मांजर डोळे मिटून दूध पीत असले तरी जग काही झोपलेले नसते प्राची, सगळ्या बायोजेनमध्ये तुझ्या आणि प्रदीपच्या संबंधांचा डंका पिटला जातोय आणि तुला माहीत नाही म्हणतेस कमाल आहे. "

परागच्या सुरात निर्ढावलेपणा जाणवत होता.

"अच्छा अच्छा म्हणजे त्यामुळे तू सॅलीशी संबंध जोडलेस वाटत व्हेरी गुड पराग, मी तुला ओळखण्यास फार उशीर केला. सुभाषला तू नाहीसे केलेस तरी सर्व गोष्टी मला समजल्या आहेत. त्यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही. तेव्हा शहाणा असशील तर त्याला माझ्या ताब्यात दे. आपल्या घरात त्याची लुडबूड नको असे तुला वाटत असेल तर मी कंपनीला तसे सांगते म्हणजे यापुढे तुझा त्याच्याशी संबंध येणार नाही. आणि सॅलीशीही संबंध तुला ठेवायचे असतील तर माझी काही हरकत नाही. त्यासाठी महत्वाच्या संशोधनावर बोळा फिरवू नकोस"

इतका शांतपणा आपण कसा राखू शकलो तिचे तिलाच समजत नव्हते. पण एक गोष्ट मात्र निश्चित! समीरचे होमवर्क आणि प्रदीपचा प्रश्न या दोन्हींचे उत्तर तिला मिळाले होते. आता परागचे तिच्या जीवनात स्थान उरले नव्हते आणि ते स्थान कोणाला द्यायचे याविषयी तिचा निर्णय झाला होता.