तेवणारा दिवा एक देहात या...!

...........................................................................
' मनोगत ' चे संचालक, प्रशासक, कायमस्वरूपी सदस्य, धावती भेट देणारे
पाहुणे-सदस्य.... सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!
...........................................................................


.....................................
तेवणारा दिवा एक देहात या...!
.....................................

वाट होती चुकीची; तरीही पुढे जात मी राहिलो!
शाप मी भोगले जीवनाचे; शिव्या खात मी राहिलो!

शब्द परके मला; सूरही दूरचे; ताल बेताल हा...
का सुखाचे तरी गीत वेड्यापरी गात मी राहिलो?

आठवांच्या तुझ्या येत गेल्या सरी आत-बाहेरही...
चिंब झालो मनाने;  तनाने कुठे न्हात मी राहिलो?

येत नाही कुणी;  जात नाही कुणी; मी किती एकटा...
माणसांना तरी व्यर्थ हलवीत का हात मी राहिलो?

तू मला नीट होकार देशी कुठे वा न नाकारशी...
मी खुळ्यासारखा राहिलो यातही; त्यात मी राहिलो!

जून काया न झाली नवी अन् तकाकी न आली मला...
जन्मल्यापासुनी व्यर्थ टाकीत ही कात मी राहिलो!

मी कसा काय बाहेर आता पडू? येत आहे रडू...
बंद झाली कवाडे, तसा एकटा आत मी राहिलो!

आठवेना कुणीही मला; मी करू दुःख त्याचे कसे?
या जगालाच नाही; स्वतःलाच अज्ञात मी राहिलो!

तेवणारा दिवा एक देहात या... जीव त्याला म्हणू...
मी तुम्हाला दिली वाट तेजाळ; तिमिरात मी राहिलो!

- प्रदीप कुलकर्णी

.....................................
 रचनाकाल ः १२ डिसेंबर २००५
.....................................