काळ रोखा आणि काळाला रोखा!

लहानपणापासून मला काळ (समय ह्या अर्थी) आणि काळ (मृत्यु, यम ह्या अर्थी) ह्या दोन शब्दांबद्दल एक कुतुहल होते.

मृत्यूला काळ का म्हणत असावेत? (उदा. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ) ह्या दोन्ही संकल्पनांना एकच शब्द का आला असावा? (उदा. 'कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला' ह्या ओळीत दोन्ही अर्थ ध्वनित होतात ना?)

उत्तर काही केल्या मिळाले नव्हते.

मात्र आज ही बातमी/माहिती वाचल्यावर दोन्हीचा ताळमेळ असावा असा काहीसा माझा ग्रह झाला.

ह्याला परवा होणाऱ्या तासाभराच्या कालस्थगनाचा संदर्भ आहे. उत्तर गोलार्धात समशीतोष्ण कटिबंधातील देशांत उन्हाळ्यात सूर्यप्रकाश चौदा तास तर अंधार दहा तास अशी परिस्थिती असते. हिवाळ्यात त्याच्या उलट असते. (दक्षिण गोलार्धात ह्याच्या नेमकी उलट स्थिती असते. ) उन्हाळ्यातल्या ह्या वाढीव सूर्यप्रकाशाचा फायदा (रिकाम्या वेळात?) मिळावा म्हणून घड्याळाचे काटे उन्हाळ्याच्या सुरवातीला एक तासाने पुढे केले जातात. आणि हिवाळ्याच्या सुरवातीला पुन्हा पूर्ववत एक तासाने मागे केले जातात. आता ही वेळ परवाच्या रविवारी आहे. विज्ञ लोकांनी सांगितलेली त्या निमित्ताने काही माहिती वाचायला मिळाली.

झोपेचा आपल्या हृदयावर बरावाईट परिणाम होत असतो. एकंदर विदा पाहिला असता, सोमवारी हृदयविकाराने मृत्यू पावण्याचे प्रमाण इतर दिवसांहून जास्त दिसते. विज्ञ म्हणतात की हे रविवारी रात्री उशीरा झोपण्याने आणि सोमवारी एकदम पडणाऱ्या कामाच्या दबावाने होते. उन्हाळ्याच्या सुरवातीला घड्याळे एक तास पुढे करण्याने एक तास झोप कमी मिळते. त्यामुळे लगोलग येणाऱ्या सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मरणाऱ्यांचे प्रमाण वाढते. हिवाळ्याच्या सुरवातीला ह्याउलट एक तास झोप जास्त मिळाल्याने हेच प्रमाण सोमवारी खाली येते. (पादचाऱ्यांवर अपघाताने ओढवणाऱ्या मरणाच्या बाबतीत हे उलटे आहे. पादचाऱ्यांच्या अपघाती मरणाचे प्रमाण नोव्हेंबर मध्ये अंधार लवकर झाल्याने जास्त तर उन्हाळ्यात उशीरापर्यंत सूर्यप्रकाश राहिल्याने कमी असते! )

स्वीडन मधल्या हृदयविकारांचा विदा तपासला असता विज्ञांच्या लक्षात आले की, उन्हाळ्याच्या सुरवातीच्या पहिल्या सप्ताहात हृदयविकाराने मृत्यूंचे प्रमाण सुमारे ५% वाढते. सोमवारी आणि मंगळवारी हेच प्रमाण ६% आणि १०% ने वाढलेले दिसते. हिवाळ्याच्या सुरवातीला हेच उलट होऊन पहिल्या सप्ताहात अशा मृत्यूंचे प्रमाण सुमारे ५%ने घटते.

हे सगळे सांगून विज्ञ सांगताहेत, अशा प्रकारे परवा एक तासाने घड्याळे मागे करण्याने आपण अनेक मृत्यू टाळणार आहोत!!!

हे मी जालावर जे वाचले आणि त्यातून मला जे आकलन झाले त्याच्या आधारानेच मी हे लिहीत आहे. स्टॉकहोममधल्या डॉ. इम्रे  झान्स्की (करोलिन्स्का इन्स्ठि.) आणि डॉ रिकार्ड ल्युंग (नॅशनल बोर्ड ऑफ हेल्थ अँड वेलफेअर) ह्यांनी हे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनला विपत्राने कळवले आहे. फिजऑर्गच्या ह्या पानावर  मला ही माहिती मिळाली. मी चित्रही तिथूनच जोडलेले आहे.

हे सगळे वाचून मला काळ आणि काळ ह्यांच्यातली ही भाषेच्या पलीकडे जाणारी सांगड केवळ भयचकित करणारी वाटते. परवा घड्याळे एक तासाने मागे करण्याने आपण साक्षात मृत्यूलाच परावृत्त करणार आहो, हा विचार त्या पार्श्वभूमीवर विलक्षण वाटतो.. उन्हाळ्याच्या सुरवातीला एक एक दिवस पंधरा मिनिटे लवकर उठण्याचे अंगवळणी पाडल्यास पहिल्या सोमवारच्या मृत्यूंमध्ये घट होऊ शकेल असेही विज्ञांनी सांगितले आहे. 

हे त्याच वेळी का सांगितले नसावे? ...

कदाचित तेव्हा काळ आला असला तरी वेळ आली नसावी बहुधा!