मिलन

आयुष्याच्या वेलीवरती असे प्रीतीचे फुल फुलावे
हेवा व्हावा जगास साऱ्या असे अपुले नाते जुळावे

आहे मी की आहेस तू हे तुला कळावे न मला कळावे
सर्वस्व अर्पून एकमेकां एकमेकांत ऐसे मिसळून जावे

प्रीतीच्या बंधात स्वतःला आनंदाने बांधून घ्यावे
हृदयामधल्या संगीताला प्रणयाचे मग गीत स्फुरावे

नजरेमधले भाव माझ्या नजरेलाही तुझ्या कळावे
लाजुनी हासत गालामध्ये तू मग माझ्या मिठीत यावे

जगी कधीही झाले नव्हते असे अपुले मिलन व्हावे
चंद्रासवे तारकांनीही मिलनास या साक्षी व्हावे

- योगेश