तहान

भरून सागर त्यांचे सरिता तहानलेली
तृषा मिटे रसिकांची, कविता तहानलेली

न शांभवी ही, विरही डोळ्यांमधील अश्रू
कळे न सुरई कोणाकरिता तहानलेली

शुकाप्रमाणे विन्मुख मोहांस राहिल्याने
उरेल नीरस, कडवट शुचिता तहानलेली

फिरून झाल्या विहिरी परक्या घरांतल्याही
तरी न शमला अग्नी, पतिता तहानलेली

जिथे तिथे लुचणाऱ्या पाहून पाडसांना
भिजूनही वांझोटी धरिता तहानलेली...