'अजब' स्वतःशी..

स्वतःलाच मी लिहिली पत्रे
स्वतः स्वतःला बोलवले
स्वतः घेतली मुलाखत, छबी
स्वतः स्वतःला गौरवले...

स्वतःचबाबत स्वतः बोललो
चार शब्द मी स्वागतपर
अभिवादन मग करून उठलो
स्वतःलाच द्यायला उत्तर...

विस्ताराने भाषण केले,
पुष्पगुच्छ अन हार वाटले
नाइलाज मग झाला तेव्हा
आभारप्रदर्शन आटपले...

अखेर झालो 'कृतकृत्य'च मी;
डोळेदेखिल डबडबले!
जड हृदयाने निरोप घेउन
स्वतः स्वतःला पोचवले...

एकटाच मी नंतर उरलो
'स्वतः'च सोबत नसताना
'अजब'च काही अनुभवले मी
'स्वतः'स सोडुन जगताना...