राजे - ७

वर्षापूर्वी काही कामानिमित्त नाशीकला निघालो होतो. रात्री अकराला स्टॅंडवर पोचलो. बाराची गाडी होती. बाथरूमला गेलो, तिथं दारातून बाहेर येणारा एक चेहरा थोडा ओळखीचा वाटला. केस मानेपर्यंत वाढले होते. दाढी चेहरा भरून. चेहरा राकट वाटावा अशी. अंगात विटलेली जीन पँट, निळ्या रंगाची. पांढरा शर्ट. डोळे खोल गेलेले. तो गृहस्थ माझ्या अंगावरून नाशीकच्या फलाटाकडे गेला. मी विचारातच आत शिरलो.
बाहेर आलो तेव्हा डोक्यात प्रकाश पडला होता, हे तर राजे. खोल गेलेल्या डोळ्यांतून व्यक्त होणारा बोलका भाव मला त्यांची ओळख सांगून गेला. मी धावतच नाशीक फलाटाच्या दिशेने गेलो. बसच्या आजूबाजूला पाहू लागलो. कुठंही काही चाहूल नव्हती. भिरभिरणारी नजर डाव्या हाताला फलाटाच्या कोपऱ्याकडं गेली. तिथं एका बाकड्यावर राजे बसले होते. सिगरेट शिलगावलेली होती. बस सुटण्यास वेळ असल्यानं मी त्यांच्याकडं मोर्चा वळवला.
"राजे?"
चेहऱ्यावर कसलेही भाव नाहीत. तो गृहस्थ एकटक माझ्याकडं पहात होता. आपण चुकलो की काय असं मला उगाच वाटून गेलं. पण धीर करून मी पुन्हा "राजे?" असं विचारलं.
"सरकार?"
हुश्श. दरवाजा किलकिला झाला होता. "इथं कुठं?"
"असंच. फिरत-फिरत..."
"कुठं निघाला आहात?"
"कुठंच नाही ठरवलेलं अजून." मी उडालो. कोड्यात बोलण्याची सवय म्हणावं की नेहमीप्रमाणं ठाम, ठोस विधान हे कळेना.
पण बोलणं तरी सुरू झालं होतं. विचारपूस करता-करता ध्यानी आलं की राजेंनी मुंबई केव्हाच सोडली होती. मंत्रालयातील भरभराट देणारं 'करियर'ही बंद होतं. उपजीविकेसाठी हल्ली काय करता या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.
गप्पा सुरू झाल्यानं मी बाराची गाडी सोडून द्यायचं ठरवलं.
दोन दिवसांआधीच राजे आले होते. बंगळूरहून. गोवामार्गे. हा संकेत पुरेसा होता. गृहस्थ पुन्हा एकदा भटक्या झाला होता हे निश्चित. घरच्यांनी नाद सोडून कित्येक वर्षं झाली होती. नियमित जगण्याची काही इर्षा, उमेदच राहिली नव्हती. पण भरकटताना जे जगणं झालं होतं ते मात्र भयंकर होतं. सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळापासून ते मुंबईतल्या झोपडपट्टीतलं जीणं, भटक्यांच्या नशाबाजीपासून ते स्टेजच्या सोसापर्यंत, रसीकतेचा कळस गाठणारं जगणं ते अगदी कोठा... सगळी टोकंच. बोलता-बोलता राजे सांगत गेले होते मधल्या काळातली कहाणी.
ठीक एक वर्ष मंत्रालयातील करियर गुंडाळण्यात गेलं. गुंडाळलं म्हणजे त्यांनी एकही पैसे न घेता काही कामं करून दिली. बहुतेक कामं शिक्षण खात्यातली, काही कामं अपंग-बालकल्याण अनुदानाशी संबंधित. मी म्हटलं हे म्हणजे आधीच्या पापातून उतराई होण्याचा प्रकार तर नाही? त्यावर थेट उत्तर, "मी काहीही पाप केलं नाही. त्या व्यवस्थेत मी तेच केलं जे तिथं होणार होतं. त्या व्यवस्थेला मोडून काढत मी काही गोष्टी केल्या. अखेरच्या वर्षांत फक्त तशाच गोष्टी केल्या. ते माझं कर्तव्य होतं. त्यामुळं त्यात माझी काहीही कर्तबगारी नाही."
मंत्रालयातील करियर सोडल्यानंतर आमदार निवासातून थेट धारावी झोपडपट्टी. का तर, तिथलं जगणं कसं असतं हे अनुभवण्यासाठी. कशासाठी हा अनुभव घ्यायचा, तर केवळ घ्यायचा म्हणून. राजे जे सांगत ते विश्वासार्ह असे म्हणून लिहितो इथं, त्यांनी त्या झोपडपट्टीत घाण साफ करायचं काम केलं होतं. शंभरावर एकर शेतजमीन असलेल्या घरातला हा गृहस्थ. धारावीच्या झोपडपट्टीत घाण साफ करायचं काम करून जगत होता. त्यानंतर थेट बंगळूर. कशासाठी? काही नाही. रेल्वेत बसलो आणि तिथं पोचलो. तिथं एकदम पांढरपेशी काम. एका बांधकाम कंपनीत साईट ऑफिसवर सुपरव्हायजरी काम. मी म्हटलं, सर्टिफिकेट्स वगैरे नसताना नोकरी कशी मिळाली? उत्तर एकच. "आपली कनेक्टिव्हिटी सर्टिफिकेट्सपेक्षाही डीप आहे." बंगळूरला काही काळ काढल्यानंतर गोवा. किनाऱ्यावरच्या एका हॉटेलात वेटर. त्या जोडीनं पुन्हा हिप्पी (राजेंच्या भाषेत भटक्या) समुहांशी संपर्क, त्यातून अंमली पदार्थांच्या जाळ्यात पुन्हा एकदा. त्याच तारेत बहुदा आता इथं.
"आता ठरवलंय, एखादं खेडं गाठून दिवस काढायचे. पैसे आहेत अजून बँकेत. किमान साडेतीन लाख तरी. ते टिकले कारण बँकींग व्यवहारांपासूनही लांबच फेकले गेलो होतो. आता सही तरी नीट करता येईल की नाही ठाऊक नाही. पण एकदा मुंबईत जाऊन तो क्लेम करायचा आहे... मला वाटतं की राक्या मदत करेल त्यासाठी..." या राक्याला झोपडीतून उचलून आणून पुढं शिकवत बँकेत चिकटवून दिला होता राजेंनी. त्याची कहाणी हा तर स्वतंत्र विषय.
माझ्या अंगावर काटा आला. एक क्षणभर वाटलं की या गृहस्थाला घरी न्यावं. काही दिवस राहू द्यावं. पण माझ्या मध्यमवर्गीय मानसीकतेनं त्या इच्छेवर मात केली. त्याचं ते विलक्षण जगणं माझ्या चौकटी उध्वस्त करून जाणारं होतं. त्या चौकटीतीलं माझं जगणं असुरक्षीत होत गेलं असतं...
मी ते टाळलं. म्हणालो, "राजे, पुण्यात राहता आहात कुठं?"
बहुदा हाच प्रश्न त्यांना नकोसा असावा. मी त्याचं जगणं पाहिलं होतं ते शानदार. आत्ताचं तसं नव्हतं.
"वेल, सरकार, यू नो, बर्ड्स लाईक मी नेव्हर नीड अ नेस्ट. दे आर सोलली डिपेण्डण्ट ऑन देअर इन्स्टिंक्ट्स. आयम वेल प्लेस्ड व्हेअर आयम..."
इंग्रजीवरची मूळ मांड कायम होती तर. मी उगाच मनाशी चाळा केला, शेर आणि हिंदीही पूर्वीसारखं असेल का?
"पुढं काय करणार आहात?"
"सांगितलं ना, की एखादं खेडं गाठायचं आहे. खूप पूर्वी नर्मदेच्या किनाऱ्यावर मध्य प्रदेशात एकदा भटकत गेलो होतो. एका खेड्यातील एका देवळात एक पुजारी भेटला. मी तिथं आठवडाभर मुक्काम केला होता. त्याच्याशी बोलताना कळलं की तो जुना इंजिनिअर आहे. अस्खलीत भाषा, संस्कृतवर जबर कमांड. टाटांच्या कुठल्याशा कंपनीत होता, तिथल्या स्पर्धेत टिकला नाही. गुणवत्ता असून काही हाती येत नाही याचं फ्रस्ट्रेशन आलं, एकदा हार्ट अटॅक. पुढं थेट अध्यात्मात शिरला, सारं काही सोडून त्या देवळात जाऊन बसला होता. चीज थी, सहनेलायक. क्यूंकी, वो सिस्टमका व्हिक्टिम था. वोही सिस्टम, जिसका मै एक पार्ट हुवा करता था..."
"तो अब क्या उसका व्हिक्टिम हो?"
"नो. नॉट अॅट ऑल. आयम स्टील द पार्ट ऑफ द सिस्टम. दॅट्स व्हाय आयम व्हेरी अनलाईक यू. आय कॅन स्टिल थिंक ऑफ बीईंग सिस्टमीक अगेन. व्हिच आयम नॉट डुईंग. कारण, यू नो वन थिंग अबाऊट द सिस्टम? जे सिस्टमचा पार्ट असतात ना, ते त्या सिस्टम नामक ब्लॅकहोलमध्ये कधी गुडूप होऊन जातात ते कळत नसतं. त्यामुळं सिस्टमच्या बाहेर असणं किंवा तिचा व्हिक्टिम असणं हे अनेकदा फायद्याचं असतं. आय कान्ट मेक अ चॉईस बीटवीन द थ्री. अँड धिस इज द सिंपल ट्रुथ."
---
विषय न वाढवता मी निरोप घेतला. नाशीक गाठलं. काम उरकून तीन दिवसांनी परतलो. आल्यावर आधीच्या तीन दिवसातले पेपर समोर घेऊन बसलो होतो. एका पेपरमध्ये आतल्या पानात बातमी होती, "बसस्थानकात बेवारस मृतदेह". सोबत अर्धा कॉलम फोटो. फक्त चेहऱ्याचा.
चेहऱ्यावर दाढी. खोल गेलेले डोळे. वेशभूषेचं वर्णन. सारं काही राजेंशी जुळणारं.
दुपारपर्यंत कन्फर्म झालंदेखील. जागीच हृदयविकाराचा झटका. आमची भेट झाली त्याच रात्रीची घटना. एकदा वाटलं आपण पुढं होऊन काही करावं, पण पुन्हा त्यांनी त्यांच्याच शब्दांत सांगितलेल्या सत्याची आठवण झाली आणि मी शांत बसणं पसंत केलं.
"सिस्टमचा पार्ट त्या सिस्टम नामक ब्लॅकहोलमध्ये कधी गुडूप होऊन होऊन जातो ते कळत नसतं..."
(पूर्ण)