(ठुमरी)

पुलस्तिंची सुरेख  ठुमरी ऐकली आणि आमच्या लेखणीने पुन्हा ठेका धरला

उधार देण्या मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती येथे आता ती ही टपरी नाही

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो
शोधत आहे अंगावर जी  जागा दुखरी नाही

मास्तर म्हणती चविष्ट आहे हे  प्रौढांचे शिक्षण
'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाही

नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा
चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही

गाणे  अमुचे झपाटलेले; डिस्को तालावरचे
ख्याल, तराना रडगाणे वा टप्पा ठुमरी नाही

किती "केशवा"पाडशील तू सुमार कविता आता
लिहावेस तू अशी कुणाची ही बळजबरी नाही

केशवसुमार