चेहरा सारे खरे ते सांगतो
याचसाठी आरसा मी टाळतो
वेगळे घडणार अंती जाणतो
मी तरी आंदाज माझे बाधतो
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो
माळरानावर मनाच्या एकटा
मी कुणाची वाट आहे पाहतो
यायची असतेस तेव्हा का मला
काळ थोडा थांबल्यागत वाटतो
एवढा साधा नसावा प्रश्न तो!
उत्तराला वेळ आहे लागतो
ही तुझी माझीच आहे गोष्ट पण
नाव मी बदलून आता सांगतो
मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा
आठवांच्या या स्मशानी हिंडतो
-अनिरुद्ध अभ्यंकर