माझे 'ब्रह्मानुभव'

वेदांनी आणि उपनिषदांनी निरनिराळ्या प्रकारे 'ब्रह्मा'चे वर्णन केले आहे. त्यापैकी 'अहं ब्रह्मास्मि' 'नेति नेति' 'तत्त्वमसि' इत्यादी वाक्ये प्रसिद्ध आहेत. मुळात ब्रह्म हे सकल चराचर (ह्यातील 'च' हा 'चहाडीमधील 'च' सारखा वाचू नये) सृष्टीमध्ये व्यापलेलं आहे. त्यामुळे साहजिकच ब्रह्मानुभव हा शब्दही तितकाच सर्वव्यापी आहे. वेदवाक्यांचा जसाच्या तसा अनुभव यायला मी काही कुणी 'अवतार'नाही (माझा अवतार पाहण्यासारखा असला तरीही !) त्यामुळे मी माझ्या पातळीवर आलेले ब्रह्मानुभव माझ्या बापुडवाण्या वाणीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय.

'अहं ब्रह्मास्मि' ह्या वाक्याचा अनुभव सामान्य माणूस आयुष्यभर घेतो, पण दुसऱ्याच्या बाबतीत. म्हणजे, लहान असताना, घरच्या मोठ्यांचं वाक्य हे ब्रह्मवाक्य म्हणून मानावं लागतं. 'आई' म्हणजे तर प्रत्येकाचंच प्राथमिक ब्रह्म असतं. नंतर हळू हळू वय वाढतं आणि घरच्यांचं वर्चस्व कमी होतं. तेव्हा कुणी तरी आपल्या मुलांची आई होणारी आयुष्यात येते. ती जरी आपल्या मुलांची आणि तीही होणारी आई असली, तरीही तिच्याही बाबतीत तिची सगळी वाक्यं ब्रह्मवाक्य म्हणूनच स्वीकारावी आणि नंतर आंमलात आणावी लागतात.कधी कधी आपल्याला त्याच ब्रह्माची मनधरणीही करावी लागते. तेव्हा 'तत्त्वमसि' (ती तूच आहेस) ह्या वाक्याचा अनुभव येतो. हे खरं तर 'केलं एकदाचं मान्य, तीच तू' अशा भावनेनं उच्चारलेलं वाक्य असतं. त्यामुळे ह्या बाबतीत ब्रह्मानुभव येत नाही आणावा लागतो. असो....

थोडक्यात ब्रह्मचर्याश्रमी असताना, घरचे मोठे, आणि गृहस्थाश्रमी असताना घरची 'एक' च व्यक्ती आपल्या सनातन 'अहं ब्रह्मास्मि' ची जाणीव स्वतःच्या बाबतीत करून देत असते. हे झाले घरचे, बाहेर म्हणजे हापिसात 'बॉस' नामक प्राणी, आपल्या 'अहं ब्रह्मास्मि' स्फुरणाचा जमेल तितक्या वेळा अनुभव देत असतो. ब्रह्म हे फक्त मनुष्यात नसून प्राण्यात सुद्धा असतं ह्याचाच हा अनुभव.त्यामुळे सामान्य माणूस 'अहं ब्रह्मास्मि' चा अनुभव केवळ प्रश्नार्थकच 'अहं ब्रह्मास्मि? ' (काय ? मी ब्रह्म आहे?) असाच घेत असावा.

ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम यांच्या उंबरठ्यावर अशाच प्रकारचे अनुभव 'नेति नेति' च्या बाबतीतही येतात. जर आपल्या सौभाग्याने तरुणपणी कुठलेच ब्रह्म (की माया?)आपल्या आयुष्यात आले नाही, तर त्याला आयुष्यात आणावं लागतं. थोडक्यात 'अरेंज्ड मॅरेज'. त्यामुळे ह्या ब्रह्मानुभवाला 'अरेंज्ड ब्रह्मानुभव' म्हणायला हरकत नाही. तर, लग्न ठरण्यापूर्वी होणाऱ्या बायकोबद्दलची अनेक चित्रे कल्पनेच्या कुंचल्याने रंगवून झालेली असतात. त्यामुळे  मुली बघायचे कार्यक्रम जेव्हा होतात, तेव्हा सामान्य माणसाला ,त्यालाही किमान अपेक्षा असल्याने,काही स्थळं पसंत पडत नाहीत. आणि घरच्यांना 'नेति नेति' (हे नाही, हे नाही) असं सांगावं लागतं.पण लग्नानंतर मात्र 'सर्वांभूती एकच ब्रह्म' अशा प्रकारच्या संतवाणीचा अनुभव येतो. ज्याला मी 'नेति नेति' म्हणत होतो त्यातल्याच एका भुताला (महिलावर्गाने क्षमा करावी, मुलींनी नाही केली तरी चालेल) ब्रह्म मानावं लागतं. आणि मग 'या' नेति नेति पेक्षा 'ती' नेति नेति अधिक चांगली होती की काय? अशी व्यर्थ शंका मनात येते. शंका व्यर्थ अशासाठी, की ब्रह्म हे केवळ बाह्यरूपाने भिन्न असते, तत्त्वरूपाने समानच. त्याचप्रमाणे बायको ही 'रूपाने' जरी भिन्न असली, तरी 'वृत्ति-रूपाने' समानच.

हे सगळे झाले वाक्यमय अनुभव. अर्थात हे सगळेच 'वरच्या' पातळीवरचे आहेत. त्यामुळे कदाचित फक्त वाचून ते कळणार नाहीत. 'अनुभवाला अनुभव हेच प्रमाण' ! आणि 'अंतरस्थितीचिये खुणा , अंतरनिष्ठ जाणती' ब्रह्माचे जे अनुभव पुरुषांच्या दृष्टिकोणातून लिहिले आहेत, तसेच अनुभव स्त्रियांच्या दृष्टिकोणातूनही नक्कीच येत असतील. शेवटी (आणि सुरुवातीलाही) ब्रह्म हे सर्वत्र समान आहे, मग अनुभव वेगळा कसा असणार?

बाकी अगदी दैनंदिन जगण्यामध्येही ब्रह्म अगदी पुरेपूर भरलेलं असतं. उदा. आज बसमध्ये बसायला जागा मिळाली, तीही खिडकीची, मला तर ब्रह्मानंदच झाला. किंवा 'आज भांडीवालीने भांडी अगदी स्वच्छ घासली आहेत. वगैरे वगैरे. (इति. स्त्रिया) 'आज पूर्ण रस्ता मोकळा होता, बाईक काय ताबडली आज! ' किंवा ' आज घरचे सगळेच बाहेर गेलेत, ही आणि मी फक्त दोघेच घरात....... ' वगैरे वगैरे (इति. पुरुष). माणसाच्या जगण्या-वागण्याप्रमाणेच ब्रह्माचे अनुभव देखील अनेक मार्गांनी येणारे आणि अनेक प्रकारचे असतात. अनुभव घेत असताना खरं तर कधीच 'मी अनुभव घेतो आहे' असं वाटत नाही, त्या अनुभवातून बाहेर आलं की जाणवतं की 'मी आत्ता अमुक एक गोष्ट अनुभवली' त्यामुळे कधी कधी काही अनुभवांच्या बाबतीत त्यातून बाहेर न पडलेलंच चांगलं .

माझ्या मते आपलं जगणं, हेही एका अर्थानं ब्रह्मच आहे. त्यामुळे ते अनुभवण्यासाठी त्यात गुंग असलं म्हणजे झालं. बाहेर पडलो तर तो अनुभव कसा आहे हे कळेल आणि सगळी मजाच निघून जाण्याची शक्यता आहे. म्हणून शेवटी एकच म्हणतो.

'तत्सत्ब्रह्मार्पणमस्तु'