(विश्राम)

प्रेरणा : मिलिंद फणसे यांची गझल "विश्राम"

मान्य, गर्दी फार येथे पण तरी विश्राम आहे
रोजच्या वाटेवरीचा बार हा निजधाम आहे

छेडणे तिज सोडले पाहून अनुजाला तिच्या मी
रेशमाचा भाउ हल्ली वाढला बेफाम आहे

खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
तेव्हढ्यासाठीच माझा चालला व्यायाम आहे

अत्तरे लेऊन अंगी भेटलो होतो तिला मी
चारुगात्रीला, परंतू, वाटले तो घाम आहे

चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, "शववाहिनीचा फार सध्या दाम आहे"

'मूर्ति'पूजेचा गुन्हा चुकला कुणा; सारेच 'तसले'
पूजती कांता कुणी, इतरत्र कोणा राम आहे

येउनी टाकून गेला शब्दपाचोळा कवी तो
झाड कवितांगण, तुझे ते, खोडसाळा, काम आहे