..............................
उरी फुटून...!
..............................
भेटता मी कधी चुकून मला!
वाटते, भेटलो कुठून मला!
मी तुझी वाट पाहतो मागे...
हाक देतेस तू पुढून मला!
अर्थ बहरायचे किती तेव्हा...
शब्द भेटायचे फुलून मला!
मी तरंगापरी न वरवरचा...
शोध तूही स्वतः बु़डून मला!
'आज वाराच भेटला नाही... '
सांगते फूल हिरमुसून मला!
सोडला नाद मी तुझा आता...
काय मिळवायचे घुमून मला?
खोदखोदून मागशी पत्ता....
जन्म झाले किती बुजून मला!!
गुणगुणावी खुलून मौनाने...
ओळ जावी अशी सुचून मला!
मी असा गप्प गप्प का आहे?
जायचे का उरी फुटून मला?
- प्रदीप कुलकर्णी
............................................
रचनाकाल ः १० जानेवारी २००९
............................................