कवीची निराशा (अनुवाद)

श्री. हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या 'मधुकलश' कवितासंग्रहातील 'कवि की निराशा' ह्या कवितेचा अनुवाद

१.

दुःख आणिक अडचणींना दूर केले हासुनी मी,
धीर धरुनी संकटीही आपणा सांभाळले मी,

मात्र पडणे पर्वताचे मी शिरी साहू न शकलो,

भार होता जीवनाचा, अधरी प्याला लावला मी;

करुनि रात्रंदिवस निंदा थकवली जिह्वा जगाने,
व्यर्थ; होते रंजनाचे सबब ते मधुपान माझे !

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

२.

चमकतो रात्रीस जो तारा, प्रभेने फिकट होतो,
अन् नभीचा वाढणारा चंद्र पुन्हा क्षीण होतो,

क्षीण अन् होऊन पुरता म्लान, मग द्युतिमान होतो,

गोंधळुन चक्रात ह्या आजन्म मी तल्लीन होतो;

साजरा करू विजय कुठला, दुःख पाडावात कुठल्या ?
रात-दिन-सम जड क्रमाने बद्ध पतनोत्थान माझे

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

३.

फुलुनि मृदु-सुकुमार-कलिका-पुष्प ते सुकुनी न जावो
बहरलेल्या उपवनी शिशिरातला वायू न येवो,

कोकिळा सकरुण स्वरांनी सोडुनी ना वृक्ष जावो,

जे युगांचे स्वप्न कविचे ते कधी खोटे न होवो

हे न झाले तर सुखांचे कोणत्या मी गीत गावे ?
मागणे कुठले जगाने पूर्ण केले सान माझे ?

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

४.

वृद्ध, अपुऱ्या मी जगी, माझ्यात पुण्य नि पाप आहे,
चांगले, वाईट ह्यांची छापही माझ्यात आहे,

अपयशी केवळ मला ठरवून जग अन्याय करते,

साथिने माझ्यात दोषांच्या गुणांचे माप आहे

मी जगा अभिशाप आहे, अन् जगा वरदानही मी;
शाप साऱ्यांना दिसे पण छन्न हे वरदान माझे !

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

५.

फुलुन गर्वाने न गेलो लोळता लक्ष्मी पदाला,
करत थट्टा मी लयाची विसरलो नाही स्वतःला

देउनी आशीष स्वर्गा झुकवतो शिर भूमिपुढती !

उसळुनी सिंधू-उरी आमोद जैसा बुडबुड्याला;

एक माझ्या लघु पदाने मोजले वैभव धरेचे !
दीन जग करणार कैसे, सांग ना, सन्मान माझे ?

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

६.

तेज विश्वासामुळे होते उरी, काळोख आता,
राहिली संदेह-शंकांचीच वस्ती येथ आता,

वाट कोणी दाखवावी, सर्व अन् पथभ्रष्ट येथे,

केव्हढा गोंगाट, "मत माझे बरोबर" सर्व म्हणता

हर दिशेने जाउनी मागे फिरे, मग धाव घेई;
ध्येय कोठे, ओळखू शकले न जीवन- यान माझे !

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

७.

एक मधुवनि भ्रमण करते अन् दुजे मरुभूत पाउल,
ह्या करी जीवन-सुधा-रस अन् करी दुसऱ्या हलाहल,

ऐकतो नंदनपरीचे गान, क्रंदन भिक्षुणीचे,

घन तमाच्या पाहतो मांडीवरी मी ज्योत निर्मल;

आस, मग नैराश्य, अन् मग शून्यसे हृदयात काही,
कण-समूहांनी विरोधी जाहले निर्माण माझे

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

८.

कल्पना-पथ अनुसरोनी पोचलो मी नियति-दारा,
नयन झुकवुन लिहित होती एक पुस्तक ती उदारा,

"ही कथा आहे तुझी" सांगून मज पुस्तक दिले ते

पान पहिले उघडले अन् कंपला मम देह सारा,

'भूमिका' वाचून रडलो मी गगन-स्वप्नाभिलाषी,
दोन अध्यायात 'सांप्रत' पूर्ण लघु आख्यान माझे !

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

९.

क्रूर काळाकडुन श्वासांचे कधी मी घेतले ऋण,
आजही सव्याज मुद्दल घेत आहे काळ मोजुन,

व्याज म्हणुनी वसुल केले गान हृदयाचे तयाने,

पण दिवस उरलेत केवळ दोन फिटण्या कर्ज सारे,

होउनी निश्चिंत मग पहुडेन मी ओढून चादर
विसरुनी केले जगाने कैक जे अपमान माझे

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?

१०.

सोडुनी सोन्यास का जमवीत बसलो धूलिकण मी ?
का वनी काट्यांत फिरलो पथ फुलांचा सोडुनी मी ?

हास्य विद्युत हटवुनी का अश्रु-धारांतुन बरसलो ?

का सुधेने न्हात असता गरळ पीण्या चाललो मी ?

उकलुनी कोडे जरी हे जग मला समजेल थोडे
होउनी जाईल त्यापूर्वीच पण अवसान माझे !

जग विचारी, का असे नैराश्यभरले गान माझे ?