बेहिशोबी वागण्याची वेळ झाली
सत्य सारे सांगण्याची वेळ झाली
मेणबत्त्या लावल्या, मोर्चे निघाले
काम झाले, विसरण्याची वेळ झाली
कोण मेले, जायबंदी कोण झाले ?
चार पैसे वाटण्याची वेळ झाली
मांडला अहवाल मंत्र्याने पटावर
बासनांना शोधण्याची वेळ झाली
षंढ शब्दांचे वमन दिल्लीश करतो
आग जेव्हा ओकण्याची वेळ झाली
ऊर्ध्व की मी खालती जाणार आहे ?
देह जळला, ठरवण्याची वेळ झाली
समजुनी घ्यावे कुणाला आणि कोणी
याच विषयी भांडण्याची वेळ झाली
लागला विक्षिप्त तू आहेस बोलूस
गप्प जेव्हा राहण्याची वेळ झाली