मी(ही) लिहिलेले उखाणे

सध्या मनोगतावर आलेले उखाणे वाचून (दुवा १, दुवा २, दुवा ३ आमच्या अर्धांगिनीस तिने लग्नात घेतलेले उखाणे आठवले. तिच्या वतीने आम्ही ते इथे देत आहोत.

१)सुदाम्याचे पोहे केले कृष्णाने भक्षण
---राव खादाड, त्यांचं वजन वाढतय मण-मण

२)रामनामाने समुद्रावर दगड तरंगले
---राव आले ढोसून आणि दारातच कलंडले

३)प्रभू रामचंद्राला बोरे अर्पून, शबरीने जीवन केले कृतार्थ
---रावांना कन्या अर्पून केला बाबांनी अनर्थ

४)संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात उदक
---राव घालतात सपाता, चालतात फदक-फदक

५)निसर्गसौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट
सवतीला सोडून ---राव लावतात माझ्याशी पाट

६)कोकणात नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष
---राव काढतात चिमटे सासुबाईंच्या अपरोक्ष

७)श्रावणात प्राजक्ताला येतो बहर
त्या टवळीला पाहून ---रावांनाही येते भलती लहर

८)ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद
---रावांचा होतो सुरू शेजारिणीशी फंद

९)महादेवाच्या गळ्यात नागाचा वेढा
---रावांना बघून आठवे कोंडवाड्यातला रेडा

१०)वृंदावनात कृष्ण वाजवत होता बासरी
बरी होते माहेरी, ---रावांनी कशाला आणली सासरी

११)जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष
---रावांना मिळो लवकर यासाठी आहे मी दक्ष

१२)खुप प्रसिद्ध आहेत कबीराचे दोहे
वय झालं तुमचं ---राव, हे पोरींकडे बघणे बरे नोहे