पोटमाळा

माझ्या घऱाप्रमाणे
माझ्या मनातही
आहे एक पोटमाळा..
जिथे टाकून दिल्या आहेत
कितीतरी तुटक्या-फुटक्या, वापरात नसलेल्या आठवणी..
ज्या आहेत तिथे वर्षानुवर्ष.
बरेचदा काढतो.
अन् त्यावरची धूळ झटकून,ठेवून देतो पुन्हा तशाच!
त्या जपून ठेवण्याची कारणं माहीत नाहीत आणि
फेकून देण्यासाठी कारणं सापडत नाहीत.
मात्र कधी कधी
माझं सुंदर, चकचकीत वर्तमान..बिघडलं किंवा निखळलं की
तात्पुरतं सांधायला किंवा सांभाळायला
उपयोगी पडतात
त्या तुटक्या-फुटक्या आठवणी
बिजागिरी, सांधा किंवा खिळा म्हणून....
आणि काम भागतं
मॉलमधे जाऊन पुन्हा सुंदर, चकचकीत, नवीन वर्तमान आणेपर्यंत!

(जयन्ता५२)