याचका, नित्यास होते काय की...

श्री. भूषण कटककर यांच्या कवितेवरून ..... (वासना जातात कोठे काय की )

काय नवलाई नसे - हे चालते
पंचवर्षी वांझ बाई व्यायते

हात कोमल एवढा आहे तुझा...
की जरासे कमळ येथे बोचते

स्वप्न आहे मी तिचे ती सांगते -
आणि ती स्वप्नीच खुर्ची राहते

भान वस्त्रांचे कुठे जनतेस या..
मान मिळता नागवीही नाचते

मी कसे ते चालवावे सांग ना ?
या 'घडी' काटे नसावे वाटते

नाक येथे आजही चोंदून घे -
की प्रमेहासारखे सुजणार ते

ती मजा नाही तुझ्या विजयातही
मिरवताना माळ चप्पलहार ते

तूच 'आघाडीस' हे मी जाणतो
सोड त्यांना - हात जे देतात ते

मी मराठी सारखा बोलू कसा ?
समजणारे कोण आहे सांग ते?

गाव पाठीशी असावे कोणते ?
बनवले नाही कुणा जे गाव ते..

माहिती नाही? विचारूही नका..
रोज यांना कोण 'दाणे' टाकते...

माहिती आहे तरी बोलू नका..
रोज 'माडी' कोण गजरा टाकते

तेवढे द्या मित्र भुंग्यांनो जरा
जेवढे कमळात माझ्या मावते

पश्चिमेला जोडते पूर्वेसवे
ज्यास किटली त्यास इटली चालते

वेगळ्या हाती अता रीमोट द्या
पण तरी कंट्रोल आहे 'बाळ' ते

लोकशाहीला असे उत्सूकता
कोणता पोशाख आता घालते ?

घेत माथी उचलुनी खुर्चीस या..
लोकशाही रक्त काही सांडते

जाळतो स्वप्ने प्रजेची सारखी
अन तरी माझ्यावरी ती भाळते

काय 'विश्वानंद' गगनी पोचला !
आरसा मिळता निळा की काय ते..

याचका, नित्यास होते काय की ...
जन्म अमुचा...   लोकशाही वारते ...!