हासण्याचे दहा फायदे.

(' हसलात तर कळवा ' या माझ्या आगामी पुस्तकात 'पतीने पत्नीशी वाद कसा जिंकावा', 'कवी' याचबरोबर 'हसण्याचे विविध प्रकार' या विषयांवर लेख आहेत. त्यात नाजूक, विकट, छद्मी, सात्त्विक, खदाखदा, लाजून हासणे, निराश हासणे, वेड्यासारखे हासणे, हास्यक्लबचे हासणे, मुंबई-पुणे-नाशिक-जळगाव-औरंगाबाद-नगर-नागपूर-कोल्हापूर व कोकण येथील हासणे असे हासण्याचे विविध प्रकार व त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, हासण्याचे फायदे त्यात द्यायचे राहून गेले होते. ते येथे देत आहे. )

-----------------------------------------------------------------------------------------------------------

"हसा!"

असे म्हंटले की हसू येऊ शकणारे काही निर्व्याज जीव अजूनही भूतलावर तरंगताना आढळतात.

आता हसण्याचे विविध फायदे पाहू.

१. हसण्यामुळे हसता येते हे सिद्ध होते.

२. हसण्यामुळे पोट गदागदा हालल्यामुळे पचनसंस्था ऍक्टिव्हेट होते.

३. हासणे हे 'हसावेसे वाटणे' या भावनेचे व्यक्तीकरण आहे. 'हसावेसे वाटणे' हे माणसाला 'मजा' वाटल्यावर होत असल्यामुळे 'हासणे' हे काही ना काहीतरी मजा झाल्याचे द्योतक असू शकते.

४. हासण्यामुळे दात दिसत असल्यामुळे दातांची निगा राखावी अशी इच्छा नैसर्गीकपणे होण्याची शक्यता असल्यामुळे 'ती निगा राखली जाणे', 'पेस्टचे कारखाने चालणे', 'ब्रशचे कारखाने चालणे', 'त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळणे' वगैरे गोष्टी आपोआप होतात.

५. हासणे ही एक नैसर्गीक क्रिया असल्यामुळे निसर्गमित्र असल्याची भावना जागृत होणे शक्य होते.

६. हासणे हे मानवाच्या माहितीप्रमाणे फक्त मानव करू शकत असल्यामुळे 'आपण मानव आहोत' याची खात्री पटण्यास मदत होते.

७. हासताना आपल्या नियंत्रणात नसणारे आवाज आल्यामुळे 'आपण असेही आवाज ( तोंडातून ) काढू शकतो' यावर विश्वास बसून माणसाला आपल्या काही सुप्त क्षमतांची जाणीव होते.

८. हासणाऱ्या माणसाकडे इतर माणसे ( जर हासणारा पुरुष असेल तर विशेषकरून स्त्रिया ) ताबडतोब आकर्षित झाल्याचे अनेक दाखले आहेत. ( ज्यांना 'एखाद्या गोष्टीवर का हसावे' हेच समजत नाही ते हासणाऱ्याकडे आकर्षित होणारच असा 'स्त्रियांबाबतचा' एक सिद्धांत पुर्वी वाचल्याचे आत्ता मलाही या निमित्ताने आठवले, ही एक वेगळीच गोष्ट! ) ते आकर्षित झाल्यानंतर काय काय झाले याचे फारसे दाखले नसावेत. दोघेही आयुष्यभर हासत बसले असावेत, स्वतंत्रपणे!

९. हासण्यामुळे गांभीर्य नष्ट होते. हा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे.

( गांभीर्यच नष्ट झाल्यावर आपोआप दहशतवाद, सीमावाद, भाषावाद, जन्म-मृत्यू, नोकरी जाणे, लग्न होणे वगैरे संकटे संकटे वाटणारच नाहीत. ) 

१०. हासण्यामुळे गांभीर्य निर्माणही होऊ शकते.

(मात्र हा फायदा आहे की नाही यावर अजून पूर्णपणे एकमत झाल्याचे ऐकिवात नाही.)

यानंतरच्या लेखात 'हासण्याची कारणे' या विषयावर विवेचन होईल.