गनिमी कावा
अचानक टीव्हीवरचे कार्यक्रम बंद पडले होते आणि विशेष सूचना दिसू लागली
होती. त्यामुळेच लोकांना काय घडत आहे याचा अंदाज आला होता. मग प्रत्येकाने
इतरांना तो संदेश पोचवण्याचे काम केले होते. हातातली कामे टाकून बरेच जण
रस्त्यावर काय होणार ते बघण्याकरता आले होते. मी ऑफिसात होतो. मिटिंग सुरू
असतांना लोकांच्या हातातले सेल वाजू लागले. रामचा फोन आल्याने माझा
सेलफोन सुद्धा वाजला. रूममेट रामचा कॉल घेता घेता मी इमारतीच्या गच्चिवर
आलो. माझ्याबरोबरचे बरेचजणपण बाहेर आले होते. त्यांच्या नजरेत अविश्वास,
भीती
आणि उत्सुकता याचे संमिश्र प्रतिबिंब दिसत होते.
आले आले, ते पहा, ते तिकडे असा आरडाओरडा, हातवारे चालू होते. त्या
गोंधळातही माझ्या तिखट कानाने खळ.. आवाजाची नोंद घेतली होती. चहा घेऊन
येणाऱ्या पोऱ्याने ग्लासासकट ट्रे खाली ठेवला म्हणजे काय पाडलाच होता.
त्याला लाथाडून किती लोक गेले त्याचा हिशोब नव्हता. इतर लोकांच्या
हातातल्या बॅग्स, किल्ल्या अशा वस्तू केव्हाच जमिनीवर पडल्या होत्या. आकाश
जवळ येते आहे असे वाटू लागले होते. ज्याची अधिरतेने वाट बघत होतो ते
अखेर घडणार होते तर............
सकाळी दहाच्या सुमारास ती गोष्ट समजली होती. म्हणूनच टीव्हीवरचे
वार्ताहर व पत्रकार यांची झुंबड उडाली होती. टीव्हीवर विशेष प्रक्षेपण
सुरू झाले होते. पण नेहमीप्रमाणे जणू काही वेगळे झालेच नाही असे दर्शवण्याचा
वार्ताहरांचा व निवेदकांचा प्रयत्न होता. म्हणूनच त्यावेळी निवेदकांची केशभूषा
नेहमीचीच होती, कपडे नेहमीप्रमाणेच होते. पण त्यांच्या चेहर्यावर आणि
एकंदर वातावरणात एक तणाव मात्र जाणवत होता.
त्यांनी लोकांना सतर्क
राहण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी सर्व परिस्थिती आटोक्यात असल्याचेही ते
वारंवार सांगत होते. हे सर्व करण्याची तयारी त्यांच्याकडूनही अनेक वेळा
करुन घेतली होती हे न कळण्याएवढी सामान्य जनता मूर्ख नव्हती म्हणा.तरीसुद्धा
या क्षणाची वाट निवेदक आणि वार्ताहर बघत होते. एवढच काय तर आपण काम चोख
बजावले या भावनेने पुन्हा त्या बातमीकडे बघताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून
आला होता असे त्यांच्याकडे पाहून वाटत होते.
कोपऱ्याकोपऱ्यावर टोळक्याने लोक गप्पा करत होते. ' ते दिसले होते' यात
वादच नव्हता पण काय ते अजून नक्की झाले नव्हते. प्रत्येकाने त्याच्या मनात
जे होते तेच आकाशात बघितले होते.
अगदी सकाळी सुद्धा एवढा धूर, धूळ उडत असतो की निळे आकाश
शोधावे लागते अशी परिस्थिती. तेव्हा खरच काही महाकाय आले तरच ते
दिसणार होते सर्वांना. पण तरी आम्ही अमूक पाहिले अशा घोषणा चालू होत्या.
जे कुणी आणि जे काही पाहिले होते ते आता आणि पुन्हा कधी येणार त्याचा
थांगपत्ता त्यांना नव्हता. पाण्यात एखाद्याने दगड फेकावा आणि मग बराच काळ तरंगामागून
तरंग उठत राहावेत तसे विचारांचे, अफवांचे झाले होते. एखाद्या न संपणाऱ्या चक्रात अफवा आणि शक्यता अडकल्या होत्या. आणि बाहेर पडणे शक्य नाही असे झाले की प्रोग्रॅम मुद्दाम बंद करावा लागतो तसे होऊन शेवटी बोलणे थांबत होते.
गेल्या आठ्वड्यात रामची
फिरती होती. आठवडाभर दमून, रात्री जागून प्रवास करून तो आज पहाटे
बाहेरगावाहून आला होता. मी घरी आलो तोवर रामचा आळस पार पळाला होता. चातक जसा पावसाची
वाट पाहतो तसे आम्ही नक्की काय आले होते आणि पुन्हा केव्हा येणार त्या
बातमीची वाट बघत होतो.
शहरातल्या उंच इमातरती मध्ये एकमेकाला लागून फ्लॅट असतात. तसाच माझा
पण होता. खिडकीत उभे राहिले तर शेजाऱ्याची खिडकी दिसत होती, तिथे कोण आहे
ते दिसत होते, अगदी पलिकडच्या इमारतीत कोण आहे ते सुद्धा. गेल्या पाच सहा
वर्षात पहिल्यांदाच मी खिडकीत असा एवढा वेळ उभा होतो. अवंतीच्या फ्लॅटकडे
माझी नजर गेली.
तिच्या घराशेजारी कोण राहत ? हातवारे करत काही तरी पुटपुटत तो माणूस येरझारा घालतांना दिसत होता.
माझ्या मनातला प्रश्न चेहऱ्यावरून शेजारी उभ्या असणाऱ्या रामला कळला
नाही तरच नवल. एका आयटी कंपनीच्या इंटर्व्हूला आम्ही दोघे एकमेकांना भेटलो
आणि हा आपला टाईपचा अशी माझी खात्री झाली. रूममेट म्हणून आम्ही दोघे एका फ्ल्टॅ मध्ये राहायला
लागलो. त्याच्या कामाच्या वेळा आणि त्याचा स्वभाव दोन्ही माझ्या अध्यात
मध्यात येईल असे नव्हते. रूममेट म्हणून राहिलो तर त्याच्या खिशाला कमी ताण
पडणार होता, एकटे राहण्याऐवजी माझी सोबतीची सोय होणार होती. पाच वर्षे झाली असतील.. व्यावहारिक
पातळीवरून सुरू झाली ती आमची ओळख मैत्रीत केव्हा बदलली होती आणि केव्हा राम
माझा जिगरी दोस्त झाला होता.
हलवून रामने मला वर्तमानात आणले. त्याची इथे कोण तिथे कोण अशी माहिती तत्परतेने देणे चालूच होते. सेल्समन असल्याचा फायदा..
जिथे पाहावे तिथे आपला माल कसा खपवायचा एवढच बघत असतो तो.
"आता काय दिसले, काय होणार यातूनही तू आपला खिसा भरला नाही तर नवल
म्हणायचे. "
फोनवर कसल्यातरी घड्याळाच्या आणि रिंगच्या ऑर्डरी देतांना,
पार्सलबद्दल बोलतांना तो मध्येच खळखळून हसला. त्याचे डोके कामाला लागले
होते यात शंका नव्हती.
काळोख्या रात्री एखाद्या लहान मुलाने विजेच्या गडगडाटाला घाबरून लपून
बसावे आणि मनातल्या मनात वादळाची चाहूल घेत राहावी तसे आमचे झाले होते.
सकाळभर दिवसभर लोक हल्ल्याच्या बातमीचा शोध घेत होते. या सर्वांमध्ये
अर्थात मी, अवंती आणि राम सुद्धा होतो. खंत एकच होती की जे काही येणार
होते ते म्हणजे नेमके काय आहे किंवा असू शकेल त्याचा छ्डा अजून लागला
नव्हता. शास्त्रज्ञांचे काम सुरू असले तरी अजून त्याचे नेमके पृथ्थकरण
करता आले नव्हते.
मोबाईलवर मी अवंतीशी बोलत होतो.
"कदाचित हल्ला झाल्यावरही ते करता येणार नाही" अवंतीने नेहमीप्रमाणे
मोस्ट पेसिमिस्टिक विचार मांडला. तरी बरे आपण जिवंतच राहणार नाही असे काही
ती बडबडली नाही. ती बडबडली नाही तरी तिच्या चेहऱ्यावर ते दिसत असणारच. मला तर ती जवळ नसतांनाही तिचा चेहऱ्यावरचे भाव वाचता येत होते.
अवंती, माझी कार्यालयातली सहकारी. तिची एवढीच ओळख सांगणे म्हणजे प्रेमाशी
प्रतारणा ठरेल. तिला पाहिले त्या क्षणीच मला आवडलेली अवंती. काय आवडले ते
समजले नव्हते पण तरी ती आवडली होती. ती कोण याची उस्तुकता वाटली
होती..तिच्या आवडीनिवडी, तिचे छंद , तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची
मी नोंद ठेवत होतो. प्रेमबिम असते यावर बिलकूल विश्वास न ठेवणारा मी.. आणि
प्रेमात पडलो? असे
काय होते तिच्यात?
एकीकडे मुलींची लक्ष वेधून घेण्याची धडपड सुरू असते तिथे अवंती
आपल्याकडे कोणी पाहूच नये याच्या खबरदारी घेत असायची. नवरा सोडून
गेलेला... त्यामुळे प्रेम आणि लग्नावरचा तिचा विश्वासच उडाला होता. लहान
मुलाला शाळेत सोडून आपले काम दिवसभर मान मोडून करत असायची. प्रत्येक पुरूष
आपला गैरफायदा घेणार अशा पावित्र्यात असायची ती.. यातून एका तुसडेपणाने
वागायची. बास.. तेवढा तुसडेपणा पुरेसा होता माझे लक्ष वेधायला. मी तरी
कुठे चार चौघांसारखे नॉर्मल वागायचो हे एक कारण असेल त्याचे. लवकरच लक्षात
आले ती अतिशय हुशार आहे, स्पष्टवक्ती आहे. फाजील लाडापेक्षा जबाबदारीची
जाणीव असणारी आहे. ती आवडायला लागली याचे आणखी दुसते कारण होते ते म्हणजे
ती एक उत्तम चित्रकार होती.. पुढ्यातल्या कागदावर कोणी बघत नाही असे वाटले
की अगदी मिटींगमध्येसुद्धा काहीतर रेखाटत असायची ती.
मी घाबरलो नव्हतो असे कसे म्हणू? एकटा असतो तरी घाबरलो असतो आता आणखीनच घाबरलो होतो. प्रेम माणसाला धीट करत म्हणे... भलतच काही
तरी. आता विचार यायचे ते अवंती आणि तिच्या मुलाचा, लग्नानंतर जो माझाही
मुलगाच...
मी एकीकडे बातम्या चालू केल्या होत्या.
खबरदारी घेण्याची सूचना सर्वांना देण्यात येत होती.
बातम्यांकडे लक्ष देणे आणि सतर्क राहून पुढील घडामोडी बघत राहणे एवढेच काय
ते आमच्या हातात होते.
झाडाच्या पानाची सळसळ ऐकू यावी, भितीमुळे अंगावर शिरशिरी यावी आणि
सश्याने घाबरून बिळाकडे धूम ठोकावी तसे आम्ही घाबरून आता घरातच अडकून होतो. सश्यासारखेच
आतून अंदाज घेत होतो.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या खोलीचे दार उघडले आणि हॉलमध्ये आलो. तर रामने ऑर्डर केलेली घडयाळ आणि रिंगाची पॅकेट,
बॉक्सेस येऊन पडले होते. घरात पाय ठेवायला जागा नव्हती. मी त्याच्यावर
उखडलो.
"घर आहे की गोडाऊन? तुझा जो काय बिझनेस आहे त्याचा पसारा या घरात कशाला? "
"तू बघ आता, उगीच कर्ज काढून मी सगळ विकत घेतले का? असा प्रॉफिटचा चान्स पुन्हा नाही. एक घड्याळ पुढे करत तो म्हणाला, ''
घे तू पण, घे हे घड्याळ आणि बांध हातावर. कळेल तुला केव्हा हल्ला होणार
ते. अवंतीने निमूटपणे घेतले एक घड्याळ आणि तुझ्याकरता एक अंगठी, नाही तर
तुझे वागणे पहा. "
रामला अधिक सांगून काही फायदा नव्हता.
आणि दोन दिवस दे, सगळे गिऱ्हाईकाला दिले की घर चकाचक..
राम बेफिकरपणे म्हणाला, माझ्या आठ्वणीत एवढा आत्मविश्वास कोणत्याच प्रोजेक्टवर त्याने आजवर दाखवला नव्हता.
रग्गड श्रीमंत झालेल्या रामचा चेहरा माझ्या डोळ्ञासमोर येण्याऐवजी त्यावेळी जिवंत
उरणार नाही तर कशाचा नफा कशाचा तोटा.. असा विचार माझ्या डोक्यात आला. तसा मी गप्प
बसलो. मुकाट हातावरच्या घड्याळाकडे बघत राहिलो.
मी कुठेतरी कंटाळलो, निष्क्रीय झालो होतो. अवकाशातून जे काही असेल ते बघण्याची उत्सुकता आम्हा सर्वांना होती.
"जे काही आहे ते बघण्याचा आपला हक्कच आहे. "रा्मने विचार मांडला.
"शेवटी ते इथेच का येणार आहे केलास का कधी विचार? किती शहरे, गावे, देश पडले आहेत की"
यावर मी निरुत्तर झालो.
"दुसरीकडे पण होणार असेल हल्ला, तुला काय नक्की माहिती?" माझे प्रश्न सुरू होते
आमच्या घरी आलेली अवंती मात्र गप्प होती. तसा वाद घालण्याचा माझाही मूड
नव्हता. राम म्हणाला तसे जणू या घटनेकरता देवाने आमचीच निवड केली होती अशी
अखेर मी समजूत करून घेतली.
आमच्याच शहरात पहिल्यांदा ते उतरणार असे वाटू लागले होते. त्यामुळे टीव्हीच्या बातमीदारांचे जथ्थेच्या जथ्थे गोळा होत होते.
ते कुठे बरे नक्की उतरेल?
तळ्याकाठी, की मोठ्या चौकाला लागून असणार्या बाहेरच्या मैदानात की आणखी कुठे याचा आम्ही विचार करत होतो.
ते अवकाशयान असेल का ?असेल तर ते दिवसा ढवळ्या ते येईल का की सगळेजण रात्री झोपेत असतांना येईल याची मला चिंता होती.
"झोपलो असतांना यावे, निदान यातनातून काही कळायच्या आतच कायमची सुटका होईल. " अवंती म्हणाली
"आपल्या हातात कुठे आहे? काही सुद्धा होणार नाही, सगळ्या अफवाच असतील, तू
उगीच त्रास करून घेतेस. " रडवेल्या अवंतीला मी धीर देण्याचा प्रयत्न करत
होतो .
क्रमशः