गनिमी कावा- शेवट
जवळजवळ प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता तो म्हणजे- त्या कणांमध्ये काय आहे? हाच!
" हाती आलेल्या बातमीनुसार हा कण म्हणजे एक सूक्ष्म सजीव होता, सहज लक्षात यावे म्हणून त्याला शेवाळ्यासारखा वाढणारा म्हणू. अगदी एकच पेशी असलेला. तो नळकांड्याच्या आकाराचा असून इतर झाडाप्रमाणेच प्रकाशसंश्लेषणामुळे याची वाढ होते असे
समजले होते. "
राम बातमी वाचून दाखवत होता, '' या वाढीची गती एक छोटा कप ५०
मिनिटात भरेल किंवा एखादी खोली सहा सात तासात भरेल एवढी होती. या
प्राण्याचे वर्गीकरण करता आले नसले तरी हिरव्या निळ्या शेवाळयाशी यांचे
साम्य दिसले होते आणि मानवाला अथवा कोणत्याही प्राण्याच्या जिवाला
यांच्यामुळे धोका आहे असा पुरावा मात्र अद्याप मिळालेला नव्हता. "
आमच्यावर हल्ला झाला होता ही वस्तुस्थिती होती. कोणी आमच्यावर हल्ला
केला? मोठ्या कुणी नाही तर फक्त सर्वकाही व्यापणाऱ्या, वाढणार्या धुळीने.
वाढत जाण्याशिवाय इतर कोणतेही वैशिष्ट्य या आगळ्या हल्लेखोरात मला तरी
सापडलेले नव्हते.
राम एकटाच बडबडत होता, "काय चाललय हे? " त्याची घड्याळे कोलमडली होती,
पण लोकांना त्याविषयी तक्रार करायला आणि भांडायला वेळ नव्हता. वाढणाऱा
पिवळसर रंग पुसला धुतला तरी पुन्हा येतच होता. त्या पिवळ्या धुळीची धूळवड
न संपणारी होती. घरातले सर्वजण
साफसफाई करून थकले होते, कंटाळले होते, त्याहून थकवा अधिक जावण्याचे कारण म्हणजे ते अर्थातच मनातून घाबरले होते.
घरातल्या सामानावरची धूळ झटकून, पुसून अवंती थकली होती. तिच्या
चित्रांवर सुद्धा आता धूळ जमा होणार होती. एकदा मी आकाशात झेप घेणाऱ्य
पक्षाकडे बघत होतो. अवंतीने ते चित्र सुरेख रेखाटले होते. ते चित्र
वाचवण्याची, मला वाचवण्याची तिची धडपड सुरू होती. घाबरलेल्या आवाजात
अवंती म्हणाली "कोण आहे हा हल्लेखोर? अरे कसा आहे हा? पाहा ना. हा आमचा
द्वेष करत नाही की आमच्यावर प्रेमही करत नाही. त्याला आमचा नायनाट करायचा
नाही, त्याला आमचा अपमान करायचा नाही किंवा आमच्यावर खटला भरायचा
नाही.त्याला कुठला करार करायचा नाही, त्याला खंडणी पण नको आहे. पण हा
देवदूतही
नाही. त्याला कोणत्याही संकाटापासून आमचा बचावही करायचा नाही, आम्हाला
वाचवायचे नाही किंवा आम्हाला अमर करायचे नाही. "
मोठ्या कचऱा कुंडीतून कचरा भस्सकन बाहेर यावा आणि सगळीकडे दुरएका श्वासात अवंतीने भरभरा मनातले विचार बाहेर टाकले. कचऱ्याचा दूर्गंध पसरावा तशी ती भीती तिघांच्या मनात
रामने मान डोलावली.
"जगाच्या इतिहासात असा हल्ला झाला आहे का रे? "
"त्या शत्रूला काय हवे आहे, त्याच्या मनात काय आहे - तर फक्त वाढत जाणे.! "मी निराशेने उदगारलो.
अवंती माझा हात धरून तशीच बसली होती. कोणत्याही पुस्तकाबाहेर, मालिका
आणि चित्रपटाबाहेरची ही परिस्थिती कशी हाताळायची याचा तिला अंदाज नव्हता.
मला नव्हता. कदाचित कुणालाच ते नेमके समजले नव्हते. ती एकटी नाही एवढीच खात्री काय ती तिला
होती. तिच्यादृष्टीने तेच महत्त्वाचे होते आणि माझ्या दृष्टीनेही.मनात पुन्हा उलटसुलट विचारांचे मोहोळ उठले होते.
आम्हाला त्या कणांचा प्रतिबंध करण्याचा नामी उपाय
सापडेल किंवा त्याचा समूळ नाशही करता येईल. असे सुद्धा होईल की आमचे पूर्ण
गाव, शहर, देश हळूहळू करत त्या वाढत जाणार्या जीवघेण्या धुळीच्या
ढिगार्यात दिसेनासे होईल. पण सद्यस्थिती ही अशी आहे- की संशोधनाअंती निष्पन्न होणारे सिद्धांत अगतिकपणे बघत आहोत. एक एक दिवस धुळीत माखतो आहे.
मनात एकच विचार सतत सुरु आहे - बास्स, आमच्या वाट्याला यापेक्षा काहीतरी
मोठ, भव्य, सनसनाटी अस काही यायला हवे होते. आमचा अहंकार नक्कीच दुखावला आहे.
छोटा मंदार मला म्हणाला होता तशी एखादी स्पेसशीप, त्यातून अक्राळ विक्राळ
दिसणारे परग्रहावरचे कुणीतरी... आणि त्यांच्याशी लढणारे घराघरातले शूर
वीर असे काही.. निदान प्रत्येकाला आपण किती शूर ते तरी दाखवता आले असते असे मला सुद्धा वाटते.
राम म्हणाला, "यातून जर आपण देशाला बाहेर काढू शकलो तर नक्कीच आपली
गणना महापुरुषात होईल. अशी प्रतिकूल परिस्थिती कित्येक वर्षात आलेली नाही.
ही संधी हातातून जायला नको. मोठा शोध, मोठा त्याग, मोठी कामगिरी असे महान
कार्य करण्याची संधी एका शतकात फार तर एक दोन वेळा मिळते."
" या धुळीवर काय उपाय शोधणार? काहीतरी व्हायला हवे होते की ज्याला क्रांती किंवा नियती म्हणून स्वीकारता येईल
असे काही तरी तडफदार, अणकुचीदार ज्याची टोचणी कायम राहील असे तरी व्हायला हवे होते ". मी हताशपणे उद्गारलो.
पुन्हा हातात आता उरले आहे ते केवळ स्वप्नरंजनच आहे. खिडकीबाहेर बघत असतांना् माझ्या स्वप्नाला भरती येते-
एखाद्या अवकाशयानाभोवती आम्ही गोळा झालो आहोत, आणि उत्कंठेने त्याची दार
केव्हा उघडतील आणि मग काय होईल अशी कल्पना मनात येते. मी आणि रामू
-आमच्या मुलाबाळांचे रक्षण करण्याचे आम्ही सर्वजण सोंग घेतो, यानाच्या
खिडक्यातून येणारे बाण, मिसाईल्स निष्पभ्र करण्याचे आम्ही प्रयत्न करतो. शत्रूचा
नायनाट करतो. विजयी वीराप्रमाणे संचार करतो. मोठे बहुमान, हार तुरे,
कौतुकाने अभिमानाने आमच्यावर रोखलेल्या अनेकांच्या नजरा..असे स्वप्न रंगवण्यात बराच वेळ जातो.. पण सत्य?
पण प्रत्यक्षात -
असे काही काही झालेले नाही. खरे दुःख याचे आहे की प्रत्येक्षात असे काहीच झाले नाही. आम्हाला आमचे शौर्य दाखवताच आले नाही.
आम्ही आमचे अंगण, वऱ्हांडे आणि घरे दारे झाडण्याचेच काम करतो आहोत. आमचे
चपलाबूट झटकत आहोत. हल्लेखोर हळूच आमच्या घरातच आला आहे. उभारलेल्या भिंतीवरून
, आमच्या कड्याकुलपातून, खिडकी दाराच्या पडद्यातून तो आत घुसला आहे.
आमच्या घरातील वस्तूंवर, टेबलावर, खिडकीच्या तावदानांवर तो साचत जातो आहे. वाढतो आहे कणाकणाने क्षणाक्षणाला.................
आमच्या फ्लॅट स्क्रिन टीव्हीवर तो आहे, तो एमपीथ्री प्लेअरवर आहे.
मुलांच्या खेळण्यांवर आहे. पलंगावर, कोचावर आहे. आमच्या खिडकीतून पिवळसर धुळीने माखलेले सर्व
काही आम्हाला दिसते आहे. या धुरळ्यापुढे वाहनांचे प्रदूषण काहीच नाही,
कारखान्यांचे निघणारे धूर काहीच नाही असा वाढत जाणारा हा नवा पिवळा ड्रॅगन आहे. शेवटी काही न केल्याने, राजकारणाने, निव्वळ अहंकारामुळे
आम्ही हतबल झालो आहोत. निष्क्रीय ठरलो आहोत.
................................................................................................................................................................
--आम्ही तसे शांतताप्रिय आहोत, तसच सांगायच झाल तर झालेला हल्ला हा
सुद्धा एक बदल म्हणून बघितले तर तसा अतिशय शांततेचाच आहे.. मी -अवंती , अवंती -मंदार, राम -कंपनी -अवंती - धूळ.. धूळ मी अवंती.. काही कळेनास झाल आहे.
शांतपणे धुळीच्या आवरणात अडकून जग आता एका अमाप शांततेने वेढते आहे.
सोनाली जोशी